शशिकांत शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

0
125
शशिकांत शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा

सातारा – महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर ठसा उमटवणारे अनुभवी नेते आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाच्या १५जुलै २०२५ रोजी पार पडलेल्या अधिकृत बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.

या निवडीमुळे पक्षात नवचैतन्य संचारल्याचे चित्र असून, सध्याच्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अधिक प्रभावी ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यापूर्वी प्रदेशाध्यक्षपदी कार्यरत असलेले ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

शशिकांत शिंदे हे कोरेगाव मतदारसंघाचे माजी आमदार असून सध्या विधानपरिषदेचे सदस्य आहेत. त्यांनी राज्यात जलसंपत्ती मंत्री म्हणूनही काम पाहिले आहे. माथाडी कामगार, कृषी व ग्रामीण विकास क्षेत्रातील त्यांचे योगदान विशेष मानले जाते. पक्षाशी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे.

पक्षात संघटनात्मक मजबुती, तरुण नेतृत्वाचे मार्गदर्शन आणि जनतेशी प्रत्यक्ष संवाद वाढवण्यासाठी शिंदे यांचे नेतृत्व निर्णायक ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.