माझ्या हिश्श्याचे किस्से: भेट म्हणून दिली होती ड्रायव्हरसह कार…

0
27
माझ्या हिश्श्याचे किस्से:  भेट म्हणून दिली होती ड्रायव्हरसह कार…


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सुपरहिट सिनेमा ‘बॉबी’तील एक दृश्य.

माझ्या हिश्श्याच्या किश्श्यांमध्ये गेल्या आठ‌वड्यात मी राज कपूरजींची शंभरावी जयंती आणि रणधीर कपूरजींनी मला भेट दिलेल्या त्यांच्या सोफ्याची गोष्ट सांगितली होती. पण, राज कपूर यांचे व्यक्तित्व आणि भारतीय सिनेमासाठीचे त्यांचे योगदान एक-दोन भागांमध्ये लिहिले जाऊ शकत नाही. त्यामुळे आणखी किमान एक भाग लिहून काही गोष्टी तुम्हाला सांगाव्यात, असा विचार मनात आला. म्हणून आजचा भाग राज कपूर यांच्याविषयी.

राज कपूर यांची शंभरावी जयंती भव्यदिव्य पद्धतीने साजरी झाली. त्या दिवशी पीव्हीआरमध्ये चहुबाजूला त्यांच्या सिनेमांची पोस्टर लागली होते. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातील क्षणांचे; पृथ्वीराज कपूरजी, शम्मी कपूर, शशी कपूर, बहीण उम्मी, ऋषी कपूर, रणधीर कपूर यांच्यासोबतचे फोटो लावले होते. त्यांची सारी वाद्ये- ढोलकी, तबला, सारंगी, हार्मोनियम, अकॉर्डियन खूप चांगल्या पद्धतीने मांडण्यात आली होती. ‘आवारा’, ‘मेरा नाम जोकर’ अशा सिनेमांच्या स्टँडीसोबत लोक फोटो काढून घेत होते. दुसऱ्या बाजूला एक बँड राज कपूर यांची गाणी वाजवत होता.

ख्वाजा अहमद अब्बास यांच्यासमवेत एका सिनेमाविषयी चर्चा करताना राज कपूर

गाडीतून उतरताच मी पाहिले की प्रवेशद्वारावर संपूर्ण परिवार उभा होता. रणधीर कपूर आणि बबिताजी खुर्चीवर बसलेले होते. नीतू कपूर, नीला आंटी, केतन देसाई, कंचन देसाई, करिश्मा कपूर, करीना कपूर, सैफ अली खान, रीमा, मनोज जैन आणि त्यांची मुले, रिद्धिमा येणाऱ्यांचे स्वागत करत होते. मुलगी अल्फिया आणि मुलगा साहिर यांना घेऊन मी तिथे पोहोचलो, तेव्हा सर्वांत आधी मला नीतूजींनी पाहिले आणि आपल्या स्टाइलमध्ये ‘रूमीजी..’ अशी साद घालत माझी गळाभेट घेतली. त्यानंतर रणबीरची भेट झाली आणि साहजिकच चिंटूजींची आठवण निघाली. ते आमच्यासोबत नसल्याची जाणीव प्रकर्षाने होत होती.

विशेष म्हणजे, या परिवारातील सगळे जण प्रवेशद्वारावर उभे राहून येणाऱ्यांचे स्वागत करत होते, त्यांना भेटत होते, त्यांच्याशी गप्पाही मारत होते. मी मुलांना म्हणालो, ‘बघा, हा परिवार किती अनोखा आहे, प्रेमळ आहे, अाजही किती जमिनीवर आहे. इथे स्वागताला उभे असलेले रणबीर, आलिया, करिश्मा, करीना, नीतूजी हे सगळे मोठे स्टार आहेत आणि त्यांच्याभोवती एवढी गर्दी आहे. त्यांच्यासाठी कसलीही विशेष सुरक्षा नाही. जो यायचा तो त्यांना सहजपणे भेटून आत जात आहे.’

मला तिथे बोनी कपूर साहेब भेटले. मग राज कपूर साहेब आणि कृष्णा आंटींची आठवण निघाली. या दोघांच्या अनेक जुन्या आठवणींवर आम्ही बोलत होतो. राज कपूर साहेबांचा जवळचा सहवास लाभलेल्यांमध्ये बोनी कपूरजी होते. बोनीजी राज साहेबांचे खूप आवडते होते. ते सांगत होते, राज कपूर साहेब इतके ध्येयासक्त होते की, त्यांनी आपली सगळी कमाई सिनेमांवर, स्टुडिओंवर खर्च केली आणि नंतर स्वत:चे घर बांधले. मी म्हणालो, ‘हो, मलाही कृष्णा आंटींनी सांगितले होते की त्यांचे निम्मे आयुष्य भाड्याच्या घरामध्ये गेलेय. त्या म्हणाल्या होत्या, मी त्यांच्याशी (राज साहेब) भांडायचे, नाराज व्हायचे. त्यांना म्हणायचे की, तुम्ही फक्त स्टुडिओ उभारत आहात, आधी घर तरी बांधा. ते मला प्रेमाने समजावायचे की, कृष्णा, सिनेमा हे माझे पॅशन आहे आणि सिनेमा स्टुडिओमुळे तयार होतो, घरामुळे नाही. आपला स्वत:चा एक स्टुडिओ असावा, हे कोणत्याही चित्रपट निर्मात्याचे स्वप्न असते. त्यावर मी म्हणायचे की, मी एक गृहिणी आहे आणि आपले स्वत:चे घर असावे, हे प्रत्येक गृहिणीचे स्वप्न असते. त्यावर राज कपूर साहेब हसून म्हणायचे.. कृष्णा, माझे स्वप्न पूर्ण होईल आणि तुझेही स्वप्न साकार होईल!

‘मेरा नाम जोकर’नंतर त्यांना आपला स्टुडिओही गहाण ठेवावा लागला. पुढे ‘बॉबी’ प्रदर्शित झाला तेव्हा त्यांचे कर्ज फिटले आणि त्यानंतरही काही वर्षांनी त्यांनी घर खरेदी केले. जिथे ते इतकी वर्षे भाड्याने राहात होते, ते घर त्यांनी कृष्णा आंटींना भेट दिले. या गोष्टीवरून मला अमीर क़ज़लबाश यांचा एक शेर आठवतोय…

मिरे जुनूँ का नतीजा

ज़रूर निकलेगा,

इसी सियाह समुंदर से

नूर निकलेगा।

मला बोनीजींनी सांगितले, ‘मेरा नाम जोकर’नंतर राज कपूर साहेबांवर कर्ज झाले होते. एक दिवस ख़्वाजा अहमद अब्बास त्यांच्याकडे आले आणि त्यांना एक कथा-कल्पना ऐकवली. ते म्हणाले, मी सांगतो आहे म्हणून तुम्ही या कथेवर सिनेमा बनवा, तुमचे सगळे कर्ज फिटून जाईल. आणि मग राज कपूर साहेबांनी ‘बॉबी’ बनवला. हा सिनेमा इतका िहट झाला की खरोखरच त्यांचे सगळे कर्ज फिटले. एके दिवशी राज साहेबांनी एक अॅम्बेसेडर कार विकत घेतली आणि ते अब्बास साहेबांकडे गेले. त्यांना म्हणाले, ‘ही कार माझ्याकडून तुम्हाला भेट! आणि गाडीत जो ड्रायव्हर बसला आहे, तो सुद्धा तुमचाच ड्रायव्हर असेल. त्याचा पगार आर. के. प्रॉडक्शन देईल आणि ज्या पंपावर ‘आर. के”चे खाते आहे तिथूनच या गाडीतही पेट्रोल भरले जाईल.’ त्यांनी ड्रायव्हर आणि पेट्रोलसह ती गाडी भेट दिली. एकदा त्यांच्याकडे इन्कम टॅक्सची काही रक्कम बाकी राहिली होती. ती देण्यासाठी स्वत: खरेदी केलेला श्रीकांत स्टुडिओ त्यांनी विकला; पण कुणा मंत्र्याला, नेत्याला वा अधिकाऱ्याला सांगून ही रक्कम माफ करुन घेण्याचा प्रयत्न केला नाही. राज कपूर हे अशा दिलदार, उमद्या व्यक्तिमत्वाचे होते. आज त्यांच्या आठवणीत ‘अनाडी’ सिनेमाचे हे गाणे ऐका…

सब कुछ सीखा हमने,

न सीखी होशियारी…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link