रमाईंच्या त्यागामुळेच बाबासाहेब महानतेच्या शिखरावर! –  आयु. सोमिनाथ घोरपडे

0
66
रमाईंच्या त्यागामुळेच बाबासाहेब महानतेच्या शिखरावर! –  आयु. सोमिनाथ घोरपडे


फलटण (प्रतिनिधी) – भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने आयोजित वर्षावास प्रवचन मालिकेतील सोळावे पुष्प मौजे समतानगर (विडणी) येथे भावपूर्ण वातावरणात गुंफण्यात आले. धम्मगुरू पूज्य भदंत काश्यप यांना पंचांग प्रणाम करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
या वेळी “त्यागमूर्ती माता रमाई यांचे जीवनचरित्र” या विषयावर प्रेरणादायी प्रवचन फलटण तालुक्यात भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बौद्ध धम्माचे पहिले रोपटे लावणारे व त्याला वटवृक्षात रूपांतरित करणारे प्रवचनकार आयु. सोमिनाथ घोरपडे सर यांनी दिले.
त्यांनी रमाईंचा त्यागमय जीवनाचा पट उलगडून दाखवला. बाबासाहेबांच्या शिक्षणप्रवासात रमाईंचा त्याग, गरिबीतूनही दाखवलेले धैर्य, कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलत पतीच्या महान कार्यासाठी दिलेली साथ या सगळ्या प्रसंगांनी उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी आणले.थॉट्स ऑन पाकिस्तान’ हा आपला ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्या ‘प्रिय रामू’ला अर्पण केला. अर्पणपत्रिकेत बाबासाहेबांनी लिहिले आहे की, ‘‘तिच्या हृदयाचा चांगूलपणा, मनाची कुलीनता आणि शीलाच्या पावित्र्यासह तिचे शालीन मनोधैर्यनी माझ्याबरोबर दुःख सोसण्याची तिची तयारी अशा दिवसांत तिने मला दाखविली- जेव्हा मी नशिबाने लादलेला मित्रविरहित काळ चिंतेसह कंठीत होतो. या बिकट परिस्थितीत साथ देणाऱ्या रामूच्या आठवणींत कोरलेले हे प्रतीक…’’अशी भावना व्यक्त केली.
पूज्य भदंत काश्यप यांनी उपासकाने भिक्षूंना केलेली याचना पाली भाषेत सादर करून तिचे सविस्तर विश्लेषण केले.हीच याचना बौद्ध उपासकाच्या जीवनातील प्रारंभबिंदू असून त्यातून नैतिक, सामाजिक व आध्यात्मिक शिस्त अंगीकारली जाते.याचनामधील पाली भाषेतील शब्द साधे असले तरी त्यांच्या मागील अर्थामुळे उपासकाच्या जीवनात प्रचंड परिवर्तन घडते. यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु. महावीर भालेराव सर यांनी रमाईच्या जीवन कार्यांवर प्रकाश टाकणारे सुंदर गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले.
या प्रसंगी फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु. महावीर भालेराव सर, महासचिव आयु. बाबासाहेब जगताप सर, कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे सर, संस्कार सचिव आयु. बजरंग गायकवाड सर, प्रचार व पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे सर, पंचशील मित्र मंडळाचे पदाधिकारी तसेच बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कार सचिव आयु. बजरंग गायकवाड सर यांनी केले.
प्रवचनानंतर उपस्थितांनी माता रमाईंना वंदन करून त्यांच्या त्यागमय जीवनातून प्रेरणा घेण्याचा संकल्प व्यक्त केला.