रसिक स्पेशल: कुठं गेला मराठी बाणा?

0
11
रसिक स्पेशल:  कुठं गेला मराठी बाणा?


डॉ. श्रीरंग गायकवाड9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

अलीकडं आपल्या मराठी बाण्याची धार जणू उतरली आहे. जो तो तहासाठी धडपडत असल्याने मराठी मन तळमळते आहे. अशा स्थितीत तीन दिवसांवर आलेला ‘महाराष्ट्र दिन’ खऱ्या अर्थाने साजरा होण्यासाठी, हे ‘दीन’पण संपून मराठी मुलखात पुन्हा एकदा अभिमानाचा, प्रागतिकतेचा हुंकार घुमला पाहिजे.

महानुभाव पंथाचे संस्थापक आणि थोर समाजसुधारक चक्रधर स्वामी बाराव्या शतकात गुजरातमधून महाराष्ट्रात येऊन स्थायिक झाले. शिवाय, आपल्या शिष्यांनाही ‘महाराष्ट्री वसावे’ अर्थात महाराष्ट्रातच वास्तव्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. याचे कारण महाराष्ट्र भूमी ‘महंत’ म्हणजे थोर आणि गुणवान आहे. इथले लोक तर सात्त्विक आहेतच, पण इथले दगड-धोंडे, माती, वृक्ष, पाऊस आणि वाराही सात्त्विक आहे. येथील लोक अनाचार करत नाहीत आणि इतरांनाही करू देत नाहीत. त्यांच्या सहवासात आपणही सद्गुणी होऊ, हातून सत्कार्य घडेल, असे चक्रधर स्वामी म्हणाले होते.

मराठी माणसाच्या या गुणांची प्रचिती देशाने इतिहास काळापासून वारंवार घेतली आहे. अन्याय, अत्याचार करणाऱ्या परदेशी आक्रमकांविरोधात देशात मराठेच पहिल्यांदा उभे राहिले. मराठे कायम राष्ट्रासाठी म्हणून लढले. तत्त्वांसाठी लढले. अफगाणिस्तान, इराणातून येणारे मूलतत्त्ववादी आक्रमक असोत, औरंगजेबासारखा खुनशी सत्ताधीश असो की सातासमुद्रापलीकडून आलेले इंग्रज असोत; पहिल्यांदा मराठेच त्यांना भिडले. मराठ्यांना पराभूत केल्यानंतरच त्यांना देशात हातपाय पसरता आले. अर्थात इंग्रजांच्या साम्राज्याला सुरुंगही पहिल्यांदा महाराष्ट्रानेच लावला. परचक्राच्या वेळी महाराष्ट्रच देशाच्या मदतीला पहिल्यांदा धावल्याचा इतिहास आहे. मग ते अटकेपार झेंडे लावणे असो की यशवंतराव चव्हाणांच्या रूपाने ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री’ने धावून जाणे असो.

भारतीय म्हणून आपण बंधुभावाने, एकोप्याने राहिले पाहिजे, हा ‘महाराष्ट्र धर्म’ मराठ्यांनीच देशाला शिकवला. अर्थात भाषावार प्रांतरचनेच्या निमित्ताने महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा कट झाल्यानंतर खवळलेला महाराष्ट्रही देशाने अनुभवला. अखेर संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला, पण नव्या राज्याला महाराष्ट्राऐवजी दुसरे नाव देण्याचे ठरत होते. यशवंतराव चव्हाणांनी याबाबतीत संयुक्त महाराष्ट्र समितीच्या एस. एम. जोशींचे मनही वळवले. तेव्हा आचार्य अत्र्यांना एसेम म्हणाले, ‘बाबूराव, आता मुंबईसह महाराष्ट्र मिळतोय ना, मग महाराष्ट्र नावाचा आग्रह सोडायला काय हरकत आहे?’ त्यावर अत्रे एकदम उसळून म्हणाले, ‘अण्णा, म्हणजे काय? अहो, मग एवढं महाभारत आपण कशासाठी केलं? जर नव्या राज्याला महाराष्ट्र नाव दिलं नाही, तर मी तुमच्यासकट कुणालाही स्वस्थ बसू देणार नाही. महाराष्ट्र या नावात ब्रह्मांड भरलेलं आहे. या नावासाठी मराठी जनता आकाशपाताळ एक करील.’ अत्र्यांच्या या आग्रही भूमिकेमुळे नवीन राज्याला ‘महाराष्ट्र’ नाव मिळाले. कारण त्यांनीच आपल्या लेखणी आणि वाणीच्या घणाघातातून संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनजागृतीचा वडवानल उभा केला होता. त्यामुळे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्यावर अत्रे एके ठिकाणी लिहितात, ‘महाराष्ट्र नावाच्या पाट्या पाहून आमच्या अंगावर आनंदाचे चोरटे रोमांच कसे उभे राहतात, याची कल्पना आम्ही इतरांना कशी करून देणार?’

हे केवळ मराठी बाण्यामुळेच शक्य झाल्याचे सांगताना अत्रे लिहितात, ‘महाराष्ट्रावर जेव्हा जेव्हा कोणी दास्य लादण्याचा प्रयत्न करतो, महाराष्ट्राच्या हातापायांत गुलामगिरीच्या शृंखला अडकवण्याचा डाव मांडतो, तेव्हा तेव्हा ते दास्य झुगारून देण्यासाठी आणि त्या गुलामगिरीच्या शृंखला तोडण्यासाठी महाराष्ट्रात बंडखोर निर्माण होत असतात. त्या बंडखोरांच्या हाकेला साऱ्या महाराष्ट्राकडून साद मिळते. संत ज्ञानेश्वर, तुकोबा आणि शिवछत्रपती यांनी केलेल्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्रांतीच्या बंडखोर परंपरा या क्षणापर्यंत महाराष्ट्राने चालू ठेवलेल्या आहेत. त्यांनी शिकवलेल्या बंडखोर मंत्रांचे पुरश्चरण महाराष्ट्र अद्यापही आपल्या मनामध्ये करीत बसलेला आहे. महाराष्ट्राच्या कलेत, वाङ‌्मयात आणि जीवनात चोहीकडे बंडच बंड भरलेले आहे. लावण्या, पोवाडे हे कलेतले बंड आहे. डफ, कडे हे वाद्यातले बंड आहे. ओवी, अभंग हे काव्यातले बंड आहे. चटणी, भाकरी हे भोजनातले बंड आहे. महाराष्ट्रातल्या या बंडाला आशीर्वाद देण्यासाठी एका हातात तरवार घेऊन अन् दुसऱ्या हाताने भंडार उधळीत मल्हारी मार्तंड खंडोबा जेजुरीच्या डोंगरावर उभा आहे. तर महाराष्ट्राच्या या बंडाचे कौतुक करीत चंद्रभागेच्या वाळवंटात पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस युगे विठोबा माउली उभी आहे.’

अशा या महाराष्ट्र बाण्याचा लोप झाला की काय, अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रात पाहायला मिळते आहे. बंडखोर महाराष्ट्राची धास्ती वाटत असल्यानेच या राज्याचे, मराठी नेतृत्वाचे वेळोवेळी दमन करण्याचा प्रयत्न झाला आहे. अर्थात, त्या त्या वेळी मराठ्यांनी झटकाही दिला आहे. आता मात्र आपल्या स्वाभिमानाच्या तलवारी म्यान करून, तह करण्यात मराठी शिलेदार धन्यता मानताना दिसत आहेत. केवळ महाराष्ट्रावर अन्याय झाला म्हणून आपल्या केंद्रीय अर्थमंत्रिपदाचा राजीनामा देणारे चिंतामणराव देशमुखांसारखे सनदी अधिकारी मराठी होते, यावरही आता कुणाचा विश्वास बसणार नाही. आपल्या स्वातंत्र्यासाठी साहित्यिक, पत्रकारांनी तुरुंगवास भोगला होता, हे नव्या पिढीला पटणार नाही. आता सत्ताकारणासाठी सामाजिक एकोपा नासवणारे राजकारण महाराष्ट्र अनुभवत आहे. निष्ठा आणि तत्त्वाशी तडजोड नाही, हा मराठी माणसाचा धर्म. त्यावरच कित्येकांनी पाणी सोडल्याचे महाराष्ट्र पाहतो आहे. विशेष म्हणजे, या सगळ्यावर कुणीही लिहायला, बोलायला तयार नाही. जो तो मूग गिळून गप्प आहे.

मराठी भाषा, कला, साहित्य, उद्योग, शेती, सहकार या सगळ्याच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राची गळचेपी होत आहे. राज्यातील सुमारे १५ हजार मराठी शाळा बंद करण्याची परिस्थिती उद्भवली आहे. ज्याचा एकूण राष्ट्रीय उत्पादनात सर्वाधिक म्हणजे १३ टक्के वाटा आहे, ज्याने देशात सहकारी चळवळीचा पाया घातला, देशाला पथदर्शक ठरणारा रिजनल टाऊन प्लॅनिंग कायदा, रोजगार हमी योजना, स्वच्छता अभियान, पहिले राज्य महिला धोरण, महिला आरक्षण आदी देशाला दिले, त्या महाराष्ट्रातील उद्योग दुसरीकडे पळवले जात आहेत. परिणामी बेरोजगारी वाढते आहे. शेती आणि शेतकऱ्यांची हलाखीही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे दूर, पण आपल्या सिनेमाला थिएटर मिळत नाही, म्हणून मराठी चित्रपट निर्मात्यांना आसवे ढाळावी लागतात. मराठीचे कैवारी म्हणून ज्यांनी राजकारण सुरू केले, ते आता सत्तेच्या सावलीत विसावले आहेत. पण, महाराष्ट्र निष्प्रभ करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी सेनापती बापटांनी तेव्हाच सुनावले होते…

महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले। मराठ्यांविना राष्ट्रगाडा न चाले।। खरा वीर वैरी पराधीनतेचा। महाराष्ट्र आधार या भारताचा।।

येत्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने, या मंगल-पवित्र देशाच्या मातीमध्ये पुन्हा एकदा हा अभिमानाचा, सर्व क्षेत्रांतील प्रागतिकतेचा हुंकार घुमावा, असे सामान्य मराठी माणसाला मनोमन वाटते आहे.

(संपर्कः dnyanabatukaram@gmail.com)



Source link