
Vitamin D For Health: आजकालच्या अस्वस्थ जीवनशैलीमुळे प्रत्येकजण आरोग्याच्या कोणत्या न कोणत्या समस्यांना सामोरे जात आहे. काही समस्या अशा आहेत आहेत ज्या सर्वांमध्ये सारख्या आहेत. जसे की शरीरात अनेक पोषण तत्त्वांची कमी असणे त्यातील मुख्य पोषक तत्त्व म्हणजे व्हिटॅमिन डी. शरीरात व्हिटॅमिन डीची कमी जाणवल्यास हाडे आणि स्नायू दुखणे, थकवा आणि अशक्तपणा येणे, त्वचेच्या समस्या येणे; एवढेच काय तर लहान मुलांना मुडदूस आणि प्रौढांना ऑस्टिओमॅलेशिया या गंभीर समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे यापासून वाचण्यासाठी शरीरातील व्हिटॅमिन डीची कमी भरून काढणे आवश्यक आहे. पण व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी किती आणि कोणत्या वेळी उन्हात बसायला हवे हे माहीत असणे आवश्यक आहे.
तुम्ही उपचारासाठी जेव्हा केव्हा डॉक्टरकडे जाता तेव्हा व्हिटॅमिन डीची गोळी घेण्याचा किंवा उन्हात चालण्याचा सल्ला आवर्जून दिला जातो. तसेच सकाळच्या उन्हात जास्त व्हिटॅमिन डी मिळतो असे म्हटले जाते. पण खरे तर व्हिटॅमिन डी तेव्हा मिळते जेव्हा आपली त्वचा सूर्याच्या यूवी-बी किरणांच्या संपर्कात येते. जे सूर्याच्या प्रखर किरणांमध्ये असते. आणि सकाळचे म्हणजेच 7 ते 8 वाजताचे ऊन तेवढे प्रखर किंवा परिणामकारक नसते.
व्हिटॅमिन डी मिळवण्याची योग्य वेळ कोणती?
तज्ज्ञांच्या मते व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी सर्वात योग्य वेळ म्हणजे दुपारची वेळ. सकाळी 10 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंतचे ऊन अधिक परिणामकारक मानले जाते. यावेळी सूर्याची किरणे सरळ पृथ्वीवर पडत असतात. त्यामुळे यावेळेची सूर्यकिरणे अधिक प्रखर आणि यूवी-बी किरणांनी भरपूर असतात. जे त्वचेच्या खाली असलेल्या कोलेस्ट्रोलचे रूपांतर व्हिटॅमिन डीमध्ये करण्यास मदत करतात. पण ऊन्हात कितीवेळ थांबल्याने व्हिटॅमिन डी योग्यप्रमाणात मिळेल यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
त्वचेच्या रंगाप्रमाणे कोणी, किती ऊन घ्यावे?
उजळ त्वचेमध्ये मेलेनिन कमी प्रमाणात असते. त्यामुळे जर तुमची त्वचाही उजळ रंगाची असले तर तुम्ही 15 ते 20 मिनिटे ऊन्हात थांबले पाहिजे. याउलट सावळ्या रंगाच्या त्वचेमध्ये मेलेनिनचे प्रमाण जास्त असते. जे सूर्याच्या यूवी-बी किरणांना रोखू शकते. त्यामुळे सावळ्या रंगाची त्वचा असणाऱ्या व्यक्तिंनी ऊन्हामध्ये जास्तीत जास्त 30 ते 45 मिनिटे थांबयला हवे. तसेच वाढत्या वयासह त्वचेची व्हिटॅमिन डी शोषून घेण्याची आणि तयार करण्याची क्षमता कमी होते. यामुळे प्रौढांनी आणि वयोवृद्ध व्यक्तिंनी शक्य तितके जास्तवेळ ऊन्हात थांबावे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही सनस्क्रिन लावून ऊन्हात थांबत असाल तर त्वचेला व्हिटॅमिन डी शोषून घेणे कठीण होईल. यामुळे तुम्ही कितीहीवेळ ऊन्हात थांबलात तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. तसेच काचेच्या खिडकीजवळ बसून ऊन घेणे टाळा. कारण काच ऊन्हातील यूवी-बी किरणांना तुमच्या त्वचेपर्यंत येण्यापासून रोखते.
शरीरासाठी व्हिटॅमिन डी का आवश्यक आहे?
आपल्या शरीराच्या निरोगी आरोग्यामध्ये व्हिटॅमिन डीची मोठी भूमिका आहे. व्हिटॅमिन डी शरीराला कॅल्शियम आणि फॉस्फेट हे सर्वात आवश्यक तत्त्व शोषून घेण्यास मदत करते. जे हाडे मजबूत करण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य राखण्यासाठी आवश्यक असते. तसेच व्हिटॅमिन डीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. एवढेच काय तर मेंदूच्या आरोग्यासाठी देखील व्हिटॅमिन डी फायदेशीर ठरते.
(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)






