वकिलाशिवाय खटला चालवता येणार नाही : न्यायालयाची सूचना | पुढारी

0
20









[adning id=”1976″]

वाई; पुढारी वृत्तसेवा : वाई हत्याकांड प्रकरणात वकिलाशिवाय खटला चालवता येणार नाही, अशी सूचना करत न्यायालयाने खटल्याकामी वेळकाढूपणा करता येणार नसल्याची समज संशयित संतोष पोळ याला दिली.

वाई हत्याकांड प्रकरणाची सुनावणी वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. जी. नंदीमठ यांच्या न्यायालयात सुरु आहे. माफीची साक्षीदार ज्योती मांढरेचा उलट तपास गुरुवारी पुन्हा पुढे सुरु होणार होता. सुनावणीच्या वेळी संशयित संतोष पोळ याला वकिलाशिवाय स्वतः खटला चालवता येणार नाही. त्याला खटला चालवण्यासाठी वकील नेमावाच लागेल, अशी सूचना न्यायालयाने केली. न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत वकील नेमण्यासाठी संतोष पोळला सांगितले आहे. सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्वल निकम हे वाई न्यायालयात आले होते. संतोष पोळ यालाही बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी जिल्हा सरकारी वकील मिलिंद ओक न्यायालयात उपस्थित होते.

यावेळी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांनी पोळला उलट तपास घेण्यास हरकत घेतली. पोळ उलट तपासात विचारत असलेल्या प्रश्नांना कोणताही कायदेशीर (लॉ पॉईंट) आधार नाही. खटल्याशी विसंगत प्रश्न तो साक्षीदाराला विचारत असल्याचे यावेळी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. तसेच खटल्यामध्ये तो वेळ काढूपणा करत आहे. त्यामुळे संतोष पोळला स्वतः खटला चालवता येणार नाही, आदी मुद्दे त्यांनी न्यायालयासमोर आणले. त्यावर न्यायालयाने संतोष पोळला खटल्याकामी वेळ काढूपणा करता येणार नाही अशी समज दिली. दरम्यान, जर तू वकील नेमू शकत नसशील तर आम्ही तुला वकील देऊ असे न्यायालयाने पोळ याला सांगितले. दि 19 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे.











Source link