सुहास किर्लोस्कर1 तासापूर्वी
- कॉपी लिंक
‘मानवत मर्डर्स’मध्ये सई ताम्हणकरने समिन्द्रीबाईची भूमिका कमालीच्या कौशल्याने साकारली आहे.
मानवत हे १५ हजार वस्तीचे परभणी जिल्ह्यातील एक छोटे गाव. तिथे १९७२ ते १९७४ या काळात सात स्त्रियांचे खून होतात. हे नरबळी की जादूटोणा? गावामध्ये काही मांत्रिक असतात. अपत्यप्राप्ती होत नसेल किंवा संपत्तीचा साठा कुठे आहे, याचा सुगावा लावायचा असेल, तर मांत्रिकांची मदत घेण्याची प्रथा त्या भागात असते. अशा परिस्थितीत एकामागोमाग एक असे खून होण्यास सुरूवात होते. तीन लहान मुली गायब होतात. चार विवाहित स्त्रियांची कुऱ्हाडीने हत्या होते. काही मृतदेह त्याच ठिकाणी सापडतात, तर काही खुनाच्या ठिकाणापासून दुसरीकडे आढळतात. याचा माग काढणे स्थानिक पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहे, असे वाटल्यामुळे स्पेशल क्राइम ब्रँचचे डेप्युटी कमिशनर रमाकांत कुलकर्णी यांना परभणीला पाठवण्यात येते. १९६८ मध्ये रामन राघव या खुन्याला पकडण्यात कुलकर्णींना यश मिळाले असल्याने या सलग होणाऱ्या खुनांचा तातडीने तपास करण्यासाठी त्यांची निवड होते. अशा खुनांचा तपास करण्यात त्यांचा हातखंडा असल्याचे मानले जायचे. या लौकिकाप्रमाणे ते इथे घडणाऱ्या खुनांच्याही तळाशी पोहोचतात… साधारण पन्नास वर्षांपूर्वी मानवतमध्ये घडलेल्या त्या खुनांच्या घटना आणि तपासाच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे, तो एका वेब सिरीजमुळे.
मानवतमध्ये घडलेल्या सत्यघटनेवर आधारित ‘मानवत मर्डर्स’ ही वेब सिरीज नुकतीच सोनी लिव्हवर रिलीज झाली आहे. आठ भागांची ही मराठी मालिका रमाकांत कुलकर्णी लिखित ‘Footprints on the Sands of Crime’ (2004) या पुस्तकावर आधारित आहे. गिरीश जोशी यांनी लिहिलेली आखीव पटकथा या वेब-मालिकेमध्ये प्रेक्षकांना बांधून ठेवते. कुऱ्हाडीने केलेले काही घाव दाखवले असले, तरी खून / रक्ताच्या चिळकांड्या दाखवण्यावर या मालिकेचा भर नाही, हे विशेष! अशा सत्यघटनेवर आधारित वेब सिरीज दोन पद्धतीने लिहिता / दिग्दर्शित करता येते. गावकऱ्यांमध्ये असलेली अंधश्रद्धा – त्यातून होणारे खून – खुनांचा तपास ही पटकथा लिहिण्याची एक पद्धत. परंतु, वेब सिरीजची पटकथा लिहिताना भर पोलिस तपासावर दिला आहे. खुनांच्या तपासासाठी रमाकांत कुलकर्णी यांची नेमणूक होणे, एकेका खुनाची त्यांनी घेतलेली माहिती आणि त्या अनुषंगाने तपासाच्या वेळी घडणारे नाट्य, अशा प्रकारे सिरीजच्या एकेका भागातून प्रेक्षकांना या घटनाक्रमाचा उलगडा होत जातो.
आशिष बेंडे यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिरीजच्या पहिल्या तीन भागांमधील घटनाक्रम संथ आहे. पुढील तीन भागांमध्ये तपासाला एक दिशा सापडते आणि शेवटच्या दोन भागांमध्ये सस्पेन्सचा उलगडा होतो. फैजल महाडिक यांचे संकलन दाद देण्यासारखे आहे. पटकथा उत्तम असली, तरी भाषा परभणीची स्थानिक वाटत नाही. या मराठी सिरीजच्या निमित्ताने त्या मातीतल्या भाषेचा सुगंध महाराष्ट्रात पोहोचला असता. रमाकांत कुलकर्णींचा सहायक नेहमी त्यांना एकच प्रश्न विचारत असतो, ‘सर, आता तपासाची पुढची दिशा काय?’ मुख्य तपास अधिकारी हुशार दाखवताना बाकीचे इतके बधीर असलेले का दाखवावेत, हा प्रश्न पडतो.
अभिनयाची बाजू सोनाली कुलकर्णी, मकरंद अनासपुरे यांनी उत्तम सांभाळली आहे. पण, खरी कमाल केली आहे सई ताम्हणकरने. सईने पकडलेले भूमिकेचे बेअरिंग कमालीचे आहे. समिन्द्रीबाईचे बावरलेपण, देशी दारूच्या भट्टीवर तिचे गूढ वागणे, मुलीला शोधताना होणारी तिची घालमेल, उत्तमरावच्या घरात होणारी तिची घुसमट असे भूमिकेचे अनेक पैलू सईने कमालीच्या कौशल्याने साकारले आहेत. मकरंद अनासपुरेंनी खलप्रवृत्तीचे बेअरिंग उत्तम सांभाळले आहे, पण काही प्रसंगात ते सोडून ‘अनासपुरी’ स्टाइलने त्यांचे हसणे खटकणारे आहे. रमाकांत कुलकर्णी या पात्रासाठी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची निवड करण्यामागचे प्रयोजन समजले नाही. पूर्ण सिरीजमध्ये ते एकाच चेहऱ्याने वावरताना आणि एकाच टोनमध्ये बोलताना दिसतात. अलीकडे याला संयत अभिनयाची शैली म्हणत असावेत. वेशभूषेवर उत्तम खर्च केला असल्यामुळे सगळ्यांचे कपडे नवे दिसतात. मात्र, गोवारीकरांचा विग खटकतो.
सस्पेन्स समजण्यासाठी वेब सिरीजच्या प्रेक्षकांना सातव्या भागापर्यंत खिळवून ठेवण्यात ‘मानवत’ कमी पडते. पण, ही मालिका आवर्जून बघावी अशी आहे. ‘लंपन’, ‘मानवत मर्डर्स’सारख्या उत्तम दर्जाच्या सिरीज मराठीमध्ये बऱ्याच काळानंतर येत आहेत, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.
(संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)







