Friday, August 21, 2026
Homeफलटणखंडणीसाठी सलून चालकावर हल्ला; सराईत गुन्हेगार अभिजित जाधव जेरबंद

खंडणीसाठी सलून चालकावर हल्ला; सराईत गुन्हेगार अभिजित जाधव जेरबंद

खंडणीसाठी सलून चालकावर हल्ला; सराईत गुन्हेगार अभिजित जाधव जेरबंद

फलटण (प्रतिनिधी)  :लोखंडी हत्याराचा धाक दाखवत सलून व्यावसायिकाकडे दरमहा १० हजार रुपयांची खंडणी मागून मारहाण व तोडफोड करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला फलटण शहर पोलिसांनी अटक केली आहे. अभिजित अरुण जाधव (वय २२, रा. मलटण, ता. फलटण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्या साथीदाराचीही ओळख पटली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आशिष अशोक गाडगे यांचे फलटण येथील जिंती नाका परिसरात ‘किंग युनिटेक्स पार्लर’ नावाचे सलून दुकान आहे. दि. १९ मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास दोन युवक मोटरसायकलवरून दुकानासमोर आले. त्यापैकी पांढरा शर्ट परिधान केलेल्या आरोपीने दुकानात प्रवेश करत शिवीगाळ सुरू केली.
यानंतर त्याने कमरेतील सुमारे दोन फूट लांबीचे धारदार लोखंडी हत्यार बाहेर काढून फिर्यादींना धमकावत, “मला अभि भाई म्हणतात… दुकान चालवायचे असेल तर दरमहा १० हजार रुपये हप्ता द्यावा लागेल,” अशी धमकी दिली. फिर्यादींनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने दुकानातील साहित्याची तोडफोड केली.
दरम्यान, दुकानातील कामगार मोहम्मद फरमान आणि अजिम अहमद यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, दुसऱ्या आरोपीने लोखंडी कड्याने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले. आरोपींनी दुकानाबाहेरील कारची काच फोडून परिसरात दहशत निर्माण केली आणि तेथून पसार झाले.
या घटनेप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अभिजित जाधव याला मलटण परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, अक्षय जाधव (रा. मलटण, फलटण) याच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले.
पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटरसायकल तसेच लोखंडी हत्यार जप्त केले आहे. आरोपी अभिजित जाधव याच्यावर यापूर्वीही घरफोडी, जबरी चोरी, मारामारी आणि महिलांविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दि. २३ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे करत आहेत.
ही कारवाई सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील संतोष नाळे, जितेंद्र टिके, अतुल बडे आणि मुकेश घोरपडे यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments