Friday, August 21, 2026
Homeफलटणलिंगायत समाजाच्या दफनभूमीवरील अडथळ्याप्रकरणी कारवाईची मागणी; आंदोलनाचा इशारा

लिंगायत समाजाच्या दफनभूमीवरील अडथळ्याप्रकरणी कारवाईची मागणी; आंदोलनाचा इशारा

लिंगायत समाजाच्या दफनभूमीवरील अडथळ्याप्रकरणी कारवाईची मागणी; आंदोलनाचा इशारा

फलटण, प्रतिनिधी : फलटण येथील वीरशैव लिंगायत समाजाच्या दफनभूमीवर स्वतःचा हक्क सांगत मृतदेहाच्या दफनविधीत अडथळा आणणाऱ्या रामचंद्र उर्फ रामभाऊ बाळासाहेब मदने व त्यांच्या कुटुंबीयांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आला.
या पत्रकार परिषदेला समाजाचे प्रतिनिधी राजाराम फणसे, प्रा. सतीश जंगम, विजय गाडे, संजय खांडेकर, धन्यकुमार सतुटे, राहुल उदांडे यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.
समाजाच्या वतीने सांगण्यात आले की, मुधोजी कॉलेजसमोरील गट नंबर ६४-ब मधील जागा ही सुमारे १०० वर्षांपासून वीरशैव लिंगायत समाजाची दफनभूमी म्हणून वापरात आहे. या ठिकाणी १९२४ सालातील समाधीचा शिलालेख असून आजही साठ ते सत्तर समाध्या अस्तित्वात आहेत. न्यायालयानेही संबंधित जागेबाबत लिंगायत समाजाच्या बाजूने निकाल दिलेला असल्याचा दावा करण्यात आला.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून रामभाऊ मदने व त्यांच्या कुटुंबीयांकडून दफनविधीवेळी वारंवार अडथळे निर्माण केले जात असून समाजबांधवांना दमदाटी, शिवीगाळ व मारहाणीच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे मृतदेह चार ते पाच तास ताटकळत ठेवावे लागत असून मृतदेहाची अवहेलना होत असल्याची खंत समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
दिनांक १८ मे रोजीही अशाच प्रकारे अडथळा निर्माण झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता. अखेर तहसीलदार व फलटण पोलीस प्रशासनाने घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती नियंत्रणात आणत दफनविधी पार पाडण्यास मदत केली.
या प्रकरणी रामभाऊ मदने व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७२/२०२६ व १९६/२०२६ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करून हा प्रकार कायमचा बंद करावा, अशी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी चंद्रकांत मेनकुदळे, बाळासाहेब सावंत, तानाजी करळे, विशाल बाजारे, विलास मुजुमले, संजय शिपटे, अमित निदान, धनंजय रणसिंग आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments