रसिक स्पेशल: गांधीजी आणि क्रिकेट

0
4
रसिक स्पेशल:  गांधीजी आणि क्रिकेट


अतुल कहाते10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘गांधीजी आणि क्रिकेट?’ असा प्रश्न हे वाचणाऱ्या प्रत्येकाच्या मनात उभा राहील. गांधीजींचा क्रिकेटशी जवळपास काहीच संबंध आला नसला, तरी एकदा त्यांच्या समाजकारणात क्रिकेटचा विषय अचानक आला आणि त्यावर त्यांनी स्वीकारलेलं धोरण भविष्यासाठी दूरगामी ठरलं. बुधवारी, २ ऑक्टोबरला साजऱ्या होणाऱ्या गांधी जयंतीच्या औचित्याने त्या मागील भूमिका समजून घेण्याचा हा प्रयत्न…

म. गांधींचा क्रिकेटशी असलेला संबंध हा त्यांच्या एकूण व्यापक दृष्टिकोनाचा एक भाग म्हणून अभ्यासणं गरजेचं आहे. १९०९ मध्येच गांधीजींनी आधुनिक विकासवादाबद्दलची आपली मतं स्पष्ट केली होती. वर्चस्ववादाच्या विरोधातला नि:शस्त्र लढा लढणं, जातिवाद, समाजामधली असामनता या सगळ्या गोष्टींशी लढायचं असेल, तर मनोरंजनाच्या आधुनिक साधनांपासून आपण दूर राहिलं पाहिजे, अशी त्यांची स्पष्ट भावना होती. यामुळेच चित्रपट, रेडिओ अशा करमणुकीच्या सोयींपासून लोकांनी लांब राहण्याविषयी ते आग्रही असत. साहजिकच, आधुनिक खेळ आणि त्यातही ब्रिटिशांनी भारतात आयात केलेला क्रिकेटसारखा खेळ त्यांना पसंत असणं खूपच अवघड होतं. शालेय जीवनात राजकोटमध्ये राहात असताना त्यांच्या पारशी मुख्याध्यापकांनी सगळ्या विद्यार्थ्यांना जिम्नॅस्टिक्स आणि क्रिकेट या खेळांची सक्ती केली होती. हे गांधीजींना अजिबात रुचलं नाही. एक तर मुळात ते स्वभावाने काहीसे लाजाळू असल्यामुळे इतर मुलांसह खेळांमध्ये सहभागी व्हायला कचरत असत. दुसरं म्हणजे, त्यांचे वडील खूप आजारी असल्यामुळं आपण त्यांच्या सेवेसाठी त्यांच्या जवळ राहिलं पाहिजे, असं त्यांना वाटायचं. क्रिकेट तसंच फुटबॉल हे खेळ त्यांची सक्ती होईपर्यंत आपण कधीच खेळलो नसल्याचं गांधीजींनीच पुढे सांगितलं. शिवाय, जिम्नॅस्टिक्सला आपण विरोध करणं चुकीचं होतं, हेही त्यांनी मान्य केलं. माणसाच्या मानसिक जडघडणीबरोबरच त्याची शारीरिक जडणघडणही तितकीच महत्त्वाची असल्याचं नमूद करतानाच, आपण पूर्वी जिम्नॅस्टिक्स हा फक्त शारीरिक क्रीडा प्रकार असल्याचा समज करून घेण्याची चूक केली, हेही त्यांनी प्रांजळपणे सांगितलं.

विसाव्या शतकाच्या सुरूवातीपासून भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी काही काळापर्यंत भारतामध्ये धार्मिक विभागणीवर आधारित असलेल्या क्रिकेट स्पर्धा खेळल्या जायच्या. सुरूवातीला त्यात पारशी, हिंदू, मुस्लिम असे तीन संघ असले, तरी कालांतरानं ही तिरंगी स्पर्धा आणखी व्यापक होत चौरंगी अणि त्यानंतर पंचरंगी झाली. दरम्यान, भारतात रणजी करंडक ही राष्ट्रीय स्पर्धा सुरू झाल्यावर, आता धार्मिक आधारावरचं क्रिकेट पुरे झालं, असा मतप्रवाह १९४० च्या सुमाराला वाढीस लागला. हिंदू जिमखान्याच्या काही सदस्यांनीसुद्धा ही स्पर्धा भरवू नये, असं मत व्यक्त केलं. अर्थात, आपल्यातील चर्चेतून हा मुद्दा निकालात निघू शकेल, असं हिंदू जिमखान्याच्या सदस्यांना वाटत नसल्यामुळं आपण विनाकारण चर्चेचं गुऱ्हाळ न लावता गांधीजींशी चर्चा करून त्यांना याविषयी काय वाटतं हे तपासावं, असं बहुतांश लोकांचं मत पडलं. यासाठी ६ डिसेंबर १९४० ला गांधीजींना त्यांच्या वर्धा इथल्या आश्रमात भेटण्यासाठी म्हणून हिंदू जिमखान्याचे अध्यक्ष एस. ए. शेटे, उपाध्यक्ष एम. एम. अमरसे आणि एक सदस्य जमनादास पितांबर अशी तीन जणांची समिती रवाना झाली.

या समितीची गांधीजींशी झालेली चर्चा पंचरंगी सामन्यांचं भवितव्य ठरवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची होती. त्यावेळी या संदर्भात गांधीजींनी व्यक्त केलेल्या मतांची बातमी इंग्रजी दैनिकात विस्ताराने प्रसिद्ध झाली होती. त्यांच्या या मतांचा सारांश असा : ‘मुंबईमध्ये होऊ घातलेल्या पंचरंगी सामन्यांविषयी माझं मत काय आहे, हे अनेक जण जाणू इच्छितात… सत्याग्रही लोकांची अटक आणि त्यांना तुरुंगात टाकणं या गोष्टींच्या निषेधार्थ या स्पर्धेतून बाहेर पडण्याच्या बेताविषयी मला आत्ताच समजलं. यासाठी हिंदू जिमखान्याचे तीन पदाधिकारी मला भेटले. खरं म्हणजे, मला या स्पर्धेविषयी आणि तिच्यासंबंधीच्या रूढ संकेतांविषयी फारसं काही माहीत नाही. साहजिकच, माझं या विषयीचं मत हे एखाद्या सर्वसामान्य अबोध माणसासारखं समजण्यात यावं. तरीही ही स्पर्धा होऊ नये, असं मानत असलेल्या लोकांच्या पारड्यात माझं मत नि:संशयपणे जातं, हे मी नमूद करतो. तसंच कुठल्या ना कुठल्या मार्गानं सत्याग्रहासाठी मदत मिळवण्याकरीता मी हे अजिबात म्हणत नसल्याचं स्पष्ट करतो.

आंतरमहाविद्यालयीन किंवा संस्था-संस्थांमधले अशा प्रकारचे सामने खेळलं जाणं मी समजू शकतो; पण हिंदू, पारशी, मुस्लिम आणि अन्य समुदाय यांच्यामध्ये सामने खेळवण्याची कल्पना माझ्या पचनी कधीच पडली नाही. खरं म्हणजे, खिलाडूवृत्तीला अतिशय मारक अशीच ही संघांची रचना आहे. जाती-धर्मांपासून मुक्त असं आपल्या आयुष्यात एकही क्षेत्र असू शकत नाही का? म्हणूनच जे कुणी याच्याशी संबंधित असतील, त्यांनी अशा प्रकारच्या सामन्यांवर बंदी घालावी, असं मी सुचवेन. तसंच जोपर्यंत जग आणि पर्यायाने भारत जागतिक महायुद्धाच्या रक्तरंजित काळात राहील, तोपर्यंत हे क्रीडा प्रकारच तात्पुरते थांबवावेत, असंही आवाहन मी करू इच्छितो.’

आयुष्यभर हिंदू-मुस्लिम एकतेसाठी प्रयत्नशील असलेल्या गांधीजींचा दृष्टिकोन क्रिकेट, पंचरंगी सामने यांच्यापेक्षा खूप व्यापक होता, हे वेगळं सांगायला नको. मुस्लिमांचा क्रिकेटचा वेगळा संघ असू शकतो, तर उद्या मुस्लिमांनी आपला स्वत:चा देश मागितला तर हे लोक त्यावेळी काय भूमिका घेणार, असा त्यांच्या मनातला खरा प्रश्न होता. आयुष्यामधल्या अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या निर्णयांपर्यंत प्रत्येक बाबतीत हिंदू-मुस्लिम एकतेपुढे इतर सगळ्या गोष्टी त्यांच्या दृष्टीनं गौण होत्या. गांधीजींच्या टीकाकारांना मात्र ही गोष्ट मान्य नव्हती. इतकी वर्षे धार्मिक तत्त्वांवर आधारित संघांची निर्मिती होत असताना हिंदू-मुस्लिम संबंध बिघडले नसतील, तर आता हा प्रश्न कशाला विचारला जातो, असं त्यांचं म्हणणं होतं. गांधीजींना मात्र पूर्वीची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती आता राहिली नसल्याचं भान होतं. त्यामुळं किमान इथून पुढं तरी अशा प्रकारच्या स्पर्धा होऊ नयेत, अशी त्यांची इच्छा होती. तसंच दुसरा मुद्दा म्हणजे, पूर्वीपासूनच त्यांना विदेशी क्रीडा प्रकार; त्यातही क्रिकेट आणि एकूणच मनोरंजन, चैन अशा गोष्टींविषयी अजिबात आपुलकी नव्हती. कदाचित ही गोष्टसुद्धा मूळच्या धर्माधारित विभागणीला त्यांच्या असलेल्या विरोधात मिसळली गेली असावी. गांधीजींच्या या भूमिकेवर त्या काळातील काही लोकांनी भरपूर टीका केली. पण, अखेर गांधीजींचा सम्यक विचारच योग्य ठरला. भारतामधलं धार्मिक आधारावरचं क्रिकेट बंद पडलं, ते कायमचंच!

(संपर्कः akahate@gmail.com)



Source link