सातारा : सिंचन भवनच्या पार्किंगमधील चार वाहने पेटली; कारण अस्पष्ट | पुढारी

0
14









खेड; पुढारी वृत्तसेवा : कृष्णानगर येथील पाटबंधारे विभागाच्या सिंचन भवन इमारतीच्या पार्किंगमध्ये सुमारे 15 ते 20 वर्षांपासून बंद स्थितीत असलेल्या एक सुमो व तीन जीप गुरुवारी दुपारी अचानक लागलेल्या आगीत जळाल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, कृष्णानगर येथील पाटबंधारे विभागाच्या सिंचन भवन इमारतीच्या आवारातील पाण्याच्या टाकीलगत उरमोडी धरण विभाग व सातारा सिंचन विभागाच्या सुमारे 15 ते 20 वर्षांपासून बंद स्थितीत असलेल्या व संबंधित विभागांनी निर्लेखन केलेल्या एक सुमो व तीन जीप पार्क केल्या होत्या. गुरुवारी दुपारी सिंचन भवन इमारतीच्या लगत असलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूने निलगिरी झाडांच्या पालापाचोळ्याला अचानक आग लागली. परिसरात मोठ्या प्रमाणावर पालापाचोळा पडल्याने पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले. त्याचवेळी ही आग बंद स्थितीतील सुमो व जीपच्या टायरला लागली. आगीच्या ज्वाला व धुरामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले.

धुराचे मोठे लोट दिसू लागल्याने पाटबंधारे कार्यालयातील कर्मचारी व परिसरातील लोकांची मोठी गर्दी झाली. याचवेळी येथील पार्किंग मध्ये उरमोडी धरण विभागाची सुस्थितीत असलेली सुमो जीप (क्र एम एच 11 ए.बी.189) व काही कर्मचार्‍यांच्या दुचाकी पार्कींग केल्या होत्या. उरमोडी धरण विभागाचे वाहन चालक नितीन सणस यांनी धाडस दाखवून सुमो व दुचाकी बाहेर काढल्या. त्यामुळे सुस्थितीतील वाहनांचा आगीपासून बचाव झाला. दरम्यान उरमोडी धरण विभागाचे कार्यकारी अभियंता अमर काशीद यांनी सातारा नगर परिषदेच्या अग्निशामक विभागाला या बाबतची माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशामक बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सुमारे दीड तासानंतर आग अटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, बंद स्थितीत असलेल्या या वाहनांच्या लिलावाबाबत संबंधित विभागाने आरटीओ कार्यालयात यापूर्वी पत्रव्यवहार केला होता. अद्याप आरटीओ अधिकार्‍यांकडून याबाबत कोणताही अहवाल आला नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.











Source link