दौंड तालुका : केडगाव परिसरात गुरुवारी सकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. पती-पत्नीमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आक्रमक कृतीत, एका निष्पाप ११ महिन्यांच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अवघ्या रागाच्या भरात हातून घडलेल्या या घटनेने संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
दौंड तालुक्यातील केडगाव-आंबेगाव पुनर्वसन येथे नितीन मेंगावडे व त्यांची पत्नी पल्लवी यांच्यात घरगुती वाद सुरू होता. या वादात मध्यस्थी करण्यासाठी पल्लवीची जाऊ भाग्यश्री मेंगावडे आपल्या ११ महिन्यांच्या अवधूत बाळाला कडेवर घेऊन आली होती. मात्र वाद तीव्र झाल्यानंतर पल्लवीने घरातील देवीसमोरील त्रिशूळ उचलून पती नितीनवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
हल्ला चुकवण्याच्या नाट्यमय घडामोडीत त्रिशूळ थेट भाग्यश्रीच्या कडेवर असलेल्या अवधूतच्या कपाळात घुसला. गंभीर जखमी अवस्थेत अवधूतला तातडीने केडगाव येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले, आणि तेथून लोणी काळभोर येथे हलवले गेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अवधूत हा भाग्यश्रीचा एकुलता एक मुलगा होता. दोन मुलींनंतर जन्मलेला हा लाडका बाळ असा अकस्मात काळाच्या आधी जाण्याने संपूर्ण मेंगावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या प्रकरणी भाग्यश्री मेंगावडे यांच्या फिर्यादीवरून पल्लवी व नितीन मेंगावडे यांच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.