रसिक स्पेशल: विखार नको, विवेक वाढवू…

0
15
रसिक स्पेशल: विखार नको, विवेक वाढवू…


  • Marathi News
  • Opinion
  • Divya Marathi Rasik Special Dr. Amol Annadate On Don’t Get Sick, Increase Your Conscience

डॉ. अमोल अन्नदाते2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

फक्त सकल राष्ट्रीय उत्पन्नच नव्हे, तर सकल राष्ट्रीय आनंद निर्देशांकही आर्थिक प्रगतीचे मानक असतो. तो संपन्न मानसिक, शारीरिक आरोग्यातून आणि विवेकशील व्यक्तिगत, सामाजिक वर्तनातून वाढतो. त्यामुळे नव्या वर्षात हा आनंदाचा निर्देशांक वाढण्यासाठी विद्वेष, विखाराचा त्याग करून विवेकी विचार – वर्तनाला प्राधान्य द्यायला हवे. काळ हे मोठे भ्रम निर्माण करणारे आणि त्याच्या पोटात काय दडलेय, याचा थांग लागू न देणारे एक मिथक असते. ब्रह्मांडातील सार्वकालिक आभास हा स्वतः काळच असतो. माणसाचे वय वाढते, तसे त्याचे शहाणपण वाढीस लागणे अपेक्षित असते. अगदी त्याप्रमाणे, काळ पुढे सरकतो तसा तो निर्माण करीत असलेला हा भ्रम ओळखून, तो डी-कोड करून, त्यातून पुढे येणारी वेळ कशी सुसंगत आणि जगण्यास सुसह्य करता येईल, यासाठी एक सार्वत्रिक शहाणपण निर्माण होणे अपेक्षित असते.

ही जाणीव ठेवूनच एखादे वर्ष संपत असताना, मागे गेलेल्या रस्त्यावर एक नजर टाकून पुढच्या वाटचालीसाठी आपल्या गती आणि मतीला योग्य दिशा देण्याचा दिवस म्हणजे ३१ डिसेंबर! सरते वर्ष भारत आणि जगाच्या दृष्टीने अनेक अर्थांनी पारखण्यासारखे होते. २०२४ ची चर्चा तर गेली काही वर्षे सुरूच आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, येत्या वर्षात भारत आणि अमेरिका या अनुक्रमे सर्वांत मोठ्या आणि जुन्या लोकशाहीच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या आणि देशाच्या आयुष्यातही असा एक महत्त्वाचा टप्पा येतो, जो त्याचे पुढच्या काही दशकांचे भवितव्य ठरवतो. नव्या वर्षाची पहाट फटफटत असताना एवढी जाणीव प्रत्येकाला होणे, ही गोष्ट या सोनेरी पहाटेनंतरचा पुढचा दिवसही लखलखीत असण्याची शाश्वती देईल. भारत २०२३ मध्ये चांद्रयान – ३ च्या माध्यमातून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा पहिला देश ठरला. ही प्रत्येक भारतीयासाठी गौरवाची गोष्ट असली, तरी पीयूष मिश्रांच्या या नज्मची आठवण करून देणारीही आहे… एक बगल में चांद होगा, एक बगल में रोटियाँ.. एक बगल में नींद होगी, एक बगल में लोरियाँ.. हम चाँद पे रोटी की चादर डालकर सो जाएंगे… हे आठवण्याचे कारण म्हणजे भारताचा भूक निर्देशांक २९.१ आणि यातील जागतिक क्रमवारी १११ आहे, जी गंभीर स्वरूपाची समजली जाते. देशात २२५ दशलक्ष लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही आणि ४० कोटी लोक रात्री उपाशी झोपतात. कोरोनाच्या संकटानंतर जागतिक अर्थनीतीला रशिया – युक्रेन आणि इस्रायल – हमास युद्धाचे जोरदार तडाखे बसले. जगाला या झळांचे चटके जाणवत असतानाही या वर्षात भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात ७.६ % वाढ होऊन, हा देश आज जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था झाला आहे. पण, हे आकडे साजरीकरणासाठी पुरेसे नाहीत.

भांडवलशाही नव्या युगाच्या हातात हात घालून येते, तेव्हा तिला कुठलीही आणि कशाचीही किंमत मोजून वाढ हवी असते. आता ती केवळ नवभांडवलशाहीच्या स्वरूपातच नव्हे, तर आणखी क्रूर रूपात २०२४ मध्ये पुढे येऊ पाहते आहे. एकीकडे कर्मचारी महिलेला मूल होऊ न देण्यासाठी कॉर्पोरेट क्षेत्रात विशेष भत्ता देण्याचा विचार होणे आणि दुसरीकडे प्रगतीचा महामार्ग बनवताना भविष्याच्या अंधाऱ्या बोगद्यात ४१ कामगार १७ दिवस अडकून पडणे ही समृद्ध अर्थव्यवस्थेची करडी बाजू नव्या वर्षाचे नियोजन करताना विसरता येणार नाही.

प्रत्येक दिवसात आपल्या प्रत्येकासाठी एक भावना व्यापून राहते, तशीच एक भावना देशातही एखाद्या वर्षात दाटून आलेली असते. २०२३ मध्ये आनंदाला उधाण येण्यासारख्या अनेक गोष्टी घडल्या असल्या, तरी मणिपूरमधील हिंसाचार, जातीय – धार्मिक द्वेषातून झालेल्या हिंसक घटना, कोरोमंडल रेल्वे अपघात, समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल बस जळून झालेली दुर्घटना अशा गोष्टींचे गालबोटही लागले. त्यामुळे अर्थव्यवस्थेचा वेग प्रगतीच्या वाहनात बसू न शकणाऱ्यांना चिरडणारा आणि मानवी मूल्यांच्या चिंधड्या उडवणारा असेल, तर त्यातून साधल्या जाणाऱ्या विकासाचा कुरूप चेहरा समोर येऊ शकतो, याचे भान २०२४ साठी सज्ज होताना ठेवावे लागेल. २०२३ मध्ये जगात आणि देशात एक सार्वत्रिक भावना वाहताना दिसली, ती म्हणजे नवराष्ट्रवादाची. हा ‘नव’ शब्द यासाठी की यामध्ये राष्ट्राच्या अस्मितेसोबत फक्त मी आणि माझेच काय ते खरे, हा अट्टहास अधिक दिसतो. पण, मी राष्ट्रासाठी नेमके काय करू शकतो, याचा मात्र लवलेश दिसत नाही. आपण स्वत: प्रगत झालो, तर देश आपोआप प्रगती करेल. त्यामुळे नव्या वर्षात पाऊल टाकताना फुकाच्या अस्मिता सोडून आधी ‘स्व’च्या विकसनावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

२०२३ मध्ये आपण आणि आपले कुटुंब सर्व आघाड्यांवर किती पुढे आलो, याची गोळाबेरीज करतानाच २०२४ मध्येकिती आणि कशी प्रगती करायची, याचे नियोजन प्रत्येकाने नक्की करावे. ‘हम चले ना चले, देश चल पडा हैं..’ असे पंतप्रधान म्हणतात, याचा अर्थ आता काही केल्या देशाची प्रगती थांबणार नाही, असा आहे. आपण नागरिक म्हणून देशासाठी काहीच करायचे नाही, असा तो अर्थातच नाही. कला, क्रीडा, सांस्कृतिक आघाडीवर २०२३ हे वर्ष फारसे आशादायी ठरले नाही. ऑलम्पिक पदके मिळवून देणाऱ्या महिला कुस्तीपटू लैंगिक छळाच्या विरोधात कित्येक दिवस रस्त्यावर आंदोलन करीत होत्या, हे देशासाठी नक्कीच भूषणावह नव्हते. या प्रकरणानंतर अखेर क्रीडा मंत्रालयाने कुस्ती महासंघ बरखास्त करणे, हे खरे तर उशिरा सुचलेले शहाणपण. किमान आता तरी या क्षेत्रात नैतिकता, पारदर्शकता आणि गुणवत्ता वाढवण्याचे उद्दिष्ट हवे. नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला नव्या वर्षात मोकळा श्वास घेता येईल, यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मावळत्या वर्षात तीन मोठ्या वास्तू पूर्ण होताना आपण पाहिल्या. वाराणसीचे जगातील सर्वाधिक क्षमतेचे स्वरवेद ध्यान मंदिर, सुरत येथील डायमंड बूर्स ही जगातील सर्वात मोठी हिऱ्यांच्या व्यापाराची इमारत आणि देशाचे नवे संसद भवन. २०२४ ची सुरुवात अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाने होणार आहे. याचा अर्थ आपण आध्यात्मिक, औद्योगिक आणि लोकतांत्रिक आणि धार्मिक या चार आघाड्यांवर जगातील सर्वात मोठ्या वास्तू बांधून नेतृत्व करू पाहत आहोत, हे कौतुकास्पद आहे. पण, याला जोडून येणारी आव्हाने समजून घेत आपण सज्ज झाले पाहिजे.

नव्या संसद भवनात चार बेरोजगार तरुणांनी सुरक्षा कवच भेदून देशाच्या सर्वांत महत्त्वाच्या वास्तूच्या सुरक्षेसोबत लोकशाहीच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. एकीकडे देश समृद्धीच्या वाटेवर निघाला असताना, बेरोजगार तरुण हताश होऊन माथेफिरू कृत्याकडे वळतो आहे, हा धडाही नव्या वर्षासाठी खूप महत्त्वाचा आहे. म्हणून सर्वात मोठे मंदिर जसे धर्मरक्षण करेल तसे जगातील अत्यंत दर्जेदार शिक्षण आणि कौशल्य देणारे सर्वात मोठे विद्यापीठही देशात झाले, तरच विवेकाचे रक्षण होईल. फक्त सकल राष्ट्रीय उत्पन्नच नव्हे, तर सकल राष्ट्रीय आनंद निर्देशांकही आर्थिक प्रगतीचे मानक असतो.

हा निर्देशांक संपन्न मानसिक, शारीरिक आरोग्यातून आणि विवेकशील व्यक्तिगत, सामाजिक वर्तनातून वाढतो. देशातील प्रत्येकाच्या आरोग्याबाबत आणि विशेषत: मानसिक आरोग्याच्या आघाडीवर बऱ्याच चांगल्या गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नव्या वर्षात हा आनंदाचा निर्देशांक वाढण्यासाठी विद्वेष, विखाराचा त्याग करून विवेकी विचार – वर्तनाला प्राधान्य द्यायला हवे. प्रत्येक व्यक्तीचे म्हणून जसे एक टेम्परामेंट असते, तसे ते एका विशिष्ट काळात देशाचे आणि त्या काळाचेही असते. त्यामुळे हिंसा, द्वेष, उपद्रव अशा अनर्थकारी गोष्टींनी सार्वत्रिक वर्चस्व गाजवू नये, यासाठी पुढच्या काळात प्रत्येकाला सजगपणे प्रयत्न करावे लागतील. चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवोऽहम् … असा उपदेश करताना आदी शंकराचार्य आपल्याला, ‘तुझ्यातच विशुद्ध चेतनेचा, शिवाचा अंश आहे,’ असं सांगतात.

व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनातील आपली स्वयंपूर्णता, स्व-प्रेरणा आणि स्व-नियमनातूनच या अंशाचे, अस्तित्व दिसत असते. त्यामुळे महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशातील प्रत्येकाने या मूल्यांचे महत्त्व ओळखले पाहिजे. ते समजून घेत पावले टाकली तर व्यक्तिगत, कौटुंबिक, सामाजिक नि राष्ट्रीय पातळीवर निश्चितपणे यश मिळेल. उंबरठ्याशी आलेले नवे वर्ष साऱ्यांना अशा प्रगतीचे दान, आनंदाचे वाण अन् विवेकाचे भान देणारे ठरो, याच शुभेच्छा..!

(संपर्क- dramolaannadate @gmail.com )



Source link