राज्य आहे लोकांचे…: लोकशाही, निवडणुका अन् राजकारण समजून घेताना…

0
18
राज्य आहे लोकांचे…:  लोकशाही, निवडणुका अन् राजकारण समजून घेताना…


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Article Amol Annadate | Understanding Democracy, Elections And Politics

डॉ. अमोल अन्नदाते1 तासापूर्वी

  • कॉपी लिंक

भारताच्या इतिहासातील अनेक राजांनी राजकारण आणि कल्याणकारी राज्य चालवण्याची आदर्श तत्त्वे मांडली. स्वातंत्र्यापूर्वीचे राजकारण स्वाभाविकपणे स्वातंत्र्यलढ्याभोवती फिरत होते. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाच्या आयुष्याला या राजकारणाचा स्पर्श होता आणि त्यात त्याचा सहभागही होता. पुढे स्वातंत्र्यानंतर जसजशा गरजा पूर्ण होत गेल्या तसतशी राजकारणाची आणि लोकशाही प्रक्रियेत सामील होण्याची व्याख्या बदलत गेली. आता तर ती ३६० अंशात इतकी बदलली आहे की, बहुतांश राजकारणाचा अर्थ केवळ काहीतरी उद्दिष्ट ठरवणे, त्याभोवती व्यूहरचना करणे आणि सत्तेचे एखादे पद मिळवणे एवढाच उरला आहे. थोडक्यात, निवडणुका लढवणे म्हणजेच केवळ राजकारण. कोणी एखाद्या राजकीय पक्षात काम सुरू केले की त्याला ‘राजकारणात प्रवेश’ असे म्हटले जाते.

रूढार्थाने तो खरा असला तरी आपण या देशाचे नागरिक आहोत तर आपल्यापैकी प्रत्येक जण राजकारणाच्या परिघात आहे हे समजून घ्यावे लागेल. लोकशाही प्रक्रियेच्या बाबतीतही हेच तत्त्व लागू आहे. लोकशाही म्हणजे फक्त मतदान करणे एवढे मर्यादित कर्तव्य नाही. सत्ताकारण हा राजकारणाचा आणि मतदान हा लोकशाही प्रक्रियेतील महत्त्वाचा भाग असला तरी ते आणि तेच म्हणजे सर्व काही असे नाही. ती साधने असू शकतात, पण साध्य मात्र निश्चितच नाहीत.

आपण दैनंदिन आयुष्यात वागण्या-बोलण्याचे काही शिष्टाचार, सामाजिक संकेत पाळतो आणि त्यातून आपण कुठल्या स्वभावाचे, कशा प्रकारे वागणारे व्यक्ती आहोत हे कळते. त्याच धर्तीवर लोकशाही संदर्भातील आपला व्यवहार कसा असावा आणि आपल्याला सत्तास्थानी कोण हवे हे ठरवणाऱ्या मतदानाचा निर्णय घ्यायला भाग पाडणारी एक वागणूक असते. त्यांना अनुक्रमे ‘डेमोक्रॅटिक बिहेविअर’ आणि ‘इलेक्टोरल बिहेविअर’असे म्हणता येईल. आनुवंशिकतेने आणि वारशाने जशा बऱ्याच गोष्टी आपल्याला मिळतात, तसे हे विचार आपल्याला आपल्या जनुकांमधून मिळत नाहीत. आपण कुठल्या घरात जन्माला येतो याचा त्यावर प्रभाव असला तरी व्यक्ती म्हणून आपल्या वाट्याला येणारा संघर्ष, रोज येणारे अनुभव आणि मिळणारे शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, वैचारिक प्रेरणा यावरून आपली लोकशाहीला पोषक वागणूक तयार होते. म्हणूनच आपल्या देशातील सत्ता उलथवण्यासाठी जेव्हा जेव्हा परकीय शक्ती आल्या तेव्हा त्यांनी आधी राजाला नव्हे, तर त्या देशातील विद्यापीठे, संस्कृती आणि वैचारिक नेतृत्वावर हल्ले केले.

आज आपल्या लोकशाहीतील सर्वसामान्य नागरिकांना या प्रकारचा व्यक्तिगत संघर्ष, अनुभव आणि वैचारिक प्रेरणांचे अप्रूप वाटणे कमी झाले आहे. राजकीय सभांमधील ‘रॉक शो’सदृश शक्तिप्रदर्शन म्हणजेच सगळे काही आणि आपले भवितव्य घडवणाऱ्या विचारांचा एकमेव स्रोत आहे असा गैरसमज झाल्याने ‘लाखांच्या सभा’ हे ग्लॅमर काही संपता संपत नाही. त्यामुळे एकेकाळी गावोगावी विशेषत: ग्रामीण भागात व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रमांना होणारी गर्दी आता आटत चालली आहे. नागरिकांची वैचारिक प्रक्रियेत सहभागी होण्यातील उदासीनता दर्शवणारी ही बाब आहे. काळाच्या ओघात गरज नसलेल्या गोष्टी आपोआप नामशेष होतात.

त्या नष्ट झाल्याबद्दल रडगाणे गाण्यात वा स्मृतिरंजनामध्ये जगण्यात अर्थ नसतो. पण, वैचारिक जडणघडण करणाऱ्या गोष्टीही इतर इव्हेंट आणि कल्पनांनी ठरवून त्यांची अदलाबदल केली जाते तेव्हा काळजी वाटू लागते. म्हणजे प्रागतिक, विकासाभिमुख विचारांऐवजी केवळ कुठल्याही स्वरूपाची अस्मिता जागी करणारे इव्हेंट आज समाजात सगळ्यांकडूनच मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत. मग ती अस्मिता कशाचीही असो; ती अशा प्रकारे उभी केली जात आहे, जेणेकरून समाजातील वेगवेगळे समूह प्रगतीच्या आणि आधुनिक विचारांच्या नव्हे, तर त्या अस्मितेच्या अमलाखाली राहतील. परिणामी त्यांची लोकशाहीतील वागणूकही पूर्णपणे त्या अस्मितेभोवती फिरत राहते. अस्मिता असाव्यात, पण त्या एवढ्या टोकदारही नको की लोकशाहीसाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचा सारासार विचार करण्याची शक्तीच खुंटेल. हे भान देणारे वैचारिक स्रोत जगवणे, ते आपलेसे करणे हे निवडणूक आणि राजकारणाइतकेच महत्त्वाचे आहे.

लोकशाही चालवण्यात सत्ताकारणाचे महत्त्व आहे तसे चळवळींचेही आहे. स्वातंत्र्यापासून शेतकरी, कामगार, आदिवासी, मागास घटकांच्या वेगवेगळ्या चळवळींतून देशाचे राजकारण आणि लोकशाही आकार घेत गेली. पण, जसजशी समृद्धी वाढत जाते तसतशा चळवळी कमी होत जातात. एकदा का त्या आटायला लागल्या की, निरंकुश सत्ताकेंद्रे तयार होऊन त्यातून चळवळी नष्ट आणि नामशेष करण्याची एक यंत्रणा निर्माण होते. त्यामुळे आज कुठल्या एखाद्या दुर्लक्षित वर्गाचे प्रश्न प्रभावीपणे मांडणाऱ्या चळवळी निर्माण होताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे बऱ्याच चळवळी शिक्षित वर्गाने निर्माण केल्या, त्याचे नेतृत्वही केले. डॉ. राममनोहर लोहिया यांनी म्हटले होते- रास्ते सुनसान हो गये तो संसद आवारा हो जायेगी.. पूर्वीसारखे आज प्रत्येक प्रश्नासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज राहिली नसली तरी लोकशाहीसाठी पोषक विचार करणे आणि त्याचा प्रसार करणे हीसुद्धा एक वैचारिक चळवळच आहे. त्या विचाराने अनेक लोक जोडले जातील तेव्हाच सगळे निकष बाजूला सारत, विकासाचे भान ठेवत लोकशाही प्रक्रियेत सक्रिय राहणारे मतदार तयार होतील. मी साधा नागरिक असलो तरी राजकारणाचा भाग आहे आणि मला या लोकशाहीला समृद्ध करायचे आहे, अशा विचारातूनच या प्रक्रियेच्या सुधारणेला सुरुवात होऊ शकेल.

( संपर्क – dramolaannadate@gmail.com)



Source link