सातारा : मार्चपर्यंत पूर्ण होणार खंबाटकीच्या नव्या बोगद्याची एक लेन | पुढारी

0
29









सातारा; पुढारी वृत्तसेवा : पुणे-बेंगलोर हा देशातील सर्वात वर्दळीचा महामार्ग म्हणून ओळखला जातो. वाहतुकीची वर्दळ आणि अपघात टाळण्यासाठी पुणे-सातारादरम्यान खंबाटकी येथे दोन नव्या जुळ्या बोगद्यांची निर्मिती केली जात आहे.

सद्य स्थितीत कामाचा वेग चांगला असल्याने मार्च 2024 पर्यंत बोगद्याची एक लेन पूर्ण होणार आहे. पुलावरील गर्डर बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून 4 महिन्यांनंतर नागरिकांचा प्रवास हा सुखकर होणार आहे. 2018 रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आहे. सप्टेंबर 2024 ही या कामाची डेडलाईन असून, त्याचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे.

वाहनचालकांना मिळणार दिलासा

दोन बोगदे केल्यानंतर सण व सुट्टीवेळी होणारी वाहतूक कोंडी कमी होणार आहे. बोगद्यांमध्ये अत्याधुनिक यंत्रणा असल्याने इर्मजन्सीवेळी नागरिकांना तत्काळ मदत मिळणार आहे. या बोगद्यांमुळे एस वळण निघाल्याने ब्लॅक स्पॉट संपुष्टात आले आहे. तीव्र चढ किंवा तीव्र उतार हा प्रकारच नसल्याने अपघातांची संख्याही घटणार आहे. एकूणच या बोगद्यांमुळे वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.

बोगद्यात टनेल कंट्रोल सिस्टीम

  •  1148 मीटर लांबीचे दोन बोगदे
  •  11.15 मीटर रुंदी
  •  एलईडी लाईटची व्यवस्था
  •  जेट फॅन व्यवस्था
  •  टनेल कंंट्रोल सिस्टीम
  •  आपत्कालीन व्यवस्था
  •  अग्निशामक यंत्रणा
  •  400 मीटरवर बोगदे एकमेकांना जोडलेले आहेत
  •  वेळे ते खंडाळा अंतर 5 ते 10 मिनिटांत पार करता येणार
  •  इंधन व वेळेची होणार बचत
  •  एस वळण होणार सरळ

तांत्रिक अडचणींमुळे रखडला होता प्रकल्प

खंबाटकी बोगदा पार करताना येणार्‍या एस वळणामुळे येथे हजारो अपघात झाले. हे वळण काढणे व प्रवास गतीमान करण्यासाठी नवीन दोन बोगदे करण्याची संकल्पना मांडण्यात आली. मात्र, ही संकल्पना मांडल्यानंतर अनेक तांत्रिक अडचणी आल्या. डिझाईन, जागा, भूसंपादन यासह अन्य कारणांनी हा प्रकल्प रखडला होता. मात्र, त्यावर मार्ग काढत अखेर त्याचे भूमिपूजन झाले आता हा प्रकल्प आता पूर्णत्वास जाऊ लागला आहे.

खंडाळा-वेळे अंतर 5 मिनिटांत पार

खंबाटकीतील नव्या जुळ्या बोगद्यांमुळे सातार्‍याहून पुण्याकडे येताना व पुण्याहून सातार्‍याकडे जाताना खंडाळा ते वेळे हे अंतर 5 ते 10 मिनिटांत पार करता येणार आहे. सध्या यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. नव्या बोगद्यातून प्रवास केल्यानंतर इंधन व वेळेचीही मोठी बचत होणार आहे.

 











Source link