Sunday, September 13, 2026
Homeसाताराफलटण तालुक्यात मुसळधार पावसाचे थैमान; प्रशासन ॲक्शन मोडवर

फलटण तालुक्यात मुसळधार पावसाचे थैमान; प्रशासन ॲक्शन मोडवर

फलटण :- गेल्या काही दिवसांपासून फलटण तालुक्यावर पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

कालचा दिवस हा फलटणवासीयांसाठी अत्यंत भीतीदायक ठरला. अक्षरशः झोडपून काढणाऱ्या पावसामुळे बाणगंगा धरण मे महिन्यातच भरले, ही बाब ऐतिहासिक ठरणारी आहे. बाणगंगा नदीला रौद्ररूप आले असून नदी पात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे शहरातील शनीनगर, दत्तमंदिर परिसर, मलटण व मंगळवार पेठेतील अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. काही ठिकाणी चारचाकी वाहनेही पाण्यात अडकली होती.

या कठीण वेळी फलटणचे महसूल प्रशासन तत्काळ अॅक्शन मोडवर गेले. उपविभागीय अधिकारी आंबेकर मॅडम, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे व नायब तहसीलदार तुषार गुंजवटे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने बचाव व स्थलांतराची कामे वेगाने सुरू केली. या वेळी अनेक राजकीय नेत्यांनीही नागरिकांच्या मदतीसाठी धाव घेतली.

सध्या पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी धोका अजूनही टळलेला नाही. प्रशासन सतर्क आहे व संभाव्य धोका लक्षात घेता पुढील नियोजन सुरू आहे. डॉ. अभिजीत जाधव यांनी सांगितले की, पूर ओसरल्यानंतर स्वच्छता मोहिम राबवावी लागणार असून रोगराईला आळा घालण्यासाठी नगरपरिषदेच्या मदतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments