सातारा | साहस Times :- पावसाळा सुरू झाला की निसर्गाचे सौंदर्य अनेकांना आकर्षित करतं. डोंगरदऱ्या, धबधबे, नद्या, समुद्रकिनारे या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होऊ लागते. मात्र या निसर्ग पर्यटनात ‘थरार’ शोधताना अनेक वेळा जीव गमवण्याची वेळ येते. सातारा जिल्ह्यातील सडावाघापूर येथील उलट्या धबधब्याजवळ बुधवारी (९ जुलै) सायंकाळी घडलेली एक दुर्घटना त्याचेच जिवंत उदाहरण ठरली.
साहिल जाधव (वय २२) हा युवक रील बनवण्यासाठी कार चालवत असताना स्टंट करत होता. मात्र याच थरारात त्याचे नियंत्रण सुटले आणि गाडी थेट सुमारे ३०० फूट दरीत कोसळली. या अपघातात साहिल गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यासोबत गाडीत असलेले तीन मित्र मात्र थोडक्यात बचावले.
दुर्घटनास्थळी जेव्हा प्राथमिक माहिती आली तेव्हा चाक घसरल्यामुळे अपघात झाला असे सांगितले जात होते. मात्र नंतर समोर आलेल्या व्हिडिओमध्ये साहिल स्टंट करताना स्पष्ट दिसतो. त्याचा मित्र मोबाईलमध्ये शूटिंग करत होता. गाडी दरीत जाताच तो ओरडला आणि धावत खाली गेला. गाडी एका झाडाला अडकल्यामुळे ती अधिक खाली गेली नाही, अन्यथा मोठी जीवितहानी झाली असती.
दरम्यान, जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी याआधीच पर्यटनस्थळांवर बंदी घालण्याचे आदेश दिले होते. पण व्यावसायिकांच्या नाराजीमुळे त्यांनी तो आदेश मागे घेत “बंदी नव्हे, तर निर्बंध लागू” असे स्पष्टीकरण दिले होते. मात्र सडावाघापूरच्या घटनेनंतर ही बंदी योग्यच होती, असे मत तयार होत आहे.
तसेच, याच आठवड्यात मुंबई अंधेरी येथील २० वर्षीय युवकासोबत खोपोलीजवळील वॉटरफॉलकडे जाताना धोका निर्माण झाला होता. मात्र ‘यशवंती हायकर्स’ टीमच्या तत्परतेमुळे त्याची सुखरूप सुटका करण्यात आली.
वर्षा पर्यटनाच्या काळात काळजी घेणे गरजेचे पावसाळ्यात अनेक पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी डोंगरदऱ्यांमध्ये जातात. मात्र, अशा प्रवासात अति थरार, अनोळखी मार्ग, निसरड्या पायवाटा यामुळे अपघात घडतात. माहिती नसलेल्या ठिकाणी जाणे, आणि विशेषतः स्टंट करताना जीव गमावण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रशासनाचे नियम आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.