
बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा आणि ऐतिहासिक अध्याय लिहिला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून, त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास होकार दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 41 आमदारांनी त्यांना अधिकृत पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली आहे.
पक्षांतर्गत चर्चा आणि बैठकीनंतर सुनेत्रा पवार यांच्या नावावर एकमत झाले असून, वरिष्ठ नेतृत्वानेही त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे उद्या शपथविधी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मुंबईत शपथविधीच्या तयारीला वेग आला असून राजकीय वर्तुळात मोठी हालचाल सुरू आहे.
सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यास, त्या महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. त्यांच्या शांत, संयमी आणि समन्वयक नेतृत्वशैलीमुळे सरकारला स्थैर्य मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केला आहे.
या निर्णयाचा परिणाम केवळ सत्तास्थापनेपुरता मर्यादित न राहता, आगामी राजकीय समीकरणांवरही दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः महिला नेतृत्वाला मिळणाऱ्या या संधीमुळे राज्याच्या राजकारणात नवा संदेश जाणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
आता सर्वांचे लक्ष उद्याच्या शपथविधीकडे लागले असून, महाराष्ट्राच्या राजकारणात हा क्षण ऐतिहासिक ठरणार हे निश्चित मानले जात आहे.






