रसिक स्पेशल: मराठीचा गौरव वाढवण्यासाठी आपण नेमके काय करतो?

0
16
रसिक स्पेशल:  मराठीचा गौरव वाढवण्यासाठी आपण नेमके काय करतो?


डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

केवळ उत्सव साजरा करणे, टाळ्या पिटण्याजोगे मनोरंजक समारंभ अन् पुरस्कार वितरण सोहळे करणे, राजकारण्यांभोवती घोटाळण्याच्या संधी शोधणे म्हणजे भाषेचा एखादा दिन साजरा करणे नव्हे. मराठी भाषेसाठी आपण टिकाऊ स्वरूपाचे काय करतो, हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला पाहिजे. २७ फेब्रुवारीला साजरा होत असलेल्या ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या औचित्याने या भाषेची विविध उपयोजित क्षेत्रे, संचित अन् परंपरांकडे लक्ष वेधणारा विशेष लेख.

खरे तर २७ फेब्रुवारी हा मराठी भाषा दिवस, मातृभाषा दिन, मराठी भाषा गौरव दिवस, जागतिक मराठी भाषा दिवस की मराठी राजभाषा दिवस याबाबत कोणतीही सुस्पष्टता आपल्यामध्ये असू नये, ही मराठी भाषिकांची भाषा साक्षरता की भाषा- निरक्षरता? ही गोष्ट नेमके काय दर्शवते? मराठी भाषेबाबतची सजगता की घोर उदासीनता? दिवस कशाचाही असो; तो साजरा करणे एवढेच फक्त आपल्याला का ठाऊक असते? तो दिवस का, कशासाठी, त्याचे वेगळेपण काय, त्या दिवसाच्या निमित्ताने नेमके काय होते, काय करणे अपेक्षित आहे, याच्याशी आपण आपला काही संबंध का ठेवत नाही? मराठी भाषेविषयीचा कोणताही दिवस वा पंधरवडा असो; यातल्या प्रत्येक वेळी आपण करतो ती फक्त साहित्यकेंद्री, त्यातही करमणूकप्रधान, व्यासपीठीय आयोजने, कविसंमेलने, अभिवाचने आणि तेच ते कौतुक सोहळे.

भाषाकेंद्री, बोलीकेंद्री आयोजनांची वानवा

भाषा दिवसांच्या निमित्ताने भाषाकेंद्री अशी आयोजने अपवादानेच केली जातात. त्यातही भाषा या बोली आहेत, हे विसरलेच जाते. बोलीकेंद्री काम तर होतच नाही. २७ फेब्रुवारी हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ आहे, मराठी राजभाषा दिन नव्हे, एवढे तरी अगोदर आपण लक्षात ठेवले पाहिजे. तो कुसुमाग्रजांच्या जयंतीच्या निमित्ताने पाळायचा असा निर्णय महाराष्ट्र शासनाने २१ जानेवारी २०१३ ला घेतला आहे. मराठी राजभाषा दिन हा महाराष्ट्र राज्य स्थापन झाले त्या दिवशी, म्हणजे १ मे रोजी असतो. मात्र, त्यावेळी शाळा, महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुटी असते म्हणून शासनातर्फे जानेवारी महिन्यात मराठी भाषा पंधरवडा साजरा केला जातो. हा ‘मराठी भाषा पंधरवडा’ असतो, ‘मराठी साहित्य पंधरवडा’ नसतो. परंतु, तो साजरा होतो तो केवळ साहित्य पंधरवडा याच स्वरुपात. भाषेशी संबंधित सारेच असे केवळ साहित्यकेंद्री, त्यातही अभिजनकेंद्री केले गेल्याने मराठी भाषाविषयक असे कार्य होतच नाही. मग आपण हे दिन साजरे करतो म्हणजे नेमके काय करतो, कशासाठी करतो, हे प्रश्न तरी या निमित्ताने विचारले गेले पाहिजेत. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने भाषाविषयक असे नेमके काय करायला हवे, याचा साधा विचारही आपण करून बघायला का तयार नाही? भाषा शिक्षणच आपण देत – घेत नाही, याकडेही या निमित्ताने आपले लक्ष जात नाही. विद्यापीठांच्या, महाविद्यालयांच्या मराठी विभागांतून दिले जाते ते मराठी भाषा शिक्षण नसते, ते केवळ मराठी साहित्याचे शिक्षण असते. ते मराठी भाषा विभाग नसतात, ते मराठी साहित्य विभाग असतात. आपण मराठी साहित्यात पदवी वा पदव्युत्तर पदवी मिळवतो. मराठी भाषेत नव्हे. असे का? असा प्रश्नही आपल्याला पडत नाही. भाषेबद्दलची एवढी अनास्था आपल्यात असते. परिणामी साहित्य शिकवणे म्हणजेच भाषा शिक्षण आणि साहित्यकेंद्री आयोजने म्हणजेच भाषेचा गौरव करणे असा आपला बाळबोध समज झाला आहे, तो अगोदर दूर सारला पाहिजे.

केवळ साहित्य म्हणजे भाषा नव्हे!

भाषा आणि साहित्य या वेगवेगळ्या बाबी आहेत. साहित्य हा भाषेचा केवळ दहा, पंधरा टक्के व्यवहार आहे. उर्वरित नव्वद टक्के भाषा व्यवहार हा साहित्यबाह्य असतो. तो भाषेच्या, प्रत्यक्ष जीवनाच्या विविध क्षेत्रांतील उपयोजित रूपातच चालतो. साहित्यिक, वाङ्मयीन भाषिक रूपात तो चालत नाही. पण, त्याकडे दुर्लक्ष करत मराठी भाषेचा गौरव करणे म्हणजे केवळ साहित्याचा गौरव करणे, हेच गृहीत धरले आहे. तो भाषेच्या केवळ दहा टक्के व्यवहार असणाऱ्या साहित्य रूपापर्यंतच आपण बंदिस्त केला आहे. त्यामुळे भाषेच्या कितीतरी मोठ्या उपयोजनांच्या क्षेत्राकडे आपली गौरव दिनाची आयोजने पूर्णपणे डोळेझाक करत असतात. भाषेचा गौरव करणे म्हणजे काय, याबद्दलची आपली जाण आणि भान असे मागासलेले, आक्रसलेले, संकुचित स्वरूपाचे असते. त्याचेच दर्शन मग भाषा गौरव दिनाच्या ठिकठिकाणच्या कार्यक्रमांतून घडते. आपण जे करतो, ते चुकीचे की बरोबर हे तपासून बघायचीही, कोणी निदर्शनास आणून दिल्यावरही त्याकडे लक्ष देण्याची गरज आपल्याला आणि शासनालाही वाटत नाही. आपण करतो तेच बरोबर असेच आपले आणि शासनाचेही सुरू असते. हे राज्य स्थापन होऊन त्रेसष्ट वर्षे झाली तरीही, केंद्रात जसा स्वतंत्र राजभाषा विभाग आहे तसा महाराष्ट्र शासनाकडे स्वतंत्र मराठी राजभाषा विभागच नाही. जो मराठी भाषा विभाग आहे, त्याला स्वतःचे स्वतंत्र असे कोणते कामच नाही. त्यामुळे राजभाषा अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र यंत्रणाच महाराष्ट्रात नाही.

मराठीशी संबंधित अनेक विषय उपेक्षित

साहित्याऐवजी मराठी भाषेच्या गौरवार्थ आपण एकूणच या भाषेच्या प्राचीन, अर्वाचीन, आधुनिक, अभिजात, उपयोजित अशा कोणकोणत्या रूपांचा गांभीर्याने वेध घेतो? मराठी भाषेच्या कुठल्या संचिताचे स्मरण आपण कोणकोणत्या रूपात करतो? मराठी भाषा, तिची स्थिती आणि गती, ऐतिहासिकदृष्ट्या मराठीचे अन्य भाषांपासूनचे वेगळेपण, शिक्षणात मराठी भाषेचे स्थान, आधुनिक ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, विकास यात मराठीचे स्थान क्षीण का आहे? ते मजबूत का केले जात नाही? माध्यम म्हणून मराठीची अवस्था, दुरवस्था, तिची सांस्कृतिक वैशिष्ट्ये, बलस्थाने, तिच्या विविध बोली, त्यांच्याशी असणारा – नसणारा संबंध, प्रशासकीय मराठी, विधी आणि न्याय क्षेत्रातील मराठी, दृक्-श्राव्य माध्यमातील मराठी, मराठी भाषेपुढच्या समस्या आणि आव्हाने, बृहन्महाराष्ट्रातील मराठीची सद्य:स्थिती, मराठीचे भाषा धोरण, भाषा नियोजन, तिची लिपीसुलभता, मराठीतून अन्य भाषांत अनुवादाची स्थिती.. अशा मराठी भाषेशी संबंधित कितीतरी विषयांचा स्पर्शही आपल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या शासकीय आणि अशासकीय कार्यक्रमांना चुकूनही का होत नाही?

मराठीची विविध उपयोजित क्षेत्रे, विविध बोली, त्यातील संचित आणि गौरवशाली परंपरा कोणत्या? त्या कशा विकसित होत गेल्या? या साऱ्यांचे स्मरण न करणे म्हणजेच मराठी भाषा गौरव दिवस साजरा करणे आहे का? केवळ साहित्याचा नव्हे, तर मराठी संस्कृतीचा, भाषेचा गौरव वाढवणाऱ्या बाबी कोणत्या, हे मराठी भाषिक समाजाला माहीत करून देण्यासाठी ना शासनाचे गौरव दिनाचे उपक्रम उपयुक्त ठरतात ना अशासकीय संस्थांचे. मराठी भाषेचा सारा गौरव फक्त अभिजन, नागरी, महानगरी आणि साहित्यकेंद्रित्व या पुरताच मर्यादित आहे का? जानपद, अनागरी भाग, त्यांचा भाषिक व्यवहार, प्राकृत रूपातील मराठी भाषेचे योगदान यांनी मराठीला खरी गौरवशाली परंपरा बहाल केली आहे. त्याचे किती स्मरण या प्रसंगाने केले जाते? केवळ उत्सव साजरा करणे, टाळ्या पिटण्याजोगे मनोरंजक समारंभ अन् पुरस्कार वितरण सोहळे करणे, राजकारण्यांभोवती घोटाळण्याच्या संधी शोधणे अन् गर्दी जमवून दिखाऊ स्वरूपाचे तेवढे काही करून दाखवणे म्हणजे भाषेचा एखादा दिन साजरा करणे नव्हे. मराठी भाषेसाठी आपण टिकाऊ स्वरूपाचे काय करतो, हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित झाला पाहिजे.

(संपर्कः shripadbhalchandra@gmail.com)



Source link