
फलटण :- फलटण नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासह स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीची अधिकृत घोषणा उद्या होणार आहे. या पार्श्वभूमीवर स्वीकृत नगरसेवक पदासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेची तपासणी सध्या फलटण येथील उपविभागीय कार्यालयात सुरू आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी ठरवून दिलेल्या पात्रता निकषांची काटेकोर अंमलबजावणी करणे संबंधित अधिकाऱ्यांवर बंधनकारक आहे. मात्र पात्रतेत त्रुटी असतानाही काही उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे स्वीकारून त्यांचे अर्ज मंजूर करण्याचे कथित षडयंत्र सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. जर अशा प्रकारे अपात्र उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र मंजूर करण्यात आले, तर फलटण तालुका व शहर शिवसेनेच्या वतीने या निवडीला हायकोर्टात आव्हान दिले जाईल, अशी माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे सध्या फलटण तालुका व शहरातील काही शासकीय अधिकारी एका विशिष्ट पक्षाचे मांडलिक असल्याप्रमाणे वागत असल्याचे चित्र दिसून येत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला आहे. प्रत्यक्षात शहर व तालुक्यात कार्यरत असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पूर्णपणे निरपेक्ष व पारदर्शक पद्धतीने कामकाज करणे अपेक्षित असते. मात्र फलटण शहर व तालुक्यात तसे होत नसल्याचा अनुभव अनेक नागरिकांना येत असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर जर निकष डावलून कोणी स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा प्रयत्न केला, तर त्याविरोधात निश्चितपणे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याशी संपर्क साधून शिवसेनेचे पदाधिकारी हायकोर्टात दाद मागतील, असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या चुकीच्या निर्णयाबद्दल जबाबदार धरून ‘धडा शिकवला जाईल’, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.








