रसिक स्पेशल: वेध दक्षिणेतील राजकीय पोकळीचा

0
14
रसिक स्पेशल:  वेध दक्षिणेतील राजकीय पोकळीचा


डॉ. प्रकाश पवार8 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण भारताविषयीचे राजकीय समीकरण वरवर भाजपच्या विरोधात असल्याचे दिसते. पण, या भागाच्या राजकारणात कायमच अस्थिर राजकीय समीकरणे निर्माण झाली आहेत. भाजपला आता या गोष्टीचे नेमके भान आले आहे. त्यामुळेच तेथील अस्थिरतेत या पक्षाला एक राजकीय पोकळी दिसत आहे आणि ती अधिक व्यापण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले आहेत.

भारताच्या प्रत्येक घटक राज्यात वेगळ्या पद्धतीची राजकीय प्रक्रिया घडते. या नियमाप्रमाणे देशाच्या उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम या भागांमध्येही वेगवेगळी राजकीय प्रक्रिया घडत असते. यामुळे उत्तर भारताला भारतीय सत्तेचे हृदय संबोधले जाते. दिल्लीच्या सत्तेचा हमरस्ताही उत्तर प्रदेशातून जातो. या सूत्रानुसार, देशातील सत्तांतराचा हमरस्ता दक्षिणेतून जातो. त्याचप्रमाणे, भारतीय राजकारणातील विरोधी पक्षांच्या राजकारणाचे हृदय दक्षिण भारतात धडधडत असते, असे म्हणता येईल. अशा या दक्षिण भारतात अलीकडे भाजप आणि विरोधी पक्षांनी राजकीय प्रक्रिया गतिमान केली आहे. परिणामी सत्तास्पर्धेने वेगळे वळण घेतले आहे. या भागात भाजपने एका राजकीय पोकळीचा शोध घेतलेला दिसतो. हा मुद्दा खूपच चित्तवेधक स्वरूपाचा आहे. तसेच भाजपला बहुमताच्या पुढे जाण्याचा हमरस्ताही याच भागात दिसत आहे.

लोकसभेच्या चारशेपेक्षा जास्त जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट दक्षिण भारतावर अवलंबून आहे. म्हणजेच दक्षिण भारत सत्तेच्या वर्चस्वाचे हृदय होणार की सत्तांतराच्या प्रक्रियेला ताकद पुरवणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. या दोन प्रक्रियांपैकी सत्तांतराच्या प्रक्रियेला दक्षिण भारत मदत करतो, हा इतिहास आहे. परंतु, नवा इतिहास सत्तेच्या वर्चस्वाच्या प्रक्रियेला हातभार लावणारा घडवला जाईल. त्यासाठी ही कहाणी चिकित्सक पद्धतीने समजून घेतली पाहिजे.

धार्मिक श्रद्धा आणि लोकसंघटन

राजकीय प्रक्रियेचा एक भाग म्हणून अलीकडे उत्तर भारत आणि दक्षिण भारत असे राजकीय ध्रुवीकरण घडत आहे. आणि ही प्रक्रिया सातत्याने होताना दिसते. कारण पन्नासच्या दशकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दक्षिण भारतातील सामाजिक पुरोगामित्वाबद्दल भाष्य केले होते. आता विकास पुरोगामित्व, धर्मनिरपेक्षता, वर्चस्वविरोधी चळवळी यापेक्षा वेगळी लोकसंघटनाची प्रक्रिया घडत आहे. या संदर्भातील तीन वैशिष्ट्ये सुस्पष्टपणे दिसत आहेत.

1. समकालीन दक्षिण भारताची विचारप्रणाली विकासाची आणि उत्तर भारताची विचारप्रणाली हिंदुत्वाची असे ध्रुवीकरण राजकीय स्पर्धेच्या क्षेत्रात दिसू लागले आहे. कारण उत्तर भारतामध्ये भारतीय जनता पक्षाचे राजकीय वर्चस्व निर्णायक स्वरूपाचे आहे. परंतु, दक्षिण भारतामध्ये मात्र त्या तुलनेत भाजपचे वर्चस्व दिसत नाही. हे त्या पक्षापुढील एक मोठे आव्हान आहे. भाजप या आव्हानामध्ये संधीचा शोध घेत आहे. दक्षिण भारतामध्ये भाजपने आघाडीचा प्रयोग याआधी राबवला होता. तसेच आध्यात्मिक हिंदुत्वाबरोबर जुळवूनही घेतले होते. परंतु, या दोन्हीही पद्धतीने भाजपला दक्षिणेतील केवळ कर्नाटकमध्ये प्रभाव निर्माण करता आला. यावेळी भाजपने आघाडी आणि आध्यात्मिक हिंदुत्वाबरोबर श्रीरामभक्ती व लोकसंघटन यांचा ताळमेळ घालण्याची प्रक्रिया राबवली आहे. भाजपच्या राजकीय डावपेचांचा दक्षिण भारताच्या संदर्भात हा नवीन प्रकार आहे.

2. दक्षिण भारतात प्रभाव वाढवण्यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. या आघाडीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी अलीकडेच केरळमधील गुरुवायूरपासून ते तामिळनाडूतील रामेश्वरमपर्यंत दक्षिण भारतातील अनेक मंदिरांना भेटी देऊन दर्शन घेतले. म्हणजेच त्यांनी लोकांच्या धर्मश्रद्धांचा आधार हा उपाय दक्षिण भारतात राजकीय संघटनासाठी विकसित केल्याचे दिसते. लोकांच्या धार्मिक श्रद्धा आणि लोकसंघटन या दोन मुद्द्यांचा एकमेकांशी ताळमेळ घालण्याची प्रक्रिया त्यांनी उत्तर भारताप्रमाणे दक्षिण भारतातही घडवली. याआधी लोकांच्या धार्मिक श्रद्धा बहुविविधतेच्या पद्धतीने व्यक्त होत होत्या. परंतु, मोदींच्या प्रयत्नांमुळे लोकांच्या धार्मिक श्रद्धांचा एकच केंद्रबिंदू उदयाला येत आहे. अर्थातच तो श्रीरामाविषयीची श्रद्धा हा आहे.

3. दक्षिण भारतामध्ये शहरीकरणाचे प्रमाण जास्त आहे. शहरीकरणामधून मध्यमवर्ग संघटित झाला आहे. भाजपने शहरी भागातील मध्यमवर्गाला संघटित करण्याचा कार्यक्रम सुरू केला आहे. यामुळे दक्षिण भारतात भाजपकडील मतदारांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. उदा. भाजपचा कर्नाटकमध्ये पराभव झाला असला, तरी बंगळुरू शहरात त्यांचे मतदान वाढले आहे. तसेच बंगळुरूच्या शहरी भागात भाजपच्या विधानसभेच्या जागाही निवडून आल्या आहेत. यावरून असे दिसते की, दक्षिण भारताच्या शहरी भागातील मध्यमवर्ग हा भाजपचा मुख्य आधार आहे. भाजप या आधाराचा विस्तार करू शकतो. तसेच शहरी भागातील मध्यमवर्गासाठी रामावरील श्रद्धा महत्त्वाची ठरू शकते. त्या दृष्टीने मध्यमवर्ग आणि श्रीरामावरील श्रद्धा यांची सांधेजोड भाजपने केली आहे. एका अर्थाने हा पक्ष दक्षिण भारतातील शहरी भागात आणि मध्यमवर्गात प्रभावीपणे संघटन करताना दिसत आहे.

अस्थिर राजकीय समीकरण

दक्षिण भारताविषयीचे राजकीय समीकरण वरवर भाजपच्या विरोधात असल्याचे दिसते. परंतु, या भागाच्या राजकारणात कायमच अस्थिर राजकीय समीकरणे निर्माण झाली आहेत. भाजपला आता या गोष्टीचे नेमके भान आले आहे. दक्षिण भारतात लोकसभेच्या १३२ जागा आहेत. त्यापैकी जवळपास शंभर जागा भाजपेतर पक्ष जिंकतील आणि भाजपच्या नेतृत्वातील ‘एनडीए’ला सर्वात कमी जागा मिळण्याची शक्यता नोंदवली गेली आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर या भागात भाजपच्या नेतृत्वातील “एनडीए’ला वीस ते बावीस टक्के आणि विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला चाळीस टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. अन्य लहान-मोठ्या प्रादेशिक, स्थानिक पक्षांना साधारण इतकीच म्हणजे चाळीस टक्के मते मिळू शकतात. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण भारताविषयीचे राजकीय समीकरण चित्तवेधक आणि अस्थिर स्वरूपाचे असल्याचे दिसते. याची मुख्य तीन कारणे आहेत… एक, ‘इंडिया’ आघाडीच्या बाहेर साठ टक्के मतदान असल्याने या मतदानाचे एकत्रीकरण झाले, तर दक्षिणेतून देशाचे राजकीय समीकरण एकदम उलटे झालेले दिसेल. दोन, भाजपकडील तीस टक्के मते राजकीय समीकरणे बदलवणारी आहेत. यामुळे दक्षिण भारतातील लोकसभेच्या निवडणूक निकालावर परिणाम करण्याची प्रभाव क्षमता भाजपकडेही आहे. तीन, दक्षिण भारतात तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, लक्षद्वीप, पुदुचेरी आणि अंदमान निकोबार यांचा समावेश होतो. येथे प्रादेशिक पक्ष प्रभावी आहेत. त्यांनी ‘इंडिया’ आघाडीशी पूर्णपणे जुळवून घेतलेले नाही. या तीन कारणांमुळे ‘एनडीए”ला दक्षिण भारतामध्ये एक राजकीय पोकळी दिसत आहे आणि ती अधिक व्यापण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. या निमित्ताने दक्षिण भारताच्या राजकारणात एक नवीनच प्रक्रिया घडत आहे. ती भविष्यात आणखी गतिमान होण्याची शक्यता आहे.

(संपर्कः prpawar90@gmail.com)



Source link