७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेमार्फत संविधान प्रस्ताविकेचे वाटप

0
12
७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभेमार्फत संविधान प्रस्ताविकेचे वाटप


फलटण : ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने विविध ठिकाणी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाटप करून संविधान जागृती व संविधान जागर करण्यात आला. तालुका शाखेचे कार्यालय सचिव आयु. चंद्रकांत मोहिते यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला.
भारतीय बौद्ध महासभेच्या BSI मिशन २५ अंतर्गत संविधान जनजागृती व जागर अभियान फलटण तालुक्यामध्ये सातत्याने राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून संविधान प्रत व संविधान प्रस्ताविकेचे वाटप करून नागरिकांमध्ये संविधानाबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
या उपक्रमाअंतर्गत फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष आयु. समशेरसिंह नाईक निंबाळकर, मुख्याधिकारी आयु. निखिल जाधव, नगरसेवक आयु. सोमाशेठ जाधव तसेच नगरसेविका आयु. अस्मिता लोंढे यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत भारतीय संविधानाची प्रास्ताविका भेट देण्यात आली.
तसेच फलटण शहर पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक आयु. आयोध्या घोरपडे, पोलीस कॉन्स्टेबल आयु. संध्या वलेकर यांच्यासह धम्ममित्र बालसंस्कार वर्ग, सोमवार पेठ, फलटण येथील बालवर्गातील विद्यार्थी, उपासक-उपासिका व ग्रामस्थांनाही भारतीय संविधानाची प्रास्ताविका वितरित करण्यात आली.
या कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) चे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे उपस्थित होते.
याचप्रसंगी धम्ममित्र बालसंस्कार वर्ग, सोमवार पेठ, फलटण येथील बाल संस्कार वर्गाला भारतीय संविधानाची प्रत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ भेट म्हणून देण्यात आला.