
RIL Reliance Shares : एखाद्या व्यक्तीवर लक्ष्मी प्रसन्न होणं म्हणजे नेमकं काय असतं किंवा दैनंदिन राशीभविष्यामध्ये लावला जाणारा धनलाभाचा तर्क नेमका कसा असतो हे काही दिवसांपूर्वीच पाहायला मिळालं. जिथं रतन ढिल्लों नामक व्यक्तीला घरातील साफसफाई करताना हाती एक अशी वस्तू लागली, ज्यावर काही क्षण त्यांचाच विश्वास बसेना.
ही वस्तू होती साधारण 36 वर्षांपूर्वीचे रिलायन्स कंपनीचे शेअर. चंदीगढमधील मूळ रहिवासी असणाऱ्या रतन ढिल्लों यांना मिळालेल्या या कागदपत्रांमध्ये 1988 मधील एका मोठ्या व्यवहाराची माहिती मिळाली. जिथं 10 रुपये प्रति शेअर इतक्या दरानं 30 इक्विटी शेअर खरेदी केल्याचं पत्रक त्यांच्यासमोर आलं. आजच्या दरानं या शेअरमधून ढिल्लों यांना 11 ते 12 लाख रुपयांचा लाभ होईल असं सांगितलं गेलं. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच जाणकारांनी ढिल्लों यांच्या X पोस्टवर याबाबतची माहिती दिली होती.
शेअर वाया जाणार?
सोशल मीडियावर ढिल्लों यांची पोस्ट वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाली आणि यानंतर या शेअरचं पुढे काय झालं? हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करत असतानाच त्याबबातची माहितीसुद्धा समोर आली.
खुद्द ढिल्लों यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं, ‘असं वाटतंय की धीरुभाई अंबानी यांची सही आता व्यर्थ जाणार… मी या शेअरचं डिजिटायझेशन न करण्याचा निर्णय घेतला आहे’. सदर प्रक्रिया अतिशय मोठी आणि लांबलचक असून, वारसा हक्काचं एक कायदेशीर प्रमाणपत्र मिळवण्यासाठीच 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागणार आहे तर, IEPFA ही प्रक्रिया 2 ते 3 वर्षांत पार पडेल असं त्यांनी स्पष्ट केलं.
Final Update: It seems Dhirubhai Ambani’s signatures will go to waste, as I’ve decided not to proceed with digitizing the shares.
The process is just too lengthy—obtaining the legal heir certificate alone takes 6-8 months, and the IEPFA process reportedly takes 2-3 years.
— Rattan Dhillon (@ShivrattanDhil1) March 12, 2025
सदर प्रक्रियेसाठी इतका सारा वेळ दवडणं मला फार फायद्याचं वाटत नाही असं सांगत त्यांनी भारतात हा कागदोपत्री व्यवहार अधिक सोपा केला पाहिजे अशी निकडही त्यांनी व्यक्त केली आणि आपण सध्यातरी ही शेअर प्रमाणपत्र सोबतच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.







