मुधोजी महाविद्यालयात ‘श्रीमंत शिवाजी राजे करंडक’ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा

0
17
मुधोजी महाविद्यालयात ‘श्रीमंत शिवाजी राजे करंडक’ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा दिमाखदार उद्घाटन सोहळा


फलटण प्रतिनिधी :- दि. १६ जानेवारी २०२६ — मुधोजी महाविद्यालयात आज श्रीमंत शिवाजी राजे करंडक २०२५–२६ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे भव्य उद्घाटन उत्साहात पार पडले. या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटक म्हणून संस्थेचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम होते.
या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ. भोसले वाय. एस., आय.क्यू.ए.सी. विभागप्रमुख डॉ. टी. पी. शिंदे, राज्य स्पर्धा समितीचे चेअरमन प्रा. वेळेकर, समितीचे सर्व सदस्य, स्पर्धेचे प्रायोजक श्री. विराज नाईक निंबाळकर यांच्या वतीने उपस्थित प्रा. डॉ. सविता नाईक निंबाळकर, परीक्षक, वरिष्ठ, कनिष्ठ व आय.टी. विभागातील प्राध्यापक, महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतून आलेले स्पर्धक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजी राजे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात स्पर्धा समितीचे चेअरमन प्रा. वेळेकर यांनी स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
उद्घाटक श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या भाषणात श्रीमंत मालोजीराजे व श्रीमंत शिवाजी राजे यांच्या कार्याचा आढावा घेत मुधोजी महाविद्यालयाने वक्तृत्वाची समृद्ध परंपरा जपल्याचे गौरवोद्गार काढले. महाराष्ट्राच्या विविध भागांतून स्पर्धक आवर्जून सहभागी होत असल्याने ही परंपरा पुढे नेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचा आढावा घेत सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. मुधोजी महाविद्यालय व फलटण एज्युकेशन सोसायटीने महाराष्ट्राला अनेक नामवंत वक्ते दिल्याचे नमूद करून, प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या वक्तृत्वातून महाविद्यालयाची ओळख निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा ही विद्यार्थ्यांसाठी पर्वणी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. संग्राम निंबाळकर यांनी आभार मानले, तर सूत्रसंचालन प्रा. सौ. देशमुख एन. डी. यांनी केले. अशा प्रकारे राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.