नातेपुते :संपूर्ण जगाला शांती, समता, बंधुत्व आणि सलोख्याचा संदेश देणारे प्रेषित पैगंबर मोहम्मद साहेब यांच्या १५०० व्या जयंतीनिमित्त नातेपुते शहरातील शाही मस्जिद येथे समाजाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर २४ ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पार पडले.
यंदाचा ईद-ए-मिलाद कार्यक्रम युवक वर्गाच्या जबाबदारीत असल्याने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. “रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” ही संकल्पना मनाशी बाळगून ज्येष्ठ, युवक व महिला अशा सर्व स्तरातील नागरिकांनी सहभाग घेतला. सायंकाळपर्यंत तब्बल ४१५ रक्तदात्यांनी रक्तदान करून एकता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला.
सर्वधर्मीय समाजबांधवांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविधतेत एकतेचे प्रतीक घडवले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवकांनी मोठी मेहनत घेतली. शाही मस्जिदचे धर्मगुरू आलिम मेराज शम्सी साहेब (किब्ला) यांनी रक्तदाते व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.