
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह मिळाल्यानंतर तुतारीप्रमाणे दिसणारे पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह चांगलेच प्रकाशझोतात आले. एकसारखेच दिसणाऱ्या चिन्हामुळे तुतारीचे मोठ्या प्रमाणावरील मतदान पिपाणीला गेले आहे. लोकसभा निवडणुकीत त्यामुळे राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांचा पराभव झाला,तर काही ठिकाणी मते कमी झाली होती. त्यामुळे हे चिन्ह यादीतून काढून टाकण्याची मागणी पवार यांच्या पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत पिपाणी हे चिन्ह कायम राहिले आहे. फक्त त्याचे नाव देताना तुतारी असे न देता ट्रम्पेट असे देण्याचा बदल आयोगाने केला आहे. मात्र तरीही य़ाचा फटका शरद पवारांना बसला आहे.