सावधान! नायलॉन मांजाचा वापर धोकादायक – फलटणमध्ये पोलीसांची कारवाई सुरू

0
21
सावधान! नायलॉन मांजाचा वापर धोकादायक – फलटणमध्ये पोलीसांची कारवाई सुरू

फलटण, साहस Times प्रतिनिधी :- नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर पतंग उड्डाणाचा उत्साह चांगलाच वाढला असताना, फलटण शहरात नायलॉन / चायना मांजाचा वापर करणे अनेकांसाठी जखमांचे कारण ठरू लागले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुले आणि युवक मोठ्या संख्येने पतंग उडवीत आहेत. मात्र काहीजण चुकीच्या प्रकारच्या मांजाचा वापर करून स्वतःसह इतरांच्या सुरक्षेला धोका निर्माण करत आहेत.

फलटण शहर पोलिस ठाण्यात २०२४ मध्ये अशाच प्रकारच्या मांजाच्या वापरामुळे खालीलप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले होते –

  • ९ ऑगस्ट २०२४: उंब्रेश्वर चौक येथे रेवणसिद्ध यादवतेजस कांबळे यांच्याकडून नायलॉन मांजा मिळाल्याने गु.नं. ३९९/२०२४, कलम २२३, ३(५) भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल.
  • ९ ऑगस्ट २०२४: मेटकरी गल्ली येथे शाहरुख काझी यांच्या विरोधात गु.नं. ३९६/२०२४, कलम २२३, १२५ अंतर्गत गुन्हा दाखल.
  • ९ ऑगस्ट २०२४: रानडे पेट्रोल पंपासमोरील घटनेत दिपक लांडगे हे नायलॉन मांजामुळे गंभीर जखमी. याबाबत अज्ञात आरोपीविरुद्ध गु.नं. ४००/२०२४ दाखल.

यासोबतच पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौकात आणखी एक नागरिक जखमी झाल्याची नोंद आहे. त्यामुळे फलटण शहर पोलीसांनी चायना व नायलॉन मांजावर बंदी आणण्यासाठी व्यापक मोहीम सुरु केली आहे. पतंग दोऱ्याचे विक्रेते, अपार्टमेंट्स, वसाहती याठिकाणी तपासण्या सुरू आहेत.

आज दिनांक १८ जुलै २०२५ रोजी सोमवार पेठ, मंगळवार पेठ येथे सायंकाळी ६ वाजता पतंग उडवत असलेली काही अल्पवयीन मुले पोलिसांना पाहून पळून गेली. त्यांनी टाकून दिलेल्या पतंगाच्या दोऱ्यांमध्ये नायलॉनच्या चार रीळा आढळून आल्या असून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. मुलांचा शोध सुरू आहे.

मोलाची सूचना
नायलॉन / चायना मांजा केवळ मानवासाठीच नव्हे तर पक्षी व प्राणी यांच्यासाठीही जीवघेणा ठरतो. त्याचा वापर पर्यावरणविरुद्ध असून, महाराष्ट्र शासनाने त्यावर बंदी घालणारी अधिसूचना लागू केली आहे. याची अंमलबजावणी पोलीस, महसूल, वनविभाग व अन्य यंत्रणा करत आहेत.

नायलॉन किंवा चायना मांजाचा वापर गुन्हा असून, भारतीय न्याय संहिता, २०२३ अंतर्गत संबंधितांवर कडक कारवाई केली जाते. पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे. कोणी असा मांजा वापरताना आढळल्यास टोल फ्री ११२ किंवा फलटण पोलीस ठाणे – ०२१६६ २२२३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.