वेब वॉच: स्वातंत्र्य चळवळ अन् उषा मेहतांचा ‘रेडिओ’

0
17
वेब वॉच:  स्वातंत्र्य चळवळ अन् उषा मेहतांचा ‘रेडिओ’


सुहास किर्लोस्कर31 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

१९४२ मध्ये ‘भारत छोडो’ आंदोलन सुरू होते, ब्रिटिशांना भारतातून घालवण्यासाठी अनेक जण आपापल्या क्षेत्रात कार्य करत होते. त्यावेळी जनसामान्यांशी संपर्क साधण्यासाठी वृत्तपत्रे, पत्रिका आणि रेडिओ हीच साधने होती. सर्वांकडे रेडिओ नसायचा, पण तो ज्यांच्याकडे आहे, तिथे लोक एकत्र येऊन ऐकायचे.

सत्ताधारी ब्रिटिशांनी आपला अजेंडा राबवण्यासाठी माध्यमांचा वापर केला होता. वृत्तपत्रांमध्ये ब्रिटिशांच्या बाजूने अनेक बातम्या छापल्या जायच्या. रेडिओवर चर्चिलची भाषणे प्रसारित केली जायची. अर्थातच स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणाऱ्यांची भाषणे रेडिओवरून प्रसारित केली जात नव्हती. त्यामुळे चळवळीशी संबंधित पुढचे काही नियोजन केले असेल, तर सर्वांना त्यात भाग घेण्यासाठी माहिती मिळण्याची साधने कमी होती. त्यावर उपाय म्हणून उषा मेहता या युवतीने तीन सहकाऱ्यांच्या मदतीने एक रेडिओ स्टेशन सुरू करून त्यावर स्वातंत्र्य चळवळीतील नेत्यांची भाषणे गुप्तपणे प्रसारित करण्याचे ठरवले.

२७ ऑगस्ट १९४२ रोजी ४२.३४ मीटर्सवर एक रेडिओ स्टेशन सुरू झाले आणि त्यावरून उषा मेहतांचा आवाज ऐकू आला.. ‘नमस्कार, ४२.३४ वर आपण ऐकत आहात काँग्रेस रेडिओ. आज आपण ऐकणार आहोत महात्मा गांधी यांचे भाषण.” त्यानंतर या रेडिओ स्टेशनवर रोज रात्री ८.३० वाजता म. गांधी, राम मनोहर लोहिया, सुचेता कृपलानी अशा नेत्यांची भाषणे ऐकवण्यास सुरूवात झाली. ‘हिंदोस्ता हमारा’ने सुरू होणाऱ्या कार्यक्रमांचा समारोप ‘वंदे मातरम’ गायनाने होत असे. ब्रिट्शांनी या रेडिओ स्टेशनचा शोध घेण्यासाठी मुंबईत शोधमोहीम हाती घेतली. त्यावर मात करण्यासाठी उषा मेहता आणि सहकाऱ्यांनी अडीच महिने काय प्रयत्न केले, याची कहाणी ‘ए वतन मेरे वतन’ या कन्नन अय्यर दिग्दर्शित चित्रपटात उत्तमरीत्या दाखवली आहे. अॅमेझोन प्राइमवर नुकताच रिलीज झालेला हा चित्रपट आवर्जून बघण्याची कारणे अनेक आहेत.

उषा मेहतांसारख्या अनेक ‘अनाम नायकां’चे स्वातंत्र्य मिळवून देण्यात उत्तम योगदान होते. अर्थात १९९८ मध्ये उषा मेहतांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानावरचा हा बायोपिक त्यासाठीच बघावा. कन्नन अय्यर यांचे दिग्दर्शन चित्रपटाच्या विषयाला अनुसरून असल्याने तो विषय सोडून इतरत्र न भटकता उषा मेहतांच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्य चळवळ दाखवतो. स्वातंत्र्य चळवळीमध्ये मेहता या ‘रेडिओ’च्या माध्यमातून आल्या, कारण महात्मा गांधी त्यांचे आदर्श होते आणि त्यांचे एकदा दर्शन व्हावे, हीच मेहतांची महत्त्वाकांक्षा होती. चित्रपटात गांधीजी दोन प्रसंगांत दिसतात, परंतु ते कथेच्या अनुषंगानेच. राम मनोहर लोहियांनी मेहतांना मार्गदर्शन केले आणि त्यांची भाषणे प्रसारित होत असताना, सर्वसामान्य नागरिकांनी या उठावात सहभागी व्हावे, या उद्देशाने रेडिओचा वापरही केला. ते प्रसंग कन्नन अय्यर यांनी उत्तमरीत्या चित्रित केले आहेत.

दरब फारुकी आणि कन्नन अय्यर यांचे पटकथा लेखन चित्रपटाच्या व्हिजनला साजेसे आहे. अन्यथा, असे अनेक हिंदी बायोपिक विषयांतर करून भरकटलेले आपण बघितले आहेत. उत्कर्ष उमेश धोतेकर यांचे पार्श्वसंगीत ठीक आहे. अमलेंदू चौधरी (सायकल, न्यूड फेम) यांची सिनेमॅटोग्राफी उत्तम. विशेषतः प्रकाश योजना कल्पकतेने केली आहे. आवश्यक तेवढाच उजेड आणि त्या काळाला साजेसा रंग चित्रपटाला लाभला आहे. व्हीएफएक्समधून उभी केलेली जुन्या मुंबईसारखी दृश्ये सत्याच्या जवळ नेतात. प्रॉडक्शन डिझाइन आणि वेशभूषा त्या काळामध्ये घेऊन जाण्यात यशस्वी ठरली आहे.

अभिनयाचा विचार करता इम्रान हाश्मीने साकारलेली राम मनोहर लोहियांची व्यक्तिरेखा उत्तम आहे. इम्रानच्या आधीच्या चित्रपटांचा विचार करता प्रेक्षकांना हा धक्का असेल, पण ज्या संयत पद्धतीने त्याने लोहिया साकारले आहेत, ते लाजवाब आहे. सारा अली खानने साकारलेली उषा मेहतांची व्यक्तिरेखा तिच्या आधीच्या चित्रपटांतील भूमिकांपेक्षा वेगळी आहे. साराने हा रोल बऱ्यापैकी निभावला आहे. तिचा हा अकरावा चित्रपट. मिळालेल्या संधींचा विचार करता तिच्या अभिनयात आणि बोलण्याच्या ‘टोन’मध्ये अधिक वैविध्य येण्याची आवश्यकता आहे. सचिन खेडेकर यांनी साकारलेली उषा मेहतांच्या वडिलांची भूमिका अप्रतिम. मिळालेल्या दोन प्रसंगांमध्ये खेडेकर ‘छा गये’. मणिरत्नम यांच्या ‘गुरु’ चित्रपटात एकाच प्रसंगामध्ये खेडेकरांनी असा अभिनय केला की, अमिताभ बच्चन यांनीसुद्धा त्यांचे कौतुक केले होते. आनंद तिवारी, अभय वर्मा आणि ‘लापता लेडीज’ फेम स्पर्श श्रीवास्तव यांचा अभिनय विशेष उल्लेखनीय आहे.

देशप्रेमावर आधारित चित्रपट काढण्याच्या सध्याच्या रीतीला अनुसरून बऱ्याच निर्माता-दिग्दर्शकांनी प्रोपगंडा करणारे, खऱ्या- खोट्याची सरमिसळ करणारे अनेक चित्रपट गेल्या काही वर्षात निर्माण केले. त्यांचा गवगवा करण्याचा प्रयत्नही माध्यमांद्वारे केला गेला. त्यामुळे प्रेक्षक त्यातील सगळ्या गोष्टींना खरा इतिहास समजू लागले. त्या चित्रपटांच्या गर्दीत ‘ए वतन मेरे वतन’ हा चित्रपट हटके आहे. तो विषयाला अनुसरून आहेच, शिवाय सत्य घटना दाखवताना कोणाचाही प्रचार करत नाही, हे विशेष.

(संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)



Source link