वेब वॉच: ‘जोराम’ कमी संवादांची ‘बोलकी’ कहाणी

0
18
वेब वॉच:  ‘जोराम’ कमी संवादांची ‘बोलकी’ कहाणी


सुहास किर्लोस्कर6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

झारखंडच्या झिनपिडी गावातील जमिनीच्या राजकारणाला आणि त्याच्याशी संबंधित हिंसक आंदोलनाला वैतागून मुंबईत बांधकाम मजुरासारखे मिळेल ते काम करणाऱ्या दसरू – वानो या जोडप्याचा ‘आदिवासी कल्याणा’च्या नावावर राजकारण करणाऱ्या ‘कर्मा’ या महिलेला सुगावा लागतो.. त्यानंतर घडणाऱ्या प्रसंगांमुळे नायक दसरूला छोट्या बाळासह (जोराम) मुंबईहून झारखंडला त्याच्या मूळ गावी जावे लागते..

आपल्यावर होणाऱ्या आरोपांबद्दल सर्वांना सत्य परिस्थिती सांगू पाहणाऱ्या दसरूला बोलण्याची संधीच मिळत नाही.. नायकाला सर्वात कमी संवाद असणारा, तरीही बरेच काही सांगून जाणारा ‘जोराम’ हा चित्रपट प्राइमवर आणि यूट्यूबवर अलीकडेच रिलीज झाला आहे. चित्रभाषेमधून बरेच काही सांगण्याची कला म्हणजे चित्रपट, हे अधोरेखित करणारी ही दर्जेदार कलाकृती आहे. उत्तम दिग्दर्शन, बोलका कॅमेरा आणि मनोज वाजपेयीच्या अभिनयासाठी तो आवर्जून बघावा असा आहे.

‘जोराम’च्या सुरूवातीला वानो झारखंडमधल्या एका गावामध्ये झाडाला बांधलेल्या झोपाळ्यावर आनंदाने झोके घेत आहे. तिचा आदिवासी नवरा दसरू (मनोज वाजपेयी) समोर बसला आहे. दोघे मिळून आनंदाचं एक गाणं गात आहेत. झोपाळ्यावर झोके घेता घेता झाडाचे खोड दिसते आणि अचानक कॅमेरा झाडाच्या खोडावर स्तब्ध होतो. गाणे हवेत विरून जाते.. याचा अर्थ काहीतरी घडलं अन् या जोडप्याचं गाणे थांबलं. कट. पुढच्या शॉटमध्ये मुंबईमध्ये दोघे कामगार बांधकामावर काम करताना दिसतात. ते दोघे आता आदिवासींच्या पोशाखात नाहीत. ते नाखुशीने काम करत आहेत, हे त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळते. बांधकामावरच्या एका कोपऱ्यातील छोट्या जागेत ते राहतात. हे दोघंही कुठं तरी शून्यात डोळे लावून बसले आहेत. ते आपल्या गावातले सुखाचे दिवस आठवत आहेत. अजूनही संवाद नाही. या पाच मिनिटांच्या शॉटमधून आपल्याला सगळे काही समजते, कारण ती चित्रांची भाषा आहे. यापूर्वी त्यांनी गाव सोडून मुंबई का गाठले, याचे कारण काही वेळानंतर समजते. त्या शॉटमध्येही कसला संवाद नाही.

एकूणच चित्रपट कसा असावा, याचं आदर्श उदाहरण पटकथा लेखक, दिग्दर्शक देवाशीष माखिजा यांनी उभे केले आहे. यापूर्वी त्यांचा ‘भोसले’ चित्रपटही असाच कमी संवादाचा, कॅमेऱ्याचीच भाषा बोलणारा होता. या चित्रपटातील पीयूष पुटी यांची सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे. ​​आदिवासींच्या दृष्टिकोनातून विकास म्हणजे काय असेल, याची कल्पना संवादाशिवाय अनेक प्रसंगातून समोर येते. एका घरावर लिहिलेले असते..

‘आदिवासी को मिट्टी में मिलानेवालो, तुझे पता नही कि वो बीज है।’ प्रवास करता करता झोपी गेलेल्या नायकाला जाग येते अन् त्याची नजर आधी त्याच्या छोट्या मुलीला शोधत राहते, तो प्रसंग हृद्य आहे. ज्या पद्धतीने तो कॅमेऱ्यात टिपला आहे, ते दाद देण्यासारखे आहे. अभ्रो बॅनर्जी यांचे संकलन उल्लेखनीय आहे. झारखंडमधील दृश्यातून मुंबईतल्या दृश्यात येताना ब्लॅक आउट का केला आहे, हे चित्रपट बघताना समजते.

दसरूच्या पात्राची देहबोली, भाषा, आर्थिक – सामाजिक परिस्थिती आणि त्याचे समाजातील स्थान या सर्वाचा विचार करून मनोज वाजपेयीने हे पात्र साकारले आहे. त्यामुळेच हा अभिनेता नेहमी आपल्या पात्रांच्या नावाने, म्हणजे भिकू म्हात्रे (सत्या), गणपत भोसले (भोसले), प्रोफेसर सायरस (अलिगढ), सरदार खान (गँग्ज ऑफ वासेपूर), समर प्रताप (शूल) या नावाने ओळखला जातो. या प्रत्येक चित्रपटातील त्याची चालण्या-बोलण्याची ढब वेगळी आहे. मोहम्मद झिशान अयूबने मुंबईतील पोलिस इन्स्पेक्टरचे काम उत्तम केले आहे. ‘आर्टिकल १५’ चित्रपट आणि ‘स्कूप’ वेब सिरीजमध्ये मोहम्मदने उत्तम अभिनय केला होता. स्मिता तांबे या अभिनेत्रीला तिच्या अभिनय कौशल्याला वाव देणारी भूमिका (फुलो कर्मा) मिळाली आहे. तनिश्ता चटर्जीने नायकाच्या पत्नीच्या (वानो) छोट्या भूमिकेत छाप पाडली आहे. हा चित्रपट यूट्यूबवर उपलब्ध आहे, म्हणून तो मोबाइलवर बघू नये. कारण मोबाइलवर चित्रपट फार लक्षपूर्वक बघता येत नाही. चित्रपट हा शक्य तितक्या मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी बनवलेला असतो. मोबाइलवर बघितल्यामुळे कलाकृतीमधील बारकावे टिपता येत नाहीत आणि उत्तम अभिनय, अप्रतिम दिग्दर्शनाचा रसास्वादही घेता येत नाही. विशेषत: ‘जोराम’सारखे चित्रपट पूर्णपणे लक्ष केंद्रित करून सलग बघायला हवेत.

(संपर्कः suhass.kirloskar@gmail.com)



Source link