
फलटण प्रतिनिधी – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली “राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना” राबविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
या समितीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) हे सदस्य सचिव असून, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, महानगरपालिका उपायुक्त, सांस्कृतिक संचालनालयाचे सहाय्यक संचालक आणि जिल्हा समाजकल्याण अधिकारी हे सदस्य म्हणून समाविष्ट आहेत.
या समितीत अशासकीय सदस्य म्हणून लोकप्रिय जेष्ठ निर्माता आणि निवेदक अविनाश उर्फ राजाभाऊ शिरसाठ यांची निवड करण्यात आली आहे. ते गेल्या २१ वर्षांपासून आपल्या ऑर्केस्ट्रा संचाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात ३००० हून अधिक कार्यक्रम सादर करत आहेत. आपल्या निर्मिती आणि हृद्यस्पर्शी निवेदनातून त्यांनी लोकमनोरंजनासोबत लोकप्रबोधन घडवून शिव, शाहू, फुले, आंबेडकरी विचारांचा प्रभावी प्रचार आणि प्रसार केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची समितीत निवड करण्यात आली आहे.




