सातारा : कुणाची दिवाळी तर कुणाचं दिवाळं | पुढारी

0
15


विशाल गुजर

सातारा : सातारा जिल्ह्यातील 64 ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निकालानंतर विजयी उमेदवारांनी दिवाळीअगोदरच फटाके फोडून जल्लोष केला तर दुसरीकडे पराभूत उमेदवारांमध्ये मात्र सन्नाटा पसरला. त्यामुळे कही खुशी कही गम असेच चित्र दिसून आले. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. पराभूत उमेदवार आणि त्याचे समर्थक मतमोजणी केंद्रातून परागंदा झाले. अनेक ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले तर काही ठिकाणी सरपंच एका गटाचा अन् सदस्य दुसर्‍या गटाचे असेही चित्र दिसून आले. एका एका वॉर्डचे जसे जसे निकाल बाहेर येवू लागले तस तसा जल्लोष वाढत गेल्याचे त्या त्या तहसील कार्यालयातील मतमोजणी केंद्रात दिसून आले.

काही ठिकाणी स्थानिक नेतेमंडळींच्या प्रतिष्ठेला धक्का

 जिल्ह्यात 64 ग्रामपंचायतींची मतमोजणी त्या त्या तालुक्यांमध्ये झाली. 57 सरपंचपदांसाठी 146 तर 380 सदस्यपदांसाठी 817 अशा एकूण 963 उमेदवारांना मतमोजणीमुळे सकाळपासूनच धास्ती लागून राहिली होती. या निवडणुकीमुळे बर्‍याच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. निकाल जाहीर होताच गुलालाचे मानकरी ठरल्यानंतर काही ठिकाणी स्थानिक नेतेमंडळींच्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याचे चित्र दिसून आले.

त्या त्या गावात विजयी उमेदवार व कार्यकर्ते सुसाट

मतमोजणी केंद्र तालुक्याच्या ठिकाणी असले तरी पहिल्या दोन तासातच ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. याची माहिती गावातील नेत्यांना मिळाल्यानंतर मिरवणुकांची जय्यत तयारी करण्यात आली. त्यानंतर तालुक्याहून गावात आलेले विजयी उमेदवार व सरपंचांची त्या त्या पॅनेल प्रमुखांनी मिरवणूक काढली. या मिरवणुकीत पदाधिकार्‍यांसह ग्रामस्थांनी सहभाग घेतला होता.

प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सकाळी 10 वाजता मतमोजणी सुरू झाली. परंतु, गावचा निकाल ऐकण्यासाठी पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सकाळी 8 वाजताच मतमोजणी केंद्रावर दाखल झाले. प्रत्यक्षात मतमोजणी उशिरा झाली तरी सकाळी सकाळीच गर्दी झाल्याने पोलिसांना मात्र कसरत करावी लागली.

ज्या गावांच्या निवडणुका लागल्या होत्या त्यामध्ये अनेक गावे संवेदनशील होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा फौजफाटा मतमोजणी केंद्राबाहेर ठेवण्यात आला होता. यावेळी पोलिसांची गाडी व कर्मचारी केंद्रबाहेरच होते. आक्षेपार्ह कृत्य करणार्‍यांना पोलिस हटकत होते. तसेच अति उत्साही कार्यकर्त्यांना दंडुक्याचा प्रसाद देत असल्याचेही दिसून आले.

गुलालाने रस्ते माखले

 निकाल घोषित झाल्यानंतर मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्ते गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा करत होते. त्यामुळे त्या त्या तालुक्यातील मतमोजणी केंद्राबाहेरील रस्त्यांसह परिसरातही कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. त्यामुळे रस्ते गुलालाने माखले होते.

मतमोजणी केंद्राबाहेर जोरदार घोषणाबाजी

अनेक मतमोजणी केंद्रांमध्ये विजयी उमेदवारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. त्याचवेळी काही उत्साही कार्यकर्ते आपला उमेदवार जिंकल्यानंतर केंद्राबाहेर जोरदार घोषणाबाजी करू लागले. पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना समज दिली व केंद्र परिसरातून बाहेर काढले.

कार्यकर्ते देत होते आपल्या नेत्यांना अपडेट

अनेक तालुक्यांमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर कार्यकर्ते निकालाच्या प्रतीक्षेत होते. एकेक ग्रामपंचायत निकाल बाहेर पडू लागला तसतसे विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते मतमोजणी केंद्रातून बाहेर आल्यानंतर आपल्या पदाधिकारी व नेत्यांना फोनवरून माहिती देत होते.
स काही जण ‘आरं सरपंच आपल्या पार्टीचा आलायं पण बाकीच्या समद्या सीटा पडल्यात की रं’ असं सांगत बुचकळ्यात पडत असतानाच सीटा गेल्या तरी सरपंच आमचा हायं, असे म्हणत जल्लोष करणारे कार्यकर्तेही दिसत होते. एक एका वॉर्डचा निकाल जाहीर होत होता.
स या वॉर्डात हा जिंकला, तो पडला, त्याला इतकी मते पडली, आपल्या उमेदवाराला इतकी मते पडली याची माहिती फोनवरूनच दिली जात होती. तर मतमोजणी केंद्राबाहेर असणार्‍या पदाधिकार्‍यांकडून आपल्या नेत्यांना प्रत्येक ग्रामपंचायतीची अपडेट दिली जात होती.

65 सरपंचांना बिनविरोधची लॉटरी

सार्वत्रिक निवडणूक लागलेल्या ग्रामपंचायतींमधील 65 सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. 564 सदस्यही बिनविरोध निवडून आले आहेत.



Source link