
डॉ. श्रीरंग गायकवाड7 दिवसांपूर्वी
- कॉपी लिंक
पंढरीच्या वारीमागे एक वैश्विक विचार आहे. जगात जेव्हा युद्ध, हिंसा, द्वेष, विखार पसरवणाऱ्या घटना घडतात, तेव्हा या वारकरी विचारांची मानवाला गरज भासते. हा विचार आहे मानवतेचा, बंधुभावाचा, शांती-प्रेमाचा! तो जगभर पोहोचवण्याचा ध्यास भास्कर हांडे या जागतिक कीर्तीच्या एका मराठी चित्रकाराने घेतला आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने समता-सलोख्याच्या परंपरेचा वेध घेणाऱ्या या दुसऱ्या लेखातून डॉ. श्रीरंग गायकवाड यांनी भास्कर हांडे यांच्या चित्र-शिल्परूपातील वैश्विक संतकार्याला दिलेले शब्दरूप… दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील सर्वात रक्तरंजित युद्ध लढले गेले इराक आणि इराण या दोन देशांदरम्यान. आठ वर्षे चाललेल्या या युद्धात लाखो लोकांना जीव गमवावा लागला. असंख्य लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. यातील बहुतेक लोक युरोपात आले. युरोपातील देशांनी या स्थलांतरितांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्यातील कलाकारांना हॉलंडमध्ये व्यासपीठ देण्याचा प्रयत्न सुरू झाला. ‘80 क्वेशन्स’ नावाच्या संस्थेने त्यासाठी ‘शो युवर होप’ नावाचा उपक्रम सुरू केला. त्यासाठी देशात यापूर्वी स्वेच्छेने आलेल्या कलाकारांची मदत घेण्यात आली. या कलाकारांमध्ये पुण्यातील चित्रकार भास्कर हांडे होते. हांडे 1982 मध्ये हॉलंडमध्ये गेले होते. हॉलंड सरकारने देशात स्थायिक झालेल्या हांडे आणि त्यांच्यासारख्या इतर कलाकार, शिल्प-चित्रकारांना आवाहन केले. युद्धपीडितांना तेथील समाजात सामावून घेण्यासाठी काय करता येईल, याबद्दल विचारणा केली. त्याला प्रतिसाद देत हांडे आणि त्यांचे कलाकार मित्र ‘शो युवर होप’मध्ये सहभागी झाले. त्यात प्रामुख्याने चित्रकारांकडून चित्रे काढून घेण्याचा उपक्रम सुरू झाला. चित्रांच्या माध्यमातून ते व्यक्त होऊ लागले. सोसाव्या लागलेल्या युद्धाच्या झळांचे अनुभवकथन करू लागले. युद्ध होऊ नये, शांततेने सहजीवन जगता यावे म्हणून काय करता येईल, याबाबतचे विचार ते चित्रांच्या माध्यमातून कॅन्व्हासवर उतरवू लागले. हे काम पुढे नेताना भास्कर हांडेंना प्रेरणा मिळाली, ती भारतातील बंधुभाव सांगणाऱ्या वारकरी विचारांची. हांडेंनी सांगितलेले हे विचार त्या परदेशी कलाकारांनाही आपले वाटले. साडेसातशे वर्षांपूर्वी हे मानवतेचे विचार सांगत संत नामदेवांनी देशभर भ्रमंती केली होती. सततची आक्रमणे, वारंवारची युद्धे यातून उसवणारी सामाजिक वीण त्यांनी प्रेमविचारांच्या धाग्याने पुन्हा शिवली होती. त्यासाठी हातात कुठलेही शस्त्र नसलेला, समता, ममता, विश्वकल्याणाचे प्रतीक असणारा पंढरपूरचा सावळा विठोबा त्यांनी जणू चालताबोलता केला होता. या विचारांचा पाया घालणारे संत ज्ञानेश्वर यांचे ‘भूतां परस्परें पडो। मैत्र जीवांचें॥’ हे पसायदान देशभर रुजवत होते. अशा संतशिरोमणी नामदेवरायांचा आदर्श समोर ठेवून हांडे त्यांच्या पुणे येथील ‘वैश्विक कला पर्यावरण’च्या माध्यमातून ‘गिव्ह अँड टेक’ या प्रकल्पाच्या रूपाने पूर्वीच कार्यरत होते. त्याअंतर्गत भारतातील कलाकार हॉलंडमध्ये आणि हॉलंडचे कलाकार भारतात येऊन परस्पर विचार, संस्कृतीची देवाण-घेवाण करत होते. त्याद्वारे एकदा इजिप्त, इस्रायल, इराक, हॉलंड, बेल्जियम या पाच देशांतील चित्रकार पुण्यात आले होते. त्यांनी वारीचा उगम असलेल्या आळंदी, देहू या ठिकाणी भेट दिली होती. एकोप्याच्या वारकरी विचाराने नांदणाऱ्या इथल्या समाजाचे त्यांनी बारकाईने निरीक्षण केले होते. त्या कलाकारांच्या अनुभवावर तीन पुस्तकेही डच, इंग्रजी आणि मराठी भाषेत प्रकाशित झाली. या उपक्रमाच्या अनुभवाचा उपयोग हांडे यांना ‘शो युवर होप’ हा प्रकल्प उभा करताना झाला. स्थलांतरित कलाकारांचे सेमिनार सुरू झाले. त्यात त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे व्यक्त होण्याची संधी मिळाली. त्यांनी चितारलेल्या चित्रांमध्ये होती, केवळ मानवी करुणा आणि शांतिपूर्ण सहजीवनाची आशा! मग ही चळवळ जगभर पोहोचवण्याचे नियोजन झाले. चित्रकारांनी काढलेल्या सर्व चित्रांचे जगभर प्रदर्शन करणे आणि त्या निमित्ताने प्रत्येक देशातील चित्रकारांना या शांतियात्रेत जोडून घेणे सुरू झाले. हांडेंच्या सूचनेवरून या चित्रांची वारी भारताकडे निघाली. हॉलंड, जर्मनी, बल्गेरिया, टर्की, ऑस्ट्रिया, जॉर्जिया, इराण आणि भारत-पाकिस्तान दरम्यानच्या वाघा बॉर्डरवरून ही चित्रवारी भारतात दाखल झाली. भारतातील अमृतसर, चंदीगड, दिल्ली, आग्रा, जयपूर, अहमदाबाद, बडोदा, नाशिक, पुणे, मुंबई, गोवा, बंगळुरू या शहरांमध्ये ही प्रदर्शने झाली. या प्रदर्शनात युद्धाच्या खाईत होरपळलेल्या स्थलांतरित चित्रकारांची 100 निवडक चित्रे होतीच, परंतु प्रदर्शन ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणच्या स्थानिक चित्रकारांनाही यात सामावून घेण्यात आले. 2022 मध्ये हॉलंडच्या एन्ड होपन या शहरात या उपक्रमातील निवडक चित्रांचे ‘आर्टिस्ट फ्रॉम अराऊंड द वर्ल्ड’ हे प्रदर्शन पार पडले.
‘शो युवर होप’मध्ये जगभरातील हजारभर चित्रकार सहभागी झाले आहेत. त्यांच्या अभिव्यक्तीतून मानवतेचा विचार जागवला जात आहे. हाच विचार सांगणारी ‘पंढरीची वारी” काय आहे, हे जगभरातील लोकांना समजावे म्हणून हांडेंनी पंढरीची वारी आणि पालखी सोहळ्यावर “पालखी सोहळा 325 वर्षे’ हे मराठी आणि इंग्रजी भाषेतील पुस्तक लिहिले. 2018 मध्ये ‘Pilgrimage VARI : Dehu-Alandi to Pandharpur’ हे इंग्रजी भाषेतील पुस्तकही त्यांनी लिहिले. लंडनमधील नेहरू सेंटरमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन झाले. तिथे उपस्थित असलेल्या ब्रिटिश मंडळींना वारीच्या परंपरेबद्दल मोठे कौतुक वाटले. अशी पायी वाटचाल करत शांतता, सलोख्याचा संदेश देणारी वारी प्रत्येक देशात निघायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या मताला अनुसरून युरोपात गेलेल्या मराठी लोकांनी आता तेथेच वारी सुरू केली आहे. हांडेंच्या पुस्तक प्रकाशनाचे आयोजक असलेले, इंग्लडमध्ये राहणारे अनिल खेडकर या ‘ग्लोबल वारी’चे प्रणेते आहेत. आषाढी वारीसाठी देहू-आळंदीहून संतांच्या पालख्या प्रस्थान ठेवतात, त्याच वेळी खेडकर आणि त्यांची मित्रमंडळी संतांच्या विचारांचे स्मरण करत, आपापल्या शहरांमध्ये पायी चालू लागतात. पंढरीच्या वारीत वारकरी रोज जेवढे अंतर चालतात, तेवढेच अंतर ही मंडळी चालतात. असे दररोज चालणाऱ्या सदस्यांची नावे आणि त्यांचे अंतर यांची नोंद एका एक्सेल शीटमध्ये ठेवली जाते. आषाढी एकादशीच्या दिवशी इंग्लंडमधील ग्लोबल वारीचे सदस्य प्रत्यक्ष आणि ऑनलाइनच्या माध्यमातून लंडनसारख्या मध्यवर्ती ठिकाणी एकत्र जमतात आणि वारीचा समारोप करतात. तिथे जमलेल्या लोकांना, मुले-तरुणांना संतांचा समतेचा विचार समजावून सांगितला जातो. यंदा या उपक्रमाचे पाचवे वर्ष आहे. या सर्व प्रवासात भास्कर हांडेंच्या सुप्रसिद्ध ‘तुझे रूप, माझे देणे’ या चित्र-शिल्प प्रदर्शनाचाही मोठा वाटा आहे. हे प्रदर्शन घेऊन १९९५ पासून ते जगभर फिरत आहेत. या प्रदर्शनात संतांच्या; विशेषत: तुकोबारायांच्या अभंगातील विचार सांगणारी चित्रे आणि शिल्पे आहेत. ती हांडेंनी स्वत: साकारली आहेत. त्यातील विश्वबंधुत्वाचा विचार जगभरातील माणसांच्या हृदयाला हात घालतो आहे. त्यातून युद्धापेक्षा परस्परांवर प्रेम करणाऱ्या आनंददायी सहजीवनाची गरज जगाच्या लक्षात येऊ लागली आहे. या वैश्विक संतकार्यात आपण खारीचा वाटा उचलतो आहोत, याचे भास्कर हांडेंना अतीव समाधान आहे.
डॉ. श्रीरंग गायकवाड dnyanabatukaram@gmail.com संपर्क : ९८३३६६१४४३