
9-9-6 Rule of 72 Hour Work Week Vs 10-5-5 Working Culture: भारतातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असलले इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी केलेलं एक विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या विधानावरुन दोन गट पडले असून मूर्ती यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यांतील जास्तीत जास्त वेळ काम करण्याच्या आपल्या पूर्वीच्या आग्रहाचा पुन्हा उल्लेख केला आहे. यावेळी त्यांनी चीनचे उदाहरण दिलं आहे. चिनी कंपन्यांकडून अंमलात आणल्या जाणाऱ्या 9-9-6 नियमाबद्दल मूर्ती बोलले आहेत.
9-9-6 नियम काय आहे?
9-9-6 नियम हा काही चीनमधील तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांशी संबंधित असलेल्या कामाच्या संस्कृतीसंदर्भातील आहे. विशेषतः गेल्या दशभरात चीनमधील कर्मचारी वर्गाच्या वेळापत्रकाचे वर्णन 9-9-6 नियमाच्या माध्यमातून केलं जातं. या नियमानुसार येथील कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून सहा दिवस सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत काम करावे अशी अपेक्षा असते.
या नियमाचे पालन करणारे कर्मचारी आठवड्यातून 72 तास प्रभावीपणे काम करतात. तथापि, ही पद्धत अत्यंत त्रासदायक आणि तणावपूर्ण असल्याने कर्मचाऱ्यांचं शारीरिक तसेच मानसिक आरोग्यांबरोबरच वर्क-लाईफ बॅलेन्सवर परिणाम करू शकते असं म्हटलं जातं. म्हणूनच या 9-9-6 वर्क कल्चरला मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसतो. 2021 मध्ये, चीनच्या सर्वोच्च न्यायालयाने 9-9-6 कामाच्या तासांची पद्धत बेकायदेशीर ठरवली. मात्र त्यानंतरही ही बंदी किती प्रमाणात लागू केली गेली आहे हे स्पष्ट नाही.
नारायण मूर्तीकडून 9-9-6 नियमाचं समर्थन
9-9-6 वर्क कल्चरबद्दल इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी ‘रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत कामाची ही पद्धत एक सकारात्मक उदाहरण म्हणून पाहता येईल असं म्हटलं. मूर्ती यांनी 2023 मध्ये राष्ट्र उभारणीसाठी भारतीयांनी आठवड्यातून 70 तास काम करावे असे सांगून राष्ट्रीय स्तरावर नवीन वादाला तोंड फोडलं होतं. आता त्यांनी चीनचे उदाहरण देऊन आपल्या जुन्या भूमिकेचे समर्थन केले आहे.
मूर्ती नेमकं काय म्हणाले?
“चीनमध्ये एक म्हण आहे, 9-9-6! तुम्हाला माहिती आहे का याचा अर्थ काय? सकाळी 9 ते रात्री 9, आठवड्याचे 6 दिवस काम करणे. म्हणजेच हा 72 तासांचा आठवडा होतो,” असे त्यांनी मुलाखतीत सांगितले आणि भारतातील तरुणांनी याच पद्धतीचे पालन करावे असेही मूर्ती यांनी सांगितले. आयुष्य जगायला वेळ हवा असं म्हणणाऱ्यांनाही मूर्ती यांनी सुनावलं. प्रथम ‘जगण्यासारखं आयुष्य मिळवा आणि नंतर वर्क-लाइफ बॅलेन्सची काळजी करा,” असा टोला मूर्तींनी लगावला.
टीकेची झोड
मूर्तींच्या वक्तव्यावरील बहुतेक प्रतिक्रिया नकारात्मक होत्या. भारतात ओव्हरटाइम वेतनाचा अभाव असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. ओव्हरटाइम काम करण्याचे फायदे वरिष्ठ व्यवस्थापनाकडून कनिष्ठ कर्मचाऱ्यांना न देणे, जास्त कामाच्या तासांशी संबंधित आरोग्य धोके, स्थिर वेतन, कामाभोवती आयुष्य केंद्रित करण्याचे धोके आणि बऱ्याच गोष्टींचा उल्लेख करत मूर्तींच्या भूमिकेवर टीका करण्यात आली.
9-9-6 ला 10-5-5 ने उत्तर
मूर्ती यांना उत्तर देताना अनेकांनी 10-5-5 वर्क कल्चरचा संदर्भ देत उत्तर दिलं आहे. “युरोपमध्ये एक म्हण आहे, 10-5-5. तुम्हाला माहिती आहेच की याचा अर्थ काय आहे – सकाळी 10 ते संध्याकाळी 5, आठवड्यातून 5 दिवस काम करणे. हे कर्मचारी फिरायला जातात, ट्रेकिंग करतात, मित्रांना भेटतात आणि जीवनाचा ‘आनंद’ घेतात,” असे एक्स युझर आकाश तिवारीने म्हटलं आहे.
“तुम्ही तासाला पैसे द्याल का? नाही ना? तुम्हाला कर्मचाऱ्यांनी 24×7 काम करावे असे वाटते जेणेकरून तुम्ही तुमच्या 9 महिन्यांच्या नातवाला 250 कोटी रुपयांचे शेअर्स हस्तांतरित करू शकाल आणि तुम्ही त्या कर्मचाऱ्याला दरवर्षी 3.6 लाख रुपये देता,” असे दुसऱ्या व्यक्तीने मूर्ती यांना सुनावलं आहे.







