साताऱ्यातील राजकीय समीकरणात मोठा ट्विस्ट : रामराजे नाईक निंबाळकरांचा गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे?

0
14
साताऱ्यातील राजकीय समीकरणात मोठा ट्विस्ट : रामराजे नाईक निंबाळकरांचा गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे?

सातारा (साहस Times): देशात आणि राज्यात सत्तेसाठी सुरू झालेली राजकीय मिसळ आता तालुकास्तरावर देखील पोहोचली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण विकासाची दिशा ठरवणाऱ्या जिल्हा परिषदेवर सत्ता काबीज करण्यासाठी राजकीय तडजोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर फलटणमधील माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचा गट अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे.

गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राजे गट महाविकास आघाडीच्या बाजूने उभा राहिला होता. पण माळेगाव कारखाना निवडणुकीपासूनच घडामोडी बदलल्या. फलटण मतदारसंघ भाजपने ऐनवेळी अजित पवारांना सोडल्याने भाजपचे सचिन कांबळे पाटील यांना घड्याळ चिन्हावर लढावे लागले. अजित पवार यांच्या प्रचाराच्या जोरावर त्यांना विजय मिळवता आला आणि राजे गटाच्या तीन दशकांच्या सत्तेला धक्का बसला. यानंतर राजे गटातील अनेक नेते भाजप वा राष्ट्रवादीत दाखल झाले.

दरम्यान, साताऱ्याच्या जिल्हा परिषदेवर याआधी काँग्रेस व नंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची सत्ता होती. पण अलीकडील निवडणुकांनंतर भाजपचे वर्चस्व वाढले असून राष्ट्रवादी मागे पडत चालली आहे. भाजपकडे जिल्ह्यात ४ आमदार तर राष्ट्रवादी व शिवसेनेकडे प्रत्येकी २-२ आमदार आहेत. उदयनराजे भोसले लोकसभेतून भाजपकडून, तर नितीन पाटील राज्यसभेतून राष्ट्रवादीकडून खासदार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेवर सत्ता मिळवण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न सुरू आहेत.

यासाठी त्यांनी माजी मंत्री दिवंगत विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र उदयसिंह पाटील (कराड दक्षिण) व माण-खटावमधील जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई यांचा पक्षप्रवेश करून घेतला आहे. तरीदेखील भाजपला टक्कर देणे कठीण आहे. अशावेळी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरांचा गट राष्ट्रवादीसोबत गेल्यास साताऱ्याच्या राजकीय समीकरणात मोठा फेरबदल होऊ शकतो.

तथापि, हा निर्णय घेताना अजित पवार यांना फलटण-कोरेगावातील स्थानिक नेते आणि राजे गटाच्या विरोधात भूमिका घेतलेल्या दिग्गजांचा विचार करावा लागणार आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या हालचालींवर साताऱ्याचे संपूर्ण राजकारण अवलंबून राहणार आहे.