आईसक्रीम किंवा थंड खाल्ल्याने खरंच सर्दी जाते! काय आहे यामागचं सत्य?

0
2
आईसक्रीम किंवा थंड खाल्ल्याने खरंच सर्दी जाते! काय आहे यामागचं सत्य?


Does eating ice cream help a cold?: बऱ्याचदा सर्दी झाल्यानंतरही काहीजण आईस्क्रीम खातात  किंवा थंड पेय पितात. यावर त्यांना मनाई केल्यावर “उलट सर्दी झाल्यास आईस्क्रीम खाल्ले तर सर्दी कमी होते किंवा पूर्णपणे जाते” असे उत्तर देतात. काहीजणांना याचा खरा अनुभव येतो. पण हे कितपत खरे आहे? असे कसे होऊ शकते? असा प्रश्न तुम्हालाही कधी न कधी पडला असेलच. चला तर मग जाणून घेऊया यामगचं नेमकं सत्य काय आहे.

Add Zee News as a Preferred Source

तज्ज्ञ काय सांगतात?

तज्ज्ञ सांगतात की, सर्दी झाल्यावर आईस्क्रीम किंवा थंड पदार्थ खाल्ल्याने सर्दी पूर्णपणे जाते, हा एक गैरसमज आहे . मात्र, तरीही काहीजणांना याचा चांगाल अनुभव का येतो? तर यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. जर सर्दी होऊन तुमचा घसा दुखत असेल किंवा घशाला सुज आली असेल तर, आईस्क्रीम किंवा थंड पदार्थ खाल्ल्याने घसा काहीवेळ सुन्न होतो. यामुळे घशाची जळजळ कमी होत आणि तात्पुरता आराम मिळतो. तुम्ही निरिक्षण केले असेल तर, मिंटची गोळी खाल्ल्यानेही असेच होते. याचकारणाने बऱ्याचदा टॉन्सिलच्या ऑपरेशननंतर डॉक्टर आईस्क्रीम खाण्याचा सल्ला देतात. 

 

सर्दीमध्ये आईस्क्रीम खाल्ल्यास फायदा होतो का?

अनेकदा सर्दी झाल्यामुळे अशक्तपणा येतो, भूक लागत नाही. आईस्क्रीममध्ये मोठ्या प्रमाणात साखर आणि कॅलरीज असतात. अशावेळी आईस्क्रीम खाल्ल्यास शरीराला काहीप्रमाणात का होईना पण ऊर्जा मिळते. तसेच ते गिळायलाही सोपे असते. सर्दीसोबत खोकलाही होतो. त्यामुळे घशाला खवखव आणि जळजळ होते. त्यामुळे तिखट अन्न खाल्ल्याने त्रास होऊ शकतो. म्हणून अगदी काही प्रमाणात आईस्क्रीम खाल्ल्यास फायदेशीर ठरू शकते. पण सर्दीमध्ये जास्त प्रमाणात आईस्क्रीम खाणे धोकादायकही ठरू शकते. यामुळे कफ वाढण्याची शक्यता असते. 

 

सर्दीमध्ये आईस्क्रीम खाणे सर्वांसाठीच फायदेशीर असते का?

सर्दी झाल्यावर आईस्क्रीम खाणे सर्वांसाठीच फायदेशीर नसते. दुग्धजन्य पदार्थ खाल्ल्यास काहीजणांच्या शरीरातील लाळ किंवा कफ घट्ट होऊ शकतात. यामुळे नाक चोंदल्यासारखे वाटू शकते किंवा कफ बाहेर पडायला अडथळे येऊ शकतात. तुम्हाला झालेली सर्दी फक्त व्हायरल किंवा तात्पुरती नसून बॅक्टेरिअल इन्फेक्शनमुळे झाली असेल, तर अति थंड पदार्थ खाणे प्रकर्षाने टाळले पाहिजे. यामुळे घशाला अधिक त्रास होऊ शकतो. 

 

सर्दीमध्ये थंड पदार्थ खाणे प्रकर्षाने टाळायला हवे

सर्दी असल्यास थंड खाल्याने तात्पुरता आराम मिळू शकतो. पण जर तुम्हाला कफ झाला असेल तर थंड पदार्थ खाणे टाळणेच योग्य ठरेल. विशेषतः लहान मुलांनी सर्दीमध्ये थंड पदार्थ खाणे टाळायलाच हवे. याऐवजी सर्दी कमी करण्यासाठी किंवा पूर्णपणे बरी करण्यासाठी गरमा गरम वाफाळलेला वेजिटेबल सूप, आलं आणि तुळशीच्या पानांपासून बनलेला काढा, दररोज कोमट पाणी पिणे हे सर्वात उत्तम घरगुती उपाय आहेत. अधिक त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link