
फलटण : दुधातून स्वावलंबन, रोजगार आणि आधुनिकतेची जोड देत फलटणमधील ‘गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या अग्रगण्य संस्थेने आपल्या कार्याचा अभिमानास्पद टप्पा गाठला आहे. संस्थेचा ३० वा वर्धापन दिन अनंत मंगल कार्यालयात विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला.
फलटण तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी, महिला भगिनी तसेच तरुण-तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टाने गेली तीन दशके सेवा बजावत असलेल्या या कंपनीने आज देशपातळीवर ‘गोविंद’ या ब्रँडला वेगळी उंची दिली आहे.
३० वर्षांपूर्वी लावलेले छोटेसे रोप आज वटवृक्षाच्या रूपात बहरले असून, दुग्धजन्य उत्पादनातील नवनवीन प्रयोग, पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची जोड आणि उत्कृष्ट व्यवस्थापन या आधारावर ‘गोविंद मिल्क’ने यशाची नवी शिखरे गाठली आहेत.
या प्रवासामागे श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर (वहिनीसाहेब) यांचे प्रामाणिक समर्पण, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांचे कल्पक नेतृत्व, श्रीमंत सौ. मिथिलाराजे सत्यजीतराजे नाईक निंबाळकर (वाहिनीसाहेब) यांची साथ आणि या ब्रँडचे शिल्पकार मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांचे उत्तम व्यवस्थापन हे यशाचे आधारस्तंभ ठरले आहेत. यासोबतच गोविंद परिवार, शेतकरी आणि हितचिंतक यांचे योगदान मोलाचे मानले जाते.







