खडकवासला धरणाजवळ प्रेमीयुगुलाची आत्महत्या; घरच्यांच्या विरोधामुळे घेतला टोकाचा निर्णय?

0
16
खडकवासला धरणाजवळ प्रेमीयुगुलाची आत्महत्या; घरच्यांच्या विरोधामुळे घेतला टोकाचा निर्णय?

पुणे : पुणे शहर पुन्हा एकदा एका हृदयद्रावक घटनेने हादरले आहे. खडकवासला धरणाजवळील जंगलात एका अल्पवयीन मुली आणि तिच्या प्रियकराचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दोन ते तीन वर्षांपासून प्रेमसंबंधात असलेल्या या युगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

ही घटना गुरुवारी (ता. 10 जुलै) रात्रीच्या सुमारास घडली असून, शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास ही बाब उघडकीस आली. मृत तरुण-तरुणीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या प्रेमसंबंधांना विरोध केला असल्यामुळे दोघांनी आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

प्रकरणाची माहिती अशी की, 16 वर्षीय अक्षरा हिला तिच्या बहिणीने क्लाससाठी 93 अव्हेन्यूजवळ सोडले होते. मात्र क्लास संपल्यानंतर ती परत आली नाही. तिचा शोध घेतल्यानंतर ती न सापडल्याने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी तपास सुरू केला आणि संशयित संतोष कळसाईत या तरुणाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा मोबाईल बंद आढळला.

दरम्यान, उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खडकवासला बॅक वॉटरजवळील जंगलात एक तरुण आणि तरुणीचे मृतदेह आढळून आले. पोलिसांनी हे वृत्त तातडीने वानवडी पोलिसांना कळवले. ओळख पटवल्यानंतर समोर आले की मृत दोघेही प्रेमसंबंधात होते.

विशेष म्हणजे मृत तरुणाचा मृतदेह पाहताना त्याची जीभ बाहेर आलेली होती, ज्यामुळे या प्रकरणात घातपाताची शक्यताही वर्तवली जात आहे. शवविच्छेदन अहवालानंतरच नेमकी कारणमीमांसा स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

ही घटना फक्त एका प्रेमप्रकरणाचा शेवट नाही, तर समाजात अजूनही प्रेम, विशेषतः अल्पवयीन मुला-मुलींमध्ये घरच्यांकडून मिळणाऱ्या विरोधामुळे किती टोकाची पावलं उचलली जातात, याचे एक भयावह उदाहरण आहे.