फलटणमध्ये हॉटेल व्यावसायिक आक्रमक; गॅस पुरवठा बंदीच्या निषेधार्थ १७ मार्चला तहसील कार्यालयावर मोर्चा

0
7
फलटणमध्ये हॉटेल व्यावसायिक आक्रमक; गॅस पुरवठा बंदीच्या निषेधार्थ १७ मार्चला तहसील कार्यालयावर मोर्चा

फलटण: जागतिक स्तरावर इराण-अमेरिका तणावामुळे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक हॉटेल व्यवसायावरही दिसू लागला आहे. स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी (LPG) गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने केंद्र सरकारने घरगुती गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावर निर्बंध घातल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला असून फलटण तालुका हॉटेल असोसिएशन आक्रमक झाली आहे.

असोसिएशनच्या वतीने या निर्णयाच्या निषेधार्थ मंगळवार, १७ मार्च २०२६ रोजी फलटण तहसील कार्यालयावर धडक देत निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हॉटेल व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे अनेक हॉटेल्सचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. यामुळे हजारो कामगारांच्या रोजगारावर संकट निर्माण झाले आहे. परिस्थिती अशीच कायम राहिली तर अनेक हॉटेल्स कायमस्वरूपी बंद करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी आणि सरकारकडे मागण्या मांडण्यासाठी १७ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता फलटण तहसील कार्यालय येथे बैठक आणि निवेदन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वेळी तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्यासमोर व्यावसायिक आपली भूमिका मांडणार आहेत.
फलटण तालुका हॉटेल असोसिएशनने तालुक्यातील सर्व हॉटेल मालक आणि संबंधित व्यावसायिकांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. “सरकारच्या निर्णयामुळे हॉटेल व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. न्याय मिळवण्यासाठी आणि आपली बाजू सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे निवेदन महत्त्वाचे आहे,” असे असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.