समीर गायकवाड3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
गोव्यातील कुख्यात, सराईत गुन्हेगार महानंद नाईक याच्या गुन्हेगारी कृत्यांचा शोध घेणारी ‘द दुपट्टा किलर’ ही एक सत्यघटनांवर आधारित क्राइम डॉक्युमेंट्री आहे. पॅट्रिक ग्रॅहम आणि निरंजना हरिहरनंदनन यांनी ती दिग्दर्शित केली आहे. यामध्ये गोव्यात १९९० ते २००० च्या दशकात घडलेल्या खुनांच्या मालिकेचा तपास दाखवला आहे.
सिरियल किलर महानंद नाईकवर सोळा महिलांच्या खुनाचा आरोप होता, पण पुराव्याअभावी त्याला फक्त दोन खुनांसाठी दोषी ठरवण्यात आले. नाईक रिक्षाचालक होता. महिलांना भेटून लग्नाचे खोटे आश्वासन देताना तो स्वत:ला अविवाहित आणि सभ्य, नोकरदार माणूस म्हणून सादर करायचा. विश्वास संपादन करुन तो त्यांना जंगल, निर्जन रस्त्यांसारख्या ठिकाणी न्यायचा. तिथे त्यांच्याच दुपट्ट्याने गळा आवळून त्यांची हत्या करायचा. हत्येनंतर तो पीडितांचे दागिने, पैसे, इतर मौल्यवान वस्तू लुटायचा. मृतदेह लपवण्यासाठी जंगलात किंवा खड्ड्यात टाकायचा. त्याच्या गुन्ह्यांनी गोव्यात इतकी दहशत निर्माण झाली होती की, काही काळ महिलांना दुपट्टा घालण्याची भीती वाटू लागली होती. ही डॉक्युमेंट्री नाईकच्या गुन्ह्यांच्या मानसशास्त्राचा आणि त्याला पकडताना आलेल्या अडचणींच्या मागोव्यासोबतच न्यायव्यवस्थेतील त्रुटींचा शोध घेते. नाईकने २००९ मध्ये अटक होईपर्यंत अनेक वर्षे गुन्हे केले, कारण पोलिसांना पुरावे आणि पीडित कुटुंबांकडून तक्रारी मिळवण्यात असंख्य अडचणी येत. सध्या नाईक १५ वर्षांच्या तुरुंगवासानंतर चांगल्या वर्तनाच्या आधारे सुटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे पुनर्वसन व न्याय याविषयी चर्चाही सुरू झाली आहे.
डॉक्युमेंट्रीमध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पोलिस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पीडितांच्या कुटुंबीयांच्या मुलाखती आहेत आणि गुन्हे कसे केले याच्या रिक्रिएशनचा समावेश आहे. नाईकने पोलिसांना स्वत:हून पीडितांच्या मृतदेहांची ठिकाणे दाखवली होती. त्याचे रिअल आर्काइव्ह फुटेज वापरले असल्याने सत्याचा तीव्र भास होतो. पार्श्वसंगीत आणि व्हिज्युअल्स यांच्या वापराने गुन्ह्यांचे भयावह स्वरूप प्रभावीपणे दाखवल गेले आहे. ‘द दुपट्टा किलर’ची आणखी एक महत्त्वाची मांडणी म्हणजे याद्वारे न्यायव्यवस्थेतील त्रुटीवर कटाक्ष टाकलाय. पुराव्यांअभावी खटले कमकुवत होणे आणि पीडितांना न्याय मिळण्यात येणारे अडथळे यावर ही डॉक्युमेंट्री थेट भाष्य करत नसली, तरी हे मुद्दे परिणामकारकपणे समोर आणण्यात आले आहेत.
समाजातील स्त्री – पुरुष भेदभाव आणि लग्नाच्या सामाजिक दबावाचा गैरफायदा घेणाऱ्या गुन्हेगारांबाबत हा माहितीपट प्रश्न उपस्थित करतो. या संपूर्ण प्रकरणात अनेक पीडित कुटुंबांनी लज्जेमुळे तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे नाईकला गुन्हे करणे सोपे गेले, हे वास्तव टोकदारपणे समोर येते. निर्माते सामर खान आणि दिग्दर्शक पॅट्रिक ग्रॅहम यांनी ही डॉक्युमेंट्री केवळ मनोरंजनासाठी बनवली नाही, हे पदोपदी जाणवते. समाजात बदल घडवण्यासाठीचे प्रबोधन आणि गुन्ह्यांविरुद्ध तक्रार करण्याचे महत्त्व अधोरेखित करणे, हा त्यांचा मुख्य उद्देश असावा. पीडितांच्या कथांना संवेदनशीलतेने हाताळल्याबद्दल आणि न्यायव्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकल्याबद्दल त्यांचे कौतुक केले पाहिजे. सर्व बाजूंनी कथा सांगत असतानाच प्रेक्षकांना स्वतःचा निष्कर्ष काढण्याची मुभा देऊन त्यांनी एक प्रभावी मेसेज दिलाय. यात नाईकच्या दोषीपणावर जास्त भर दिला असून, स्वतंत्ररीत्या वेगळे संशोधन वा तपास केलेला नाही, हे महत्त्वाचे आहे. कारण अलीकडे मीडिया ट्रायल हा प्रकार सर्वत्र बोकळला आहे. त्यामुळे प्रस्तुतकर्ता आपलं मत न मांडता केवळ प्लेन स्टोरी प्रेझेंट करतो, तेव्हा ती जास्त खरी वाटू लागते.
या डॉक्युमेंट्रीकडे तत्कालीन गोव्याच्या सामाजिक मांडणीचा ऐवज म्हणूनही पाहता येईल. १९९० च्या दशकाच्या मध्यापासून ते २००० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत गोवा हे पर्यटन आणि समृद्धीचे सर्वोच्च केंद्र होते. असे असूनही गोव्याच्या ग्रामीण भागात गरिबी, बेरोजगारी आणि सामाजिक दबाव यांचा प्रभाव होता. याचा नेमका फायदा घेत नाईकने बहुतांश गरीब, असुरक्षित आणि सामाजिकदृष्ट्या उपेक्षित महिलांना लक्ष्य केले. यातील बऱ्याच महिला मजूर किंवा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील होत्या, त्यांना लग्नाच्या आमिषाने सहज फसवता येत असे. त्या काळात अविवाहित किंवा घटस्फोटित महिलांना समाजात कमी लेखले जायचे. वरवर शांत वाटणाऱ्या, सामान्य माणसासारखं दिसणाऱ्या नाईकने या मानसिकतेचा गैरफायदा घेतला. वास्तवात या घटनेवर वेबसिरीज बनवणे सोपे झाले असते. कारण त्यासाठी लागणारा मसाला यात आहे. तरीही निर्मात्यांनी सोशल मेसेज देण्यासाठी माहितीपटाचा फॉर्म निवडला आहे हे लक्षात येते. सफाईदार तांत्रिक अंगे आणि गतिमान मांडणी यांमुळे ही डॉक्युमेंट्री रोमांचक आणि भेदक वाटते. ती डॉक्यूबेवर इंग्रजी, तामिळ, तेलुगू, हिंदी या चार भाषांत उपलब्ध आहे. अॅमेझॉन प्राइमद्वारेही ती पाहता येईल.
जाता जाता… अजय देवगणच्या ‘रेड’चा सिक्वेल पाहण्याजोगा झालाय. यात छोट्या वा दुय्यम समजल्या जाणाऱ्या कलाकारांनी अगदी जीव तोडून कामे केली आहेत.
(संपर्कः sameerbapu@gmail.com)







