विद्यार्थी मित्रांनो, या लेखात आपण २५ मे रोजी होणाऱ्या यूपीएससी पूर्वपरीक्षा २०२५ च्या दृष्टीने पेपर सोडविण्याची रणनीती जाणून घेणार आहोत. ही परीक्षा तुमच्या एक वा त्यापेक्षा अधिक वर्षांच्या कष्टाचे फळ आहे, तेव्हा परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाणे अपेक्षित आहे. लक्ष केंद्रित करून पेपरला सामोरे जाताना वेळेचे अचूक व्यवस्थापनही इथे अपेक्षित आहे.
● ओएमआर -उत्तरपत्रिका काळजीपूर्वक भरा :
ओएमआर – उत्तरपत्रिकेवर तुमचा परीक्षा क्रमांक, पेपरचा कोड, परीक्षेचे नाव इ. बाबी अचूकपणे भरणे अपेक्षित आहे. बहुतेकदा काही विद्यार्थी इथे चूक करतात. एकतर ही उत्तरपत्रिका बदलून मिळत नाही आणि त्यामुळे तुमची मानसिकताही सुरुवातीपासून खराब होते. ज्याचा परिणाम पेपरवर होतो. त्यामुळे शांतपणे सर्व तपशील भरा.
● वेळेचे नियोजन :
पेपर सोडविताना पेपरचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘जीएस’ व ‘सीसॅट’ या दोन्ही पेपरमधील सर्व प्रश्न वाचून व्हायला हवेत. ‘सीसॅट’ साठी वेळेचे नियोजन हा नेहमीच कळीचा मुद्दा राहिला आहे. बहुतेकदा ‘जीएस’चा पेपरही वेळखाऊ असतो. एखादा प्रश्न वाचल्यावर त्यासंबंधी बाबी रिकलेक्ट होत नसतील तर लगेच पुढच्या प्रश्नाकडे आपण जायला हवे.
● प्रश्न काळजीपूर्वक वाचा :
हा एक सोपा उपाय आहे की प्रश्नामध्ये कधीकधी योग्य उत्तराशी संबंधित दुवा असू शकतो. अंदाजे उत्तर दिल्याने प्रश्न बरोबर येण्याची शक्यता ५०/५० असते. प्रश्न काळजीपूर्वक वाचल्याने तुम्हाला योग्य उत्तरापर्यंत पोहोचता येते. जरी हे प्रत्येक प्रश्नाला लागू होत नसले तरी बऱ्याच वेळा ते तुम्हाला योग्य चित्र आणि अचूक उत्तर देऊ शकते. बहुतेकदा प्रश्न नीट न वाचल्याने उत्तर चुकूही शकते. ‘योग्य’ व ‘अयोग्य’ यात गोंधळ होतो. किंवा काही विधाने ही अर्धी बरोबर अर्धी चूक असतात.
● एलिमिनेशन तंत्र :
चुकीचे पर्याय वगळल्याने, योग्य पर्याय निवडण्याची शक्यता वाढते. त्यामुळे प्रश्नासाठी दिलेले चुकीचे पर्याय वगळून तुम्ही योग्य पर्यायांचा विचार करायला हवा. जेव्हा तुम्हाला अचूक उत्तराबद्दल खात्री नसते. तेव्हा हे तंत्र वापरल्याने फायदा होतो. परंतु यूपीएससीने गेल्या २-३ वर्षापासून पर्याय देताना काही प्रश्नांसाठी एलिमिनेशन तंत्र वापरता येणार नाही अशी योजना केलेली आहे. त्यामुळे या तंत्रालाही मर्यादा आहेत.
● ज्ञानाच्या आधारावर अंदाज बांधणे:
बहुपर्यायी प्रश्न हे चुकीचे पर्याय वगळण्याबद्दल असतात. अंदाजे उत्तरे देणे तुम्हाला योग्य उत्तर देऊ शकते, पण ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्हाला त्या विषयाबद्दल पूर्वीचे ज्ञान असेल ज्यातून हा प्रश्न विचारला गेला आहे. तुमच्याकडे आधीपासून ज्ञान असेल तेव्हाच अंदाजे उत्तरे देणे फलदायी ठरू शकते. प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी, तुम्ही दिलेल्या नमुना चाचण्या आठवा. तुम्हाला प्रश्नाबद्दल काहीतरी सुगावा मिळू शकेल आणि त्यामुळे तुम्हाला प्रश्नाचे योग्य उत्तर देण्यास मदत होईल. अंदाज लावताना त्याला काहीतरी संदर्भ असावा हे इथे लक्षात घ्या.
● सर्व पर्यायांचा विचार करा :
प्रश्नाच्या उत्तरासाठी दिलेले सर्व पर्याय नीट तपसा. अनेक वेळा विद्यार्थी ‘वरील सर्व’ आणि ‘यापैकी काहीही नाही’ हे पर्याय म्हणून दुर्लक्षित करतात, पण हे दिशाभूल करणारे ठरू शकते. ‘वरील सर्व’ आणि ‘यापैकी काहीही नाही’ हे देखील उत्तर असू शकते.
● महत्त्वाच्या शब्दांचे (की वर्डस) अनुसरण करा:
नेहमी प्रश्नातील महत्त्वाच्या शब्दांचे अनुसरण करा. बर्याच वेळा तुम्हाला प्रश्नामध्येच उत्तर मिळू शकते. प्रत्येक पर्याय तपासा आणि बारकाईने प्रश्नाशी जोडा. सर्वात योग्य पर्याय शोधण्याची ही युक्ती आहे.
● सीसॅट पेपरकडे दुर्लक्ष करू नका : सीसॅट हा पेपर जारी पात्रतेचा आहे म्हणून त्याला गृहीत धरू नका. २०० पैकी ६६ गुण मिळतीलच म्हणून कमी अटेम्प्ट अंगाशी येवू शकतो. इथे अचूकता महत्त्वाची आहे. २०२३ व २०२४ या दोन्ही वर्षी यूपीएससी पूर्वपरीक्षेचे मेरिट कमी होण्यामागे या पेपरचा सिंहाचा वाटा आहे. बहुतेक विद्यार्थी या पेपरमध्ये ६६ गुण मिळवू शकलेले नाहीत. तेव्हा शांत व संयमाने आपण या पेपरला सामोरे जाणे गरजेचे आहे.
● पेपर सोडविताना खालीलप्रमाणे रणनीती असावी :
पेपरला सोडविताना किमान आपले ३ राऊंड व्हायला हवेत. म्हणजे पेपर किमान ३ वेला नजरेसमोरून जायला हवा.
● पहिला राउंड = १०० खात्रीशीर प्रश्न
पहिल्या राउंडमध्ये, तुम्हाला ज्या प्रश्नांची १०० खात्री आहे ते प्रश्न सोडवा. जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला असेल, तर तुम्हाला किमान ३५ ते ४० प्रश्न १०० खात्रीने यायला हवेत.
● दुसरा राउंड = ५० खात्री असलेले प्रश्न
जर तुम्ही ४ पैकी २ पर्याय वगळले असतील, तर तुमच्याकडे फक्त २ पर्याय उरतात, ज्यापैकी १ योग्य उत्तर असेल. म्हणून, फेरी २ मध्ये, फक्त तेच प्रश्न घ्या ज्यामध्ये तुम्ही २ पर्याय वगळले आहेत.
● तिसरा राउंड = ३३ खात्रीशीर प्रश्न
ज्या प्रश्नांची बरोबर येण्याची शक्यता ३३ आहे ते प्रश्न सोडवा.
● अटेम्प्ट :
जीएस पेपरला ८० – ८५ इतका अटेम्प्ट हा चांगला अटेम्प्ट आहे. सीसॅट पेपरमध्ये अचूकतेवर भर दिल्यास ५० – ५५ इतका अटेम्प्ट पात्रतेसाठी योग्य ठरू शकतो. नकारात्मक गुणांची योजना इथे आहे. ३ उत्तरे चुकल्यास १ बरोबर उत्तराचे गुण वजा होतात, तेव्हा अधिकचा अटेम्प्ट त्रासदायक ठरू शकतो.
तुम्ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा देत आहात, त्यामुळे कोणतीही कसर राहू नये याची खात्री करा. सर्वांना २५ मे रोजी होणाऱ्या यूपीएससी पूर्वपरीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा!
sushilbari10 @gmail. com
दिल्ली विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी तसेच बीटेक प्रवेशांसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थी ६ जून २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. हे प्रवेश admission. uod. ac. in वर अधिक माहिती उपलब्ध आहे.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील यूपीएससी सीएसई २०२६ परीक्षेसाठी मोफत निवासी प्रशिक्षणासाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक उमेदवार admission. jmi. ac. in वर २८ मे २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात.
एमएचटी सीईटी २०२५ परीक्षेतील पीसीएम गटाच्या प्रश्नांविषयीचे आक्षेप २२ ते २४ मे या कालावधीत नोंदवायचे आहेत. त्यासाठी कँडिडेट लॉगइनमध्ये ‘ऑब्जेक्शन ट्रॅकिंग’ पर्याय उपलब्ध आहे.