
Fruits For People With Diabetes Is Healthy Or Not?: आजकाल मधुमेह टाळण्यासाठी तसेच वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारातून साखर वर्ज करण्याचा ट्रेंडच सुरू आहे. पण शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात रहावी किंवा एक निरोगी आहार म्हणून फळांचे सेवन केले जाते. साखर, मिठाई, चॉकलेट यांपासून दूर राहणे आरोग्यासाठी चांगले असले, तरी त्याऐवजी गोड म्हणून फळे खाणे अडचणीत टाकू शकते. तज्ज्ञांच्या मते, फळे आरोग्यदायी असली तरी ती जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील साखर वाढण्याचा धोका निर्माण होतो.
रिफाइंड साखर टाळण्यासाठी आहारात गोड फळांचा समावेश करावा का?
बहुतेक फळांमध्ये नैसर्गिक साखर (Fructose) असते. केळी, आंबा, द्राक्षं, चिकू, सीताफळ यांसारख्या गोड फळांचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास त्यांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. यामुळे ब्लड शुगर लेव्हल अचानक वाढू शकते. विशेषतः मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी हे अधिक धोकादायक ठरू शकते. त्यामुळे रिफाइंड साखर टाळण्यासाठी गोड फळांचे सेवन करणे हा एक आरोग्यदायी पण धोकादायक निर्णय असू शकतो. पण तुम्ही गोड फळांचे सेवन योग्य त्या प्रमाणात केल्यास फायदेशीर ठरू शकते.
फळांचा रस किंवा सरबत पिणे अधिक आरोग्यदायी असते का?
याशिवाय अनेकजण फळांचा रस किंवा सरबत पिणे अधिक आरोग्यदायी समजतात. मात्र जेव्हा फळांचा रस बनवताना फक्त रस उपयोगात आणला जातो आणि फळांचा चोथा फेकून दिला जातो. सफरचंद, संत्रे, चिकू, पेरू अशा अनेक फळांच्या सालींमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. जे पोटाच्या आरोग्यासाठी तसेच संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानले जाते. फळांच्या रसामध्ये साल नसल्याने त्यात फायबर नसून फक्त साखर असते. ही साखर थेट रक्तात जाते. त्यामुळे अनेक जणांनी त्यांच्या आहारातून साखर पूर्णपणे वर्ज केली असली तरी त्यांना मधुमेह होण्याची शक्यता वाढते.
फळे योग्य वेळेला आणि योग्य प्रमाणात खाणे गरजेचे
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, फळे योग्य वेळेला आणि योग्य प्रमाणात खाणे गरजेचे आहे. सकाळी किंवा दुपारच्या जेवणानंतर एक वाटी फळे खाणे योग्य मानले जाते. रात्री उशिरा किंवा सतत फळे खात राहणे टाळायला हवे. तसेच, फळांसोबत काही प्रमाणात ड्रायफ्रूट्स घेतल्यास शुगर नियंत्रित राहते. पण सतत किंवा फक्त फळे खाणे टाळायला हवे. तसेच तुम्हाला डाएट किंवा उत्तम आरोग्यासाठी आहारात फळांचा समावेश करायचा असेल तर अनुभवी आहार तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)








