फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या: SIT तपास सुरू

0
30
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या: SIT तपास सुरू

फलटण प्रतिनिधी :- फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणात SIT गठीत करण्यात आली आहे. या SITचे नेतृत्व IPS अधिकारी तेजस्वी सातपुते करणार आहेत. SITला तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

तेजस्वी सातपुते हे 2012 साली आयपीएस अधिकारी झाले असून त्यांनी सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. त्यांच्या अनुभवाचा विचार करता, या प्रकरणाचा तपास त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

फलटण प्रकरणात काही राजकीय नावांचा समावेश असल्यामुळे विरोधकांनी SIT चौकशी करण्याची मागणी केली होती. सातारा पोलिसांकडे तपास झाल्यास दबाव निर्माण होऊ शकतो, म्हणून SIT चौकशीची मागणी करण्यात आली होती.

23 ऑक्टोबर रोजी फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने हातावर सुसाईड नोट लिहिली होती, ज्यात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. दोघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आणि सातारा जिल्हा कारागृहात हलवण्यात आले आहे.

महिला डॉक्टरने तिच्यावर वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस यांचा दबाव असल्याची तक्रार केली होती. पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यासाठी खासदारांच्या दोन पीएंनी दबाव टाकल्याचा उल्लेख तिने केला होता. मात्र तिच्या तक्रारीकडे पोलिस आणि आरोग्य अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. यामुळे ती शेवटी आत्महत्येस प्रवृत्त झाली.