बारामतीत कारच्या काचा फोडून ३ लाखांची रोकड लंपास – नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

0
14
बारामतीत कारच्या काचा फोडून ३ लाखांची रोकड लंपास – नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

बारामती : शहरात दिवसाढवळ्या गुन्हेगारी वाढत असल्याचे धक्कादायक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे. भिगवण रस्त्यावर उभी असलेली कार फोडून त्यामधील तब्बल ३ लाखांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. सोमवारी (दि. २२ सप्टेंबर) घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

संपत सोपान शिंगाडे (रा. काटेवाडी, ता. बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांनी बँक ऑफ इंडिया मधून तीन लाख रुपये काढून कारमध्ये ठेवले होते. त्यानंतर खरेदीसाठी दुकानात गेले असता अज्ञात चोरट्यांनी कारच्या काचा फोडून रोकड लंपास केली. घटनेनंतर त्यांनी तात्काळ बारामती शहर पोलिसांना माहिती दिली.

या संदर्भात पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. प्राथमिक तपासानुसार, हा प्रकार परप्रांतीय चोरट्यांकडून घडल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांत कारच्या काचा फोडून झालेली ही दुसरी चोरी असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी अशा घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.