फलटण तालुक्यात दुष्काळाची चाहूल; ५१ गावे टंचाईग्रस्त, ५ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

0
6
फलटण तालुक्यात दुष्काळाची चाहूल; ५१ गावे टंचाईग्रस्त, ५ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

फलटण तालुक्यात दुष्काळाची चाहूल; ५१ गावे टंचाईग्रस्त, ५ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा

फलटण | प्रतिनिधी :-फलटण तालुक्यात यंदा उन्हाळी पाऊस पूर्णपणे दडी मारल्याने आणि वाढत्या उष्णतेमुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून महसूल प्रशासनाने तालुक्यातील तब्बल ५१ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. यापैकी ५ गावे आणि २७ वाड्या-वस्त्यांमध्ये टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर आणि तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी दिली.
विशेष म्हणजे, टंचाईग्रस्त घोषित झालेल्या गावांमध्ये बागायती पट्ट्यातील अनेक गावांचाही समावेश आहे. त्यामुळे पावसाने आणखी ओढ दिल्यास आगामी काळात टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महसूल प्रशासनाने टप्प्याटप्प्याने टंचाई जाहीर केली असून २३ फेब्रुवारी २०२६ रोजी ३३ गावे, ३० मार्च रोजी १० गावे आणि ५ जून रोजी आणखी ९ गावांचा टंचाईग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण ५१ गावांमध्ये पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन ६ जूनपासून दुधेबावी, वाघोशी, सासवड, मानेवाडी आणि मिरढे या गावांसह त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या २७ वाड्या-वस्त्यांमध्ये टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यंदा ‘अल निनो’च्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी, म्हणजेच सुमारे ९२ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भूगर्भातील पाणीपातळी सातत्याने खालावत असल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून आवश्यकतेनुसार आणखी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर आणि तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी स्पष्ट केले.