
मुंबई : गेल्या दोन महिन्यांमध्ये शहर, तसेच उपनगरांमध्ये विजेचा धक्का बसून सहा माकडे गंभीर जखमी झाली आहेत. झाडावर चढताना माकडे काही वेळा विजेच्या तारांना लोंबकळतात, त्यांच्या सहाय्याने झाडावर किंवा इतर ठिकाणी चढण्याचा प्रयत्न करतात. पावसाळा सुरू झाल्यानंतर विजेच्या तारा ओल्या होतात आणि त्या माकडांसाठी धोकादायक बनतात.
मुलुंड परिसरात नुकतेच एका माकडाला विजेचा धक्का बसला असून हे माकड ८० टक्के भाजल्याचे निदर्शनास आले. यादरम्यान माकडाला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. संबंधित माकडाला वनविभागाने रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वाईल्ड लाईफ वेल्फेअरकडे (रॉ) सुपूर्द केले. त्यानंतर माकडाला ‘हिमी बर्क व्हेटरनरी क्लिनिक’मध्ये नेण्यात आले, तिथे डॉ. प्रीती साठे यांच्या नेतृत्वाखाली त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. दरम्यान, पावसाळ्यात वृक्ष, घरांची छपरे, विजेचे खांब आणि तारा ओल्या असतात. त्याला स्पर्श झाल्यास तीव्र झटका बसतो. अनेक माकडे मृत्युमुखी पडतात, तर काही २४ तासही जगत नाहीत. आरे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ठाणे परिसरातील जंगलाच्या आसपासच्या परिसरात असलेल्या घारांजवळ अनेकदा विजेच्या तारा झाडांमुळे किंवा वाऱ्यामुळे तुडून लटकताना दिसतात. या परिसरात आंबा, जांभूळ यांसारखी फळझाडे असल्यामुळे माकडांचा कळप अन्नाच्या शोधात तिथे येतो आणि चुकून विजेच्या तारांना स्पर्श करतात. या प्रकारांमध्ये जवळपास ९० टक्के माकडांना इजा होते.
गेल्या काही वर्षांत शहर आणि उपनगरात माकडांचा स्वैरसंचार वाढला आहे. उघड्यावरील कचरा, माकडांना खायला देणारे नागरिक यामुळे माकड मानवी वस्तीकडे अधिक आकर्षित होत आहेत. नागरिकांनी वन्यप्राण्यांना खायला घालू नये. पवन शर्मा, संचालक, रेस्क्यूइंक असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेल्फेअर
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
समस्येवर तोडगा काय
या समस्येवर तात्काळ तोडगा नाही, पण स्थानिकांनी विजेच्या उघड्या किंवा लटकणाऱ्या तारांबाबत तात्काळ वीज वितरण कंपनी किंवा पालिकेकडे तक्रार केल्यास अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात.
जखमी माकड दिसल्यास काय करावे ?
जखमी माकड दिसल्यास शक्य तितक्या लवकर स्थानिक वनविभाग, प्राणीमित्र संस्थेशी संपर्क साधावा.
जखमी माकडांना शक्यतो हात लावू नये. हात लावल्यास संसर्ग होण्याची शक्यता असते. प्रशिक्षित व्यक्ती सोबत असल्याशिवाय माकडाला स्पर्श करू नये.
आजूबाजूला गर्दी करू नये. माकड घाबरून स्वत:ला इजा करण्याची शक्यता असते.