सातारा : सातारा शहरापासून काही अंतरावर ठोसेघरजवळ सह्याद्रीच्या पर्वतरांगेत वसलेला स्टेप धबधबा सध्या पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरू लागला आहे. येथील पाझर तलावावर कृत्रिम पद्धतीने टाकलेले स्टेप्स आणि त्यातून निर्माण झालेला शुभ्र धबधबा हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरत आहे.
पावसाळ्यात हिरव्या शालूने सजलेली सह्याद्रीची रांग, धबधब्याच्या आजूबाजूला पसरलेली धुक्याची चादर, रिमझिम पावसात भिजणारा परिसर, थंड वाऱ्याची झुळूक आणि निसर्गसौंदर्याने भारावलेले वातावरण पर्यटकांना मंत्रमुग्ध करत आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना जणू एखाद्या स्वप्नवत दुनियेत आल्याचा अनुभव मिळतो.
विशेषतः शनिवार-रविवारी तसेच सुट्ट्यांच्या दिवशी येथे पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते. स्थानिक लोकांसोबतच बाहेरून येणारे पर्यटकही येथे काही वेळ निसर्गाच्या सानिध्यात रमून जातात.
साताऱ्याजवळील निसर्गाच्या कुशीत काही शांत, निसर्गरम्य आणि ताजेतवाने क्षण घालवायची इच्छा असणाऱ्यांसाठी स्टेप धबधबा हे ठिकाण एक उत्तम पर्याय ठरत आहे. शहरांच्या गोगटातून बाहेर पडून मनाला शांतता देणारे हे ठिकाण सध्या ‘विकेंड गेटवे’ म्हणून झपाट्याने लोकप्रिय होत आहे.
,