फलटण_महिला_डॉक्टर_आत्महत्या_प्रकरण : आरोपींवर कडक कारवाई व्हावी; विरोधकांचे घाणेरडे राजकारण बंद करावे – आमदार सचिन पाटील

0
25
फलटण_महिला_डॉक्टर_आत्महत्या_प्रकरण : आरोपींवर कडक कारवाई व्हावी; विरोधकांचे घाणेरडे राजकारण बंद करावे – आमदार सचिन पाटील

फलटण – उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात योग्य तपास सुरू असून यातील आरोपींवर कडक कारवाई व्हावी, ही आमची ठाम भूमिका आहे. मात्र या प्रकरणावरून विरोधकांकडून सुरू असलेले घाणेरडे राजकारण थांबवावे, असा टोला आमदार सचिन पाटील यांनी लगावला.

माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूपराजे खर्डेकर, शिवसेनेचे विराज खराडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, तसेच विजय मायने, भीमदेव बुरुगले, रामभाऊ ढेकळे, अभिजित नाईक-निंबाळकर, राहुल निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

आ. पाटील म्हणाले की, “महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण अत्यंत दुर्दैवी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी विशेष एसआयटी चौकशी नेमली असून, सत्य नक्कीच समोर येईल. मात्र विरोधक या दुर्दैवी घटनेचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमचे नेते माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर विनाकारण आरोप केले जात आहेत.”

या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यासाठी रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गजानन चौकात जाहीर सभेत पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रश्नांना थेट उत्तर देणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. “ज्यांना प्रश्न विचारायचे आहेत, त्यांनी या सभेला नक्की उपस्थित राहावे,” असेही त्यांनी आवाहन केले.

फलटणचा विकास हाच आमचा मुख्य अजेंडा असल्याचे सांगत आ. पाटील म्हणाले, “विरोधकांनी आरोप-प्रत्यारोप सोडून विकासाच्या मुद्यांवर चर्चा करावी. फलटण शहराचे रस्ते दर्जेदार बनवून संपूर्ण शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा आमचा निर्धार आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली निरा-देवघर प्रकल्प, आरोग्य सुविधा आणि रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच फलटण तालुका शंभर टक्के ओलीता खाली येईल.”

आगामी पंचायत समिती व नगरपालिका निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढविण्यात येणार असून, मित्र पक्षांसोबतची चर्चा सुरू आहे. “या निवडणुकीत शंभर टक्के विजय महायुतीचा होईल,” असा आत्मविश्वास आमदार सचिन पाटील यांनी व्यक्त केला.