विकासकांच्या मालमत्तेवर टाच…झोपु योजनेतील रहिवाशांचे ६४६ कोटी रुपये घरभाडे थकीत…

0
3
विकासकांच्या मालमत्तेवर टाच…झोपु योजनेतील रहिवाशांचे ६४६ कोटी रुपये घरभाडे थकीत…


मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील विकासकांनी थकविलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घरभाड्याची वसुली मागील कित्येक वर्षांपासून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण करीत आहे. घरभाडे वसुलीसाठी झोपु प्राधिकरणाकडून अभय योजनाही राबविण्यात आली. मात्र त्यानंतरही अनेक विकासकांनी घरभाडे थकविले आहे. परिणामी, आजघडीला १३०० कोटी रुपयांपैकी ६४६ कोटी रुपये घरभाडे थकीत आहे.

संबंधित विकासकांच्या मालमत्तेवर टाच आणून त्यांच्या मालमत्तेतून घरभाडे वसूल करण्यासंदर्भातील महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम २०२५ ला बुधवारी विधानसभेत मंजुरी देण्यात आली. त्यानुसार झोपु प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना विकासकाच्या मालमत्तेतून घरभाडे वसूल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. या नवीन नियमाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्यास ६६४ कोटी रुपयांच्या थकीत घरभाडे वसुलीला वेग येईल. या कायद्यामुळे विकासकांना चाप बसणार असून झोपडीधारकांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

झोपु योजना राबविताना झोपड्या रिकाम्या केल्याच्या दिवसापासून संबंधित रहिवाशांना घरभाडे देणे बंधनकारक आहे. पुनर्वसित इमारतीतील घराचा ताबा रहिवाशांना देईपर्यंत घरभाडे देणे विकासकाला बंधनकारक आहे. मात्र मोठ्या संख्येने विकासक घरभाडे देत नसल्याच्या तक्रारी आल्या आहेत. घरभाडे मिळत नसल्याने रहिवाशांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याची गंभीर दखल घेऊन काही वर्षांपूर्वी झोपु प्राधिकरणाने घरभाडे थकविणाऱ्या विकासकांचा शोध घेतला.

हेही वाचा

मुंबई शहर आणि उपनगरातील १३१ विकासकांनी सप्टेंबर २०२२ पर्यंत ८८०.९३ कोटी रुपये घरभाडे थकविल्याचे समोर आले. ही रक्कम मोठी असल्याने झोपु प्राधिकरणाने विशेष मोहीम हाती घेऊन घरभाडे वसुली सुरू केली. त्यानुसार एप्रिल २०२५ पर्यंत ६०१.५० कोटी रुपये थकीत घरभाडे वसूल करण्यात आले असून अद्याप २७९.४३ कोटी रुपये घरभाडे थकीत आहे. अनेक विकसकांनी २०२२ नंतरही घरभाडे थकविले आहे. त्यामुळे थकीत घरभाडे वसूल करण्यासाठी राज्य सरकारच्या निर्देशानुसार झोपु प्राधिकरणाने अभय योजना सुरू केली. अभय योजना सुरू केली तेव्हा थकीत घरभाड्याची रक्कम ५०१.५५ कोटी रुपये होती. मात्र अभय योजनेलाही विकासकांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही. त्यामुळेच अभय योजनेअंतर्गत केवळ १३४.१७ कोटी रुपये थकीत रक्कम वसूल करण्यात प्राधिकरणाला यश आले. तर अभय योजनेअंतर्गत ३६७.३८ कोटी रुपयांची वसुली शिल्लक आहे.

सप्टेंबर २०२२ पर्यंतची ८८० आणि त्यानंतरची ५०१ कोटी रुपये अशी एकूण १३८१ कोटी रुपये घरभाडे थकीत होते. आतापर्यंत ७३५ कोटी रुपये थकीत घरभाडे वसूल करण्यात प्राधिकरण यशस्वी झाले आहे. मात्र आजही ६४६ कोटी रुपये घरभाडे थकीत असल्याची माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. तर आता मात्र लवकरच ही सर्व वसुली वेगाने होईल, असेही सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता विकासकांना चाप बसविण्यासाठी नवीन कायदा आला आहे. या कायद्याला बुधवारी विधानसभेत मंजुरी देण्यात आली आहे. या कायद्यानुसार घरभाडे थकविणाऱ्या विकासकांच्या मालमत्तेवर टाच आणून त्यांच्या मालमत्तेतून घरभाडे वसूल करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मालमत्तेवर टाच आणून मालमत्तेतून वसुली करण्याचे अधिकार थेट झोपु प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे ही बाब अत्यंत दिलासादायक मानली जात आहे. या कायद्याची कडक अंमलबजावणी करून थकीत रक्कम वसूल करण्याचे उद्दिष्ट असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या कायद्यामुळे आता विकासकांना नक्कीच चाप बसेल आणि घरभाडे थकविण्याचे प्रकार होणार नाही, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.





Source link