
फलटण पंचायत समितीवर भाजपचा झेंडा; शिवांजली भोसले सभापती, अमोल सस्ते उपसभापती बिनविरोध
फलटण – फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपच्या शिवांजली विक्रम भोसले यांची तर उपसभापतीपदी शिवसेनेचे अमोल सस्ते यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनिमित्त फलटणच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड पाहायला मिळाली असून नाईक निंबाळकर गटातील मतभेद बाजूला ठेवत दोन्ही गटांमध्ये मनोमिलन झाल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे जवळपास तीस वर्षांनंतर भाजपने फलटण पंचायत समितीवर प्रथमच सभापती पद मिळवत सत्तांतर घडवून आणले आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत फलटण पंचायत समितीच्या एकूण १६ जागांपैकी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजप-राष्ट्रवादी आघाडीला ८ जागा मिळाल्या होत्या. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेलाही ८ जागा मिळाल्या. त्यामुळे सभापती व उपसभापती निवडीत मोठी उत्सुकता आणि राजकीय पेच निर्माण झाला होता.
दोन्ही गटांचे सदस्य समान संख्येने निवडून आल्यामुळे महिनाभर राजकीय हालचाली सुरू होत्या. काही सदस्य सहलीवर गेल्याने राजकीय चर्चांना अधिक रंग चढला होता. अखेर आज सर्व सदस्य थेट पंचायत समितीच्या सभागृहात दाखल झाले आणि निवड प्रक्रियेला सुरुवात झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर यांनी सभापती व उपसभापती निवड प्रक्रियेची माहिती दिली. अर्ज दाखल करण्याच्या वेळेत सभापती पदासाठी शिवांजली विक्रम भोसले तर उपसभापती पदासाठी अमोल सस्ते यांचा एकमेव अर्ज आल्याने दोघांचीही बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
निवडणुकीपूर्वी सकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते दिलीपसिंह भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर यांनी शिवसेनेचे नेते तसेच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन चर्चा केली. या चर्चेनंतर सभापती पद भाजप-राष्ट्रवादी आघाडीला आणि उपसभापती पद शिवसेनेला देण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान सकाळी आणखी एक नाट्यमय घडामोड घडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय समीकरणांमध्ये बदल झाला. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या शिवांजली विक्रम भोसले यांची सभापतीपदी निवड करण्यात आली.
निवडीनंतर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते शिवांजली भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आनंद व्यक्त करत पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे राबविण्यात येतील, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्व सदस्यांना समान संधी दिली जाईल आणि राजकारण बाजूला ठेवून विकासाला प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही दिली.
या वेळी आमदार सचिन पाटील, माजी आमदार दीपक चव्हाण, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेवक श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, दिलीपसिंह भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर आदींसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.








