Tuesday, September 15, 2026
Homeफलटणतेली गल्लीचा पाणीप्रश्न अखेर निकाली; महिनाभरात नवीन पाइपलाइन टाकून नगराध्यक्षांनी पाळला शब्द

तेली गल्लीचा पाणीप्रश्न अखेर निकाली; महिनाभरात नवीन पाइपलाइन टाकून नगराध्यक्षांनी पाळला शब्द

फलटण | प्रतिनिधी. :- फलटण शहरातील तेली गल्ली परिसरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अनियमित पाणीपुरवठ्याचा प्रश्न अखेर कायमस्वरूपी मार्गी लागला आहे. नागरिकांना दिलेला शब्द पाळत नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या पुढाकारातून अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत नवीन मुख्य जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले असून परिसरातील घरांपर्यंत योग्य दाबाने पाणीपुरवठा सुरू झाला आहे.

तेली गल्ली परिसरात अनेक वर्षांपासून अपुरा व कमी दाबाचा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना विशेषतः महिला वर्गाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार दुरुस्ती आणि तात्पुरत्या उपाययोजना करूनही समस्या कायम राहत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

ही गंभीर समस्या लक्षात घेऊन नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. नागरिकांच्या अडचणीची दखल घेत नगराध्यक्षांनी जुन्या व गळतीग्रस्त यंत्रणेऐवजी नवीन मुख्य पाणीपुरवठा पाइपलाइन टाकण्याचे निर्देश दिले.

यानंतर नगरपालिका प्रशासनाने तातडीने कामाला सुरुवात करून युद्धपातळीवर नवीन पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण केले. तसेच प्रत्येक घरापर्यंत नळजोडणी देण्याचे कामही यशस्वीरीत्या पार पडले. परिणामी आता परिसरातील नागरिकांना नियमित, स्वच्छ व पुरेशा दाबाने पाणी मिळू लागले आहे.

या कामासाठी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, पाणीपुरवठा सभापती राहुल निंबाळकर, मुख्याधिकारी निखिल जाधव तसेच संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची माहिती नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांनी दिली.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्षम व विकासाभिमुख नेतृत्वाची साथ लाभल्यास कोणतीही समस्या सोडविणे शक्य होते. भविष्यात प्रभागातील सर्व रस्त्यांच्या दुतर्फा स्वतंत्र पाणीपुरवठा पाइपलाइन उभारण्याचा मानस असून त्यामुळे पाण्यावरील ताण कमी होऊन प्रत्येक नागरिकाला पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध होईल.”

दरम्यान, अनेक वर्षांपासूनचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न सोडवल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा आणि नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांचे आभार मानले आहेत. जितेंद्र तेली, दिलीप तेली, रूपाली परदेशी, भगवान परदेशी, सचिन परदेशी, संतोष परदेशी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments